आनंद ढोणे- पाटील
अलीकडच्या काही काळापासून पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देत आता बरेचशे शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक पद्धतीने नवनवीन पीक प्रयोग राबवू लागले आहेत. पूरक व्यवसाय म्हणून शेतीला जोड देऊन अधिकचे उत्पन्न मिळवताहेत. त्याबरोबरच काही शेतकरी नवीन शेती पीक पद्धती अवलंबून त्यापासून प्रक्रिया उद्योग देखील उभारु लागलेत. याच आनुषंगाने परभणी जिल्हा पूर्णा येथील उमद्दे शेतकरी तथा कृषी उद्योजक डॉ. संजय प्रकाशराव लोलगे यांनी आपण समाजाचे आणि शेतकर्याचे देणे लागतो. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही केले पाहिजे, या उद्देशाने रेशीम आणि सोयाबीन कृषी बाजारपेठ सुरु केली असून या बाजारपेठेमुळे रेशीम उत्पादक शेतकरी आर्थिक उन्नती साधत आहेत.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील उमद्दे शेतकरी तथा कृषी उद्योजक डॉ संजय प्रकाशराव लोलगे यांनी आपण समाजाचे आणि शेतकर्याचे देणे लागतो. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काही केले पाहिजे, या उद्देशाने गत चार वर्षाखाली पूर्णा-पांगरा रोडलगत आडगाव शिवारातील स्वतः च्या शेतीत सुमारे 7 एकर क्षेत्रावर विस्तीर्ण योग्य ते बांधकाम करुन शेतकर्यांच्या शेती उत्पादीत कच्च्या उत्पादनास अधिकचा दर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन रेशीम संचालनालयाच्या रितसर परवानगीने समर्थ कृषी सोयाबीन व रेशीम कृषी बाजारपेठ ही प्रायव्हेट तत्वावर स्थापन केली.
सुरुवातीला काही दिवस सोयाबीन खरेदी केली. परंतु बरेच शेतकरी कमीशन एजंट आडतदुकानदार यांचे खातेदार असल्या कारणाने सोयाबीन आवक अधिक येत नसे. त्यामुळे रेशीम कोष खरेदीवर भर देण्यात आला. येथे विदर्भ मराठवाडा विभागातील असंख्य शेतकरी दररोज चारचाकी वाहनाव्दारे वाहतूक करुन दुरवरुन रेशीम कोष विक्रीस आणतात.दिवसाकाठी 4 टनच्या आसपास कोषाची आवक होते. शिवाय येथेच कोषल्यापासून रेशीम धागा निर्मीती प्रकल्पही सुरु करण्यात आला आहे. रेशीम कोष खरेदी व रेशीम धागा निर्मीतीतून खर्च वजा जाता महिन्याकाठी मार्केटला चांगला नफा उरतो. शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या रेशीम कोषाची खरेदी ही बिट पुकारुन कोषाच्या दर्जानुसार इतर मार्केटपेक्षा येथे अधिकचा दर मिळवून दिला जातो.
पुर्वी महाराष्ट्र राज्यात जालना येथे एकमेव रेशीम खरेदी केंद्र होते.त्यामुळे स्पर्धा नसल्यामुळे योग्य दर मिळत नव्हता. जर अधिकचा पाहिजे असेलतर कर्नाटकातील रामनगर येथील रेशीम बाजारात कोष न्यावा लागे. परंतु तेथे वाहतूक करण्यासाठी येणेजाणे जवळपास दोन हजार किलोमीटर हेलपाटे मारावे लागे.यात वाहतूक खर्च आणि वेळ वाया जात होता ते शेतक-यांना परवडत नसे.पण नाईलाज होता.आता समर्थ कृषी बाजार चालू झाल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील रेशीम उत्पादक शेतकर्यांचा कर्नाटक हेलपाटा वाचला आहे.येथे त्यापेक्षा दर देखील योग्य मिळत आहे.वाहतूकीकरीता अंतर देखील कमी आहे. त्यामुळे या समर्थ कृषी मार्केटमुळे रेशीम उद्योगातून आर्थिक उन्नती साधू लागलेत.
अशी केली रेशीम बाजारपेठ सुरु
विदर्भ, मराठवाडा विभागातील असंख्य शेतकरी हे या पूर्वीपासूनच तुतीची लागवड करुन रेशीम कोषाचे उत्पादन घेतात. पण आपल्या भागात मार्केट उपलब्ध नसल्यामुळे तुती लागवड क्षेत्र कमालीचे घटले होते. काही मोजके शेतकरी रेशीम शेती करीत. या अडचणीचा कृषी उद्योजक डॉ.संजय लोलगे यांनी इत्यंभूत अभ्यास केला आणि रेशीम कोष खरेदी बाजार चालू करण्याचे ठरवले. त्यासाठी मोठा खर्चही येणार होता. मात्र शेतकर्यांचे भले झालेच पाहिजे, ही जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मार्केट निर्मितीच्या बांधकामासाठी लक्षावधी रुपये आर्थिक भागभांडवल लागून खर्च येणार होता. याकरिता त्यांनी दुसर्या ठिकाणी असलेली काही क्षेत्र स्वतःची जमीन विकली व काही बँक कर्ज रोखे काढून मार्केटसाठी योग्य ते बांधकाम करुन साधन सामुग्री उभी केले. त्यांनतर माजी सहकारी मंत्री तथा साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मार्केटचे उद्घाटन करुन रेशीम खरेदीची सुरुवात केली.
बीट पुकारुन होते खरेदी
येथील कृषी बाजारात परभणी जिल्ह्यासहच विदर्भ व मराठवाडा विभागातील रेशीम उत्पादन शेतकरी आपल्या शेतीत उत्पादीत केलेला रेशीम कोष विक्रीस आणतात. त्या कोषल्याची बीट पुकारुन दर्जानुसार खरेदी केली जाते. सध्या 500 ते 550 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. साधरणता दररोज 2 ते 3 टन कोषला खरेदी होतो. यापैकी काही कोषल्यापासून येथेच रेशीम धागा निर्मीती केली जाते तर उर्वरित इतर व्यापार्यांना विक्री करतात.
…तुती लागवड क्षेत्रात वाढ
पूर्वी शेतकर्यांना रेशीम कोष कर्नाटक येथे नेवून विकावा लागे.त्याकरिता दूरवर वाहतूक आणि दोन तीन दिवस वेळ वाया जाई. यामुळे काही मोजकेच शेतकरी रेशीम उत्पादन करीत. आता पूर्णा येथे समर्थ मार्केट चालू करण्यात आल्याने कोषाच्या विक्री करीता कमी अंतर मार्गक्रमण करावे लागत असल्यामुळे तसेच कोषाचे पेमेंट देखील लगेच बँक खात्यात जमा होते. त्यामुळे कमी कालावधीत, कमी पाