बिपरजॉय चक्रीवादळामुळे तळकोकणात खोळंबलेल्या मान्सूनच्या प्रगतीला 3-4 दिवसात अनुकूल स्थिती होण्याची शक्यता आहे. IMDचे नवे अनुमान काय, आता पाऊस वेगाने सक्रीय होण्याची अंदाजित तारीख काय, महाराष्ट्रात मुसळधार कधी बरसणार ते जाणून घ्या.
“स्कायमेट”ने यापूर्वीच बिपरजॉय चक्रीवादळ विसर्जित होईपर्यंत मान्सून कमजोर राहील, असे म्हटलेले होते. महाराष्ट्रासह मध्य व पश्चिम भारतात 6 जुलैपर्यंत मान्सूनच्या पावसाची स्थिती निराशाजनक राहू शकते, अशी भीती या खासगी हवामान संस्थेने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मात्र 4 दिवसांपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात, तळकोकणात दाखल झाल्याचे आनंदाच्या भरात घाईतच जाहीर केले. “स्कायमेट”चा मात्र कोकण, मुंबई, महाराष्ट्रात अजून मान्सून सक्रीय नसल्याचा दावा कायम आहे. गेल्यावर्षीही “आयएमडी”ने मान्सून जाहीर करण्यात घाई केली होती. तेव्हाही “स्कायमेट”ने टीका केली होती. सरकारी व खासगी हवामान संस्थात चांगलीच जुंपली गेली होती.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
याठिकाणी रेड अलर्ट जारी
हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ आज अत्यंत तीव्र झाले आहे. सौराष्ट्र-कच्छ किना-यासाठी चक्रीवादळाचा धोक्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लगतच्या राजस्थानमध्येही याच पातळीवर धोक्याचा इशारा दिल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या वादळाने गुजरातला तडाखा दिला असून पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला आहे. आज, 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत, गुजरातजवळील जाखाऊ व मांडवी बंदाराच्या पुढे जाऊन चक्रीवादळ पाकिस्तानात कराची ओलांडण्याची शक्यता आहे. तिकडे आज सायंकाळपर्यंत , बिपरजॉय चक्रीवादळ विसर्जित (लँडफॉल) होऊ शकते.
या सर्व पार्श्वभूमीवर, पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी नव्याने आनंदाची बातमी दिली आहे. “आयएमडी”च्या नव्या Monsoon Update नुसार, दक्षिण भारत, पूर्व भारत व लगतच्या भागात, मान्सून काही ठिकाणी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. आता नैऋत्य मॉन्सून 18 ते 21 जून दरम्यान सध्याच्या ठिकाणाहून महाराष्ट्रासह त्याच्या नियमित मार्गाने आगेकूच करेल.
सध्या मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर तळकोकणात आहे. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सून कमजोर स्थितीत असल्याने त्याची आगेकूच थंडावली आहे. बिपरजॉय आज सायंकाळी विसर्जित झाल्यानंतर कोकणात खोळंबलेला मान्सून पुन्हा नव्या दमाने सक्रीय होऊ शकेल. 18 जूनपासून मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मान्सून आगेकूचसाठी अनुकूल स्थिती – मृत्युंजय मोहोपात्रा
बिपरजॉय चक्रीवादळाचा भारतातील मान्सूनवर आता काहीही परिणाम होणार नाही, असे आयएमडीचे राष्ट्रीय प्रमुख (महासंचालक) मृत्युंजय मोहोपात्रा यांनी म्हटले आहे. चक्रीवादळ जार ओमानला जाऊन विसर्जित जाहले असते तर आपला मान्सून कदाचित प्रभावित होऊ शकला असता. मात्र, कराचीजवळ आता वादळ विसर्जित होणार आहे. त्याचा मान्सूनला फायदाच होईल. बिपरजॉयने दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर रेंगाळत असताना विषुववृत्त प्रवाह मजबूत करून मान्सूनच्या प्रगतीस मदत केली आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणाली त्यामुळे मजबूत होऊ शकतील. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाच्या उपस्थितीमुळे सुरुवातीला मान्सूनला विलंब झाला, हे मोहापात्रा यांनी मान्य केले. ढगातील ओलावा (बाष्प) आणि संवहन दोन्ही खेचून चक्रीवादळाने मान्सूनच्या प्रारंभाची तीव्रता कमी झाली होती. आता मात्र मान्सून आगेकूचसाठी अत्यंत अनुकूल स्थिती तयार झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने 8 जून रोजी मान्सून सुरू झाल्याचे घोषित केले. मात्र, असे करण्यासाठी सर्व निकष पूर्ण केले गेले आहेत, की नाही हे त्या वेळी स्पष्ट झाले नव्हते. खासगी हवामान संस्था व अनेक तज्ञांनी मान्सूनची सुरुवात कमकुवत असेल आणि चक्रीवादळाने मान्सूनची प्रगती मंद राहील, असा इशारा दिला होता. आता मात्र चक्रीवादळामुळे दक्षिण गोलार्धाकडून उत्तर गोलार्धाकडे वाऱ्याचा प्रवाह मजबूत झाला आहे. चक्रीवादळ अतिशय संथ गतीने पुढे सरकले आणि मान्सून पुढे जाण्यास आता त्याची मदत होईल,” असे “आयएमडी”चे महासंचालक महापात्रा यांनी सांगितले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