गोपालन व ग्रामविकास यांचा परस्पर संबंध हा अनाधीकाळापासून आहे. गावाचा पर्यायाने शेतीचा व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा गोपालनामुळे झाला आहे. प्राचीन काळी कोण किती सधन आहे हे त्याच्याकडे आलेल्या गायीच्या संख्येवरून ठरविले जात असे. विवाहप्रसंगीसुद्धा गाय ही भेट स्वरुपात दिली जात असे. राजे महाराजे सुद्धा ऋषीमुनिना भेट स्वरुपात गाय देत असत. बऱ्याच वेळा युद्ध प्रसंगी जिंकणारा राजा पशुधनांची लुट करीत असे. एकंदरीत सर्वांच्या दैनदिन व्यवहारात व जीवनांतील गाय हा अविभाज्य घटक होता. म्हणून कि काय श्रीकृष्णाने स्वतःला गोपालक म्हणून घेणे व गाई चारणे यात धन्यता मानली. परंतु म्हणतात ना कालाय तस्मै नमः त्याचप्रमाणे कालांतराने यांत्रिकीकरण आले व शेतीमधील पशुधनाची गरजही संपुष्टात आली.
देशी पशुधन जे शेतीच्या दैनदिन कामासाठी वापरले जात होते ते यांत्रिकीकरणामुळे बाजूला पडले होते. विदेशी गायी आल्यामुळे भारतीय गायी फक्त घरगुती दुधदुभात्यासाठी पाळल्या जाऊ लागल्या. कालांतराने भारतात झालेल्या श्वेतक्रांतीमुळे विदेशी गायी भारतात आल्या व त्यांच्या जास्त दुध देण्याच्या गुणधर्मामुळे देशी गायीचे दुधाच्या उपयोगासाठी पालन सुद्धा बंद झाले. त्यामुळे बरेच देशी गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर आलेत. परंतु त्यातही काही गोशाळा या प्रामुख्याने पुढाकार घेऊन देशी गोवंश पालनामध्ये पुढे आल्या आणि त्यांनी यामध्ये भरीव असे काम करून विदेशी गायीच्या तुलनेत सक्षम असा दुधारू देशी गायींचा गोवंश तयार केला. त्यापैकीच एक प्रकल्प आहे राजस्थानातील पथमेडा येथे उभारलेला श्री गोपाल गोवर्धन गोशाळा. गुजरात राजस्थानच्या सीमारेषाजवळ असलेल्या पाथमेडा येथे २२ हजार एकर प्रशस्त क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी गोशाळा आहे. श्री गोपाल गोवर्धन गोशाळा गोऋषि स्वामी श्रीदत्तशरणानन्दजी महाराज यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या गोशाळेत विविध प्रकारच्या एक लाख २५ हजार गायींचे गोपालन हे सुमारे 22 हजार एकर जमिनीवर केले जाते. यासाठी दररोज २० लाख रु खर्च होतो.
सुरुवात
श्री गोपाल गोवर्धन गोशाळेची सुरुवात ही राजस्थानमधील पथमेडा तहसील सांचोर जिल्हा जालोर येथे सुरुवात झाली. १७ सप्टेबर १९९३ मध्ये भारतीय सीमेतून पाकिस्तान मध्ये जाणाऱ्या ८ गायी व ५ वासरांना स्थानिक नागरिकांनी तस्करांच्या तावडीतून सोडविले आणि या १३ गोवंशच्या माध्यमातून या गोशाळेला सुरुवात झाली. त्यांनी सुरु केलेल्या या गोपालन सेवेचे व्रत संपूर्ण भारतभर प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने १९९५ मध्ये गोसेवा अंकाची सुरुवात करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्वमिजींचा प्रमुख उद्देश हा देशी गोवंश जतन करणे हाच असल्याकारणाने देशाच्याच नव्हे तर जगभरातून लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोपालन करीत आहे.
गोपालन व व्यवस्थापन व त्याचे नियोजन याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे श्रीपथमेड़ा गोधाम आहे. अश्याच प्रकारचे गोधन व त्याची सेवा सर्वांच्या हातून घडून खऱ्या अर्थाने ग्रामविकास व गोरक्षण व्हावे या उद्दात हेतूने त्यांनी पथमेडा येथे गोपालन व व्यवस्थापन याविषयी सहा महिन्याचा निशुल्क असा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातो. प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सर्व सुविधा या गोशाळेकडून निशुल्क पुरविल्या जातात.
श्रीपथमेड़ा गोधामच्या पावन कार्यापासून प्रेरणा घेत कर्नाटक राज्यातील रामचन्द्रपुर येथे सन् 2007 मध्ये गोकर्णपीठाधीश्वर श्रीराघवेश्वरभारतीजी महाराज यांच्या द्वारे विश्व गोरक्षा संमेलनाचे आयोजन झाले. या संमेलनात 17 देशातील 15 लाख लोग सहभागी झाले होते. या संमेलनामुळे दक्षिण भारतामध्ये गोपालानाविषयी मोठी जनजागृती झाली. अश्याच विविध प्रकारच्या गोधनविषयीच्या विधायक कार्यक्रमाना या गोशाळेमुळे पाठबळ मिळाले आहे. त्याचप्रमाणे गोपालन संबंधित धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रम संपूर्ण वर्षभर पथमेडा येथे सुरु असतात.
गोसंवर्धन
श्री गोधाम महातीर्थ पथमेड़ा येथे गिर, साहीवालसह विविध प्रजातींचे पालन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने काकरेज ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुख्य आश्रमात आज रोजी ४०००० गायी व १२ हजार नंदीचे पालन केले जाते. पथमेड़ाचे पांच गोसेवाश्रम खालीलप्रमाणे आहेत त्याठिकाणी मिळून एकूण १ लाख २५ हजार गायींचे संगोपन केले जाते. श्री गोपाल गोवर्धन गोशाळा- पथमेड़ा, श्री मनोरमा गोलोकतीर्थ-नन्दगांव, श्रीमहावीर हनुमान गोशाळाश्रम-गोलासन, श्रीखेतेश्वर गोशाळाश्रम-खिरोड़ी, श्रीठाकुर गोशाळाश्रम-पालड़ी आणि श्रीराजाराम गोशाळाश्रम-टेटोड़ा सह जालोर, सिरोही आणि बनासकांठा (गुज.) च्या विविध गांवांत स्थापित गोसंवर्धन केन्द्राद्वारा प्रतिवर्ष 8,000 से 10,000 गायीना उच्च भारतीय देशी वंश्याच्या नंदीद्वारा रेतन करून अधिक दुध देणाऱ्या गोसंवर्धनचे कार्य केले जात आहे. श्री गोधाम महातीर्थ पथमेड़ाद्वारा प्रतिवर्ष शेकड़ो उच्च जातीचे नंदी (सांड) तयार करून देशातील विविध गोशाळाना दान केले जातात. तसेच गरीब शेतकऱ्यांना प्रतिवर्ष शेकड़ो सशक्त व सुदृढ नंदी निःशुल्क दिले जातात. त्याचप्रमाणे भाकड व शेतीसाठी निरुपयोगी झालेल्या गोवंशाला हजारोंच्या संख्येने गोसेवा केन्द्रात प्रवेश दिला जातो.
गोपालन (800 पेक्षा अधिक गांवात गोपालनासाठी प्रोत्साहन)
श्री गोधाम महातीर्थ, पथमेड़ा द्वारा राजस्थान व गुजरातच्या गोशाळामध्ये दरवर्षी एक लाख २५ हजार गोवंशाचे पालन पोषण केले जाते. त्यांना पौष्टिक आहार, हिरवा चारा, औषधी, स्नान, इ सह वात्सल्यपूर्ण देखभाल केली जाते. तसेच विविध प्रजातीची निवड करून जास्त दुधारू गायींची निवड करुन त्यांचे वर्गीकरण केले जाते. श्री गोधाम महातीर्थ पथमेड़ा या वर्गीकरण केलेल्या वासरांना संवर्धन हेतु राज्यात व देशातील विभिन्न गोशाळा, गोपालक शेतकरी आणि गोसेवाश्र यांना सेवा व आजीवन संरक्षण या अटीवर निःशुल्क वितरित केले जातात. याचबरोबर गुजरात व राजस्थान मधील 800 गावातील गोपालक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून गोपालन देशव्यापी बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
धन्वंतरी विभाग
पथमेड़ा येथील गोशाळेचा सर्वात महत्वपूर्ण विभाग धन्वंतरी आहे. गोधाम मध्ये आलेल्या प्रत्येक अनाश्रित लंगड्या, अंध, अपंग, लाचार, दूर्घटनाग्रस्त व कत्लखान्यात जाण्यापासून वाचविलेल्या गोवंशाला सर्वप्रथम येथे प्रवेश मिळतो. धनवन्तरी विभागात प्राथमिक चेकअप व उपचार पश्चात गोवंशाला त्यांच्या शारीरिक स्थितिअनुरूप व सेवा-सुरक्षा च्या गरजेनुसार निर्माण केलेल्या विविध विभागामध्ये स्थलांतरित केले जाते. तसेच आजारी, दूर्घटनाग्रस्त व वृद्ध गोवंशाला धनवन्तरी विभागात पूर्ण स्वास्थ्य होईपर्यंत ठेवले जाते.
या विभागात गायीच्या वेदना लवकरात लवकर दूर करण्यासाठी संतवृद, ब्रम्हचारी साधक, पूर्णकालिक गोभक्त-गोसेवकजन आणि आजाराला आधुनिक विज्ञानाच्या भाषेत समजणारे प्रशिक्षित डॉक्टर- पूर्णवेळ तयार असतात. या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे गोधनाच्या सेवा-सुरक्षामध्ये कोणताही प्रकारची त्रुटी राहत नाही. त्यामुळेच संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण विश्व गोधाम पथमेड़ाच्या गोसेवा-सुश्रुशा पुढे नतमस्तक झाल्याने आज ही जागा ‘‘गोधाम महातीर्थ’’ च्या रूपाने तीर्थक्षेत्र झाले आहे.
गायींचा कॅन्सर, गर्भाशय, फुफुस, हाड किंवा फार मोठी जखम,घाव सर्व प्रकारच्या आजारासाठी वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक आजारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे भोजन निश्चित अश्या प्रमाणात दिले जाते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात आजारी व वृद्ध गायींना दोन वेळ (लापसी) मक्का, मेथी, ओवा, खोबरा, गुळ, तेल इत्यादी शिजवून देतात. वृद्ध व गायींना दिवसातून दोन वेळा त्यांच्या स्थानावरून हलविले जाते. त्यांच्या कुशीला उशी ठेऊन आरामदायी स्थितीत हलविले जाते. तसेच दिवसातून दोन वेळा जखमी, शिंगांचा कॅन्सर, विविध फ्रक्चर व पोटाचे ऑपरेशन झालेल्या गायींची मलमपट्टी केली जाते. गोधाम पथमेड़ाच्या धन्वंतरी विभागात आलेल्या गुरांच्या जखमेवर माशी सुद्धा बसत नाही अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी मिळते.
भारतातील ही एकमेव अशी गोशाळा आहे ज्याठिकाणी जखमी गुरांना उपचारासाठी आणायला रुग्णवाहिका(अम्बुलन्स) आहे. गोधाम पथमेड़ाचा धन्वंतरी विभाग हा विविध आधुनिक उपकरणे, सोनोग्राफी मशीन आणि मोठ्या ऑंपरेशनच्या सुविधांनी सज्ज अशा अत्याधुनिक लॅबद्वारा गोसेवेत कार्यरत आहे. या गोशाळेत ट्रॉमा सेंटर, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर अशा सर्व सुविधा आहेत. जखमी गायींना जीवनरक्षक प्रणाली देण्याचीही सुविधा आहे.
