द्राक्ष पिकासाठी लागवडपूर्व माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करणार आहोत, तेथील मातीमध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही जाणून घेतली पाहिजे.
बऱ्याच बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण कमी अधिक आढळून येते. या चुनखडीच्या उपलब्धतेमुळे वेलीस अन्य अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा येतात किंवा खंडित होतो. परिणामी, वेलीचे उत्पादन कमी राहते. काही परिस्थितीमध्ये वेलीचे आयुष्यही कमी होते.
क्षारयुक्त पाण्यामुळे उत्पादनात घट
बऱ्याच ठिकाणी बोअरवेल व विहिरीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. अशा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. पाण्यातील अधिक क्षारांमुळे वेलीची शाकीय वाढ होत नाही, तर काही स्थितीमध्ये पानांवर स्कॉर्चिग येते. यामुळे उत्पादनामध्ये घट येते.
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थितीमध्ये योग्य खुंटाची निवड महत्त्वाची असते. याकरिता लागवडीपूर्वी माती व पाणी तपासून घेणे गरजेचे समजावे.
लागवडीचा कालावधी
खुंट लागवड केल्यानंतर काही दिवसातच रोपांची वाढ सुरळीत होणे अपेक्षित असते. या करिता बागेतील तापमान महत्त्वाचे असते. बागेत किमान तापमान १५ अंश सेल्सअसपेक्षा अधिक होऊ लागल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. याचाच अर्थ खुंटरोपांच्या फुटीची वाढ झपाट्याने होताना दिसून येते. ही परिस्थिती साधारणतः जानेवारीच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाहावयास मिळते. उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीनुसार आपल्याकडे तापमान कमी जास्त होताना दिसून येते. तेव्हा किमान तापमानाचा विचार करून लागवडीचा कालावधी ठरवावा.
लागवडीची दिशा
द्राक्ष घडाच्या विकासामध्ये सूर्यप्रकाशाचे महत्त्व अधिक आहे. सूर्यप्रकाशापासून मिळालेल्या किरणांचा वापर करून प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून द्राक्ष वेल ही अन्नद्रव्यांचा साठा निर्माण करते. त्यातून घडाचा विकास होतो. दिवसभरातून दुपारपर्यंत व त्यानंतरसुद्धा एकसारखा सूर्यप्रकाश मिळावा, या उद्देशाने ‘वाय’ किंवा ‘विस्तारित वाय’ पद्धतीचा वापर करणार असल्यास लागवडीची दिशा ही उत्तर-दक्षिण असणे गरजेचे असते.
तर या तुलनेमध्ये मांडव पद्धतीच्या बागेत पुढील काळात पसरट कॅनोपी असल्यामुळे दिवसभरातील सूर्यप्रकाश एकसारखा तीव्रतेने मिळेल. म्हणूनच या वळण पद्धतीतील बागेत लागवडीची दिशा महत्त्वाची नसते.
लागवडीचे अंतर
आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असल्याने लागवडीचे अंतरही त्यानुसार बदलेल. त्या सोबत द्राक्ष लागवडीचा उद्देश (खाण्यासाठी, मद्यनिर्मिती इत्यादी), वेलीच्या वाढीचा जोम इत्यादींवर अवलंबून असेल. भारी जमिनीत वेलीच्या वाढीचा जोम जास्त असल्यामुळे साधारणपणे दोन ओळींतील अंतर दहा फूट व दोन वेलींतील अंतर सहा फूट असावे. यापेक्षा कमी अंतर असल्यास कॅनोपीची गर्दी होऊन घड निर्मितीमध्ये अडचणी येतील. इथे रोग नियंत्रणही कठीण होईल.
हलक्या जमिनीत दोन ओळींत 9 फूट तर दोन वेलींत 5 फूट इतके अंतर पुरेसे होईल. या जमिनीत यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास कॅनोपीची वाढ पूर्ण होत नाही. एकरी वेलींची संख्या कमी राहील व सन बर्निंगची समस्या उद्भवू शकते.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- हरभरा पिकाचे रोग व्यवस्थापन
- कृषी सल्ला : भात पेंढा साठवण व उपयोग; साठवणुकीत कीड संरक्षण; अवशेष व्यवस्थापन