मुंबई : राज्यात आता कांदा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. शेतकऱ्याने काढलेला माल लवकर विकला नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या सर्व गदारोळात शेतकऱ्यांनी आताच्या स्थितीत कांदा तेलंगणात नेऊन विकला तर ते फायद्यात राहू शकतात. संपूर्ण देशभरात कुठल्या राज्यात काय सरासरी भाव मिळत आहेत, ते “ॲग्रोवर्ल्ड”च्या या बातमीतून जाणून घ्या.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, म्हणून “ॲग्रोवर्ल्ड”चा प्रयत्न राहणार आहे. अनेक राज्यातील शेतकरी, व्यापारी, सरकारी अधिकारी आदींशी बोलून, संशोधन करून, पडताळून कांद्याला मिळणाऱ्या सरासरी दराची स्थिती आम्ही मांडत आहोत. त्यानुसार, शेतकरी त्यांच्या माध्यमातून खातरजमा करून चांगला भाव मिळत असलेल्या ठिकाणी आपला माल नेऊन विकू शकतात. अर्थात ही कालपर्यंतची स्थिती आहे. अचानक एखाद्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली तर बाजारभाव घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळी आहेत, त्यांनी भाव पडलेले असताना कांदा विकण्याची घाई करू नये. सध्याची परिस्थिती लांबल्यास कांदा दरात मोठे चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती अस्थिर असताना, साठवणुकीचा पर्याय असलेल्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवावा.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने कोणताही विचार न करता 40 टक्के निर्यातशुल्क लादून बळीराजाच्या पोटावरच पाय दिला आहे. शेतकरी संतप्त झाले असून दुसरीकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद आहे. संभ्रमात असलेले व्यापारीही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. बंदरात, कस्टम विभागाबाहेर कांद्याचे कंटेनर पडून आहेत. मेहनतीने पिकविलेला कृषी माल सडून वाया जात आहे. यावरून राज्य सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली असून कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत.
कांद्याचे महाराष्ट्रातील सरासरी भाव
महाराष्ट्रात काल, 21 ऑगस्ट रोजी कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 1,878 रुपये राहिले. कमीत-कमी भाव 100 रुपये तर जास्तीत-जास्त 4,500 रुपये दर राहिला. सर्वात कमी दर सोलापुरात तर सर्वाधिक दर अमरावतीत नोंदविला गेला. सर्वात चांगला सरासरी दर नागपुरात पांढऱ्या कांद्याला 3,000 रुपये मिळाला. चंद्रपूर 2,800, अमरावती 2,750 आणि कराडमध्ये 2,500 रुपये सरासरी दर मिळाला. पुण्यात आज, 22 ऑगस्ट रोजी लोकल कांद्याची 15 क्विंटल आवक झाली असून कमीत-कमी 1,400 ते जास्तीत-जास्त 2,400 रुपये दर आहेत. सरासरी दर प्रति क्विंटल 1,900 रुपये इतका सुरू आहे.
(सोबतच्या फोटोत महाराष्ट्रातील बाजार समितीतील कांदा दराची स्थिती दर्शविली आहे. फोटो झूम करून पाहावे.)
तेलंगणा राज्यातील कांदा दर
तेलंगणा राज्यात काल, 21 ऑगस्ट रोजी कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 2,650 रुपये राहिले. कमीत-कमी भाव 500 रुपये तर जास्तीत-जास्त 4,000 रुपये दर राहिला. तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा कांद्याला प्रति क्विंटल 772 रुपये अधिक दर राहिला. तेलंगणात आज, 22 ऑगस्ट रोजी कांद्याला सरासरी दर प्रति क्विंटल 2,750 रुपये इतका सुरू आहे.
गुजरात राज्यातील आजचा सरासरी कांदा दर
गुजरात राज्यात आज, 22 ऑगस्ट रोजी कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 1,611 रुपये इतके सुरू आहेत. कमीत-कमी भाव 1,000 रुपये तर जास्तीत-जास्त 4,000 रुपये दर प्रति क्विंटल मिळत आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील कांदा दर
आंध्र प्रदेश राज्यात आज, 22 ऑगस्ट रोजी कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 2,211 रुपये इतके सुरू आहेत. कर्नाटकमध्ये सरासरी 2,050 इतका भाव मिळत आहे. आजच्या व्यवहारात कमीत-कमी भाव 1,000 रुपये तर जास्तीत-जास्त 3,000 रुपये दर सुरू आहे.
मध्य प्रदेश, दिल्लीतील आजचा कांदा दर
मध्य प्रदेश राज्यात आज, 22 ऑगस्ट रोजी कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 1,257 रुपये इतके सुरू आहेत. मध्य प्रदेशात आता कमीत-कमी भाव 310 रुपये तर जास्तीत-जास्त 2,300 रुपये दर सुरू आहे.
दिल्लीत आज, कांद्याचे सरासरी भाव प्रति क्विंटल 1,875 रुपये इतके सुरू आहेत. दिल्लीत आता कमीत-कमी भाव 1,000 रुपये तर जास्तीत-जास्त 2,750 रुपये इतका भाव सुरू आहे.
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.