पंचगव्य
मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुरांच्या दैनदिन व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे धन्वंतरी विभागात जखमी गायींची काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे दुधारू गोधनाची सुद्धा काळजीपूर्वक देखभाल केली जाते. गोशाळेचे कामकाज सकाळी चारला सुरु होते. दैनंदिन स्वच्छता केल्यांनतर दुध काढायला सुरुवात केली जाते. दुध काढल्यानंतर खुराक व चारा दिला जातो. हाच दिनक्रम संध्याकाळी पाळला जातो. इतर वेळी गायींना मुक्त सोडले जाते. संपूर्ण प्रकल्पाचा दैनंदिन २५ लाख रु खर्च आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च हा जरी विविध देणगी व निधी द्वारा निघत असला तरी, गोशाळा दुधउत्पादन व दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ, आईसक्रिम व पंचगव्य निर्मिती करून हा खर्च भरून काढते त्याचप्रमाणे गोमुत्र, शेण, व तत्सम पदार्थाचा औषधीय उपयोग लक्षात घेत विविध औषधी तयार करून त्याच्या विक्री व जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहे. तसेच या माध्यमातून सर्वाना गायीचे महत्व पटवून शेतकऱ्यांना गोपालानाकडे वळविण्याचा देशव्यापी कार्यक्रम करीत आहे. सहाव्या शतकातील “सुश्रूतसंहिता” या आयुर्वेदिक ग्रंथात गोमूत्र हे उपचारात्मक गुणधर्म असलेले औषध आहे असे सांगितले आहे. तसेच इतर प्राण्यांच्या दुध व मूत्रापेक्षा गायच्या दुधात व गोमूत्रामध्ये असलेल्या आरोग्यदायी फायद्यांमुळे त्याला अधिक महत्व दिलेले आहे. असे असले तरी हे प्राचिन साहित्य असून ते प्राचिन पुराव्यांवर आधारित आहे. पण याबाबत विज्ञान काय सांगते हे जाणून दुध व गोमूत्रअर्क च्या आरोग्यदायी फायद्यांविषयी असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन समजून गोशाळेत याच्या प्रचारावर काम सुरु केले आहे. गोमूत्रामध्ये पाणी, मीठ, लोह, कॅलशियम, फॉस्फरस, कार्बन अॅसिड, पोटॅश, नायट्रोजन, अमोनिया, मॅगनीझ, सल्फर, फॉस्फेट, पोटॅशियम, युरिया, युरीक अॅसिड, एमिनो अॅसिड, इन्झायमी, सायटोकीन, हार्मोन्स व लॅक्टोस हे खनिजे उपलब्ध असल्याने त्याचे औषधी गुणधर्म जगासमोर आणण्याचे काम संस्थानामार्फत सुरु आहे.
यावर्षी जुलै मध्ये राजस्थान मध्ये आलेल्या महापुरात आश्रमाची जीवित व वित्तहानी झाली असून अनेक गायींचे अतोनात नुकसान झाले आहे. २२ ते २६ जुलै २०१९ रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे ४० हजार गोधन प्रभावित झाले असून १४०० गायी मृत झाल्या आहेत. ४००० गायींना यातून वाचविण्यात यश आले आहे. या नैसार्गीक प्रकोपातूनही आश्रम सावरत असून. गायीच्या दैनंदिन लागणाऱ्या चाऱ्यासाठी संस्थेने बँकेत ecs करून प्रतिदिवस ५० रु गायीचा खर्च याप्रमाणे वार्षिक १५०० रु चा गोग्रास सुविधा उपलब्ध केली आहे. जे स्वतः गाय सांभाळू शकत नाही त्यांना या गोग्रास सुविधेच्या माध्यमातून गोसंगोपन करत येते.
सन उपलब्ध गाय-संख्या
१९९३-८ (सुरुवात)
१९९९ - ९००००
२००० - ९०७००
२००१ - १२६०००
२००३ - २७८०००
२००४ - ५४०००
२००५ - ९७०००
२००७ - १२००००
गोऋषि स्वामी श्रीदत्तशरणानन्दजी महाराज यांनी जरी या संपूर्ण प्रकल्पाची उभारणी केली असली तरी ते नेहमी प्रसिद्धी व मध्यमापासून अलिप्त आहे. त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज हेच प्रामुख्याने सर्व व्यवस्था पाहत असतात. आज फक्त गोसेवा या एकाच ध्येयाने मार्गक्रमण करणाऱ्या या गोशाळेंला दरवर्षी असंख्य नैसर्गिक व वित्तीय अडचणी येत असतानांही संस्था यातून मार्ग काढत निरंतर गोसेवा करत आहे व गोपालना विषयी जनजागृती करून शेतकऱ्यांना गोपालानाकडे वळवून त्यांच्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे राष्ट्रीय कार्य करत आहे.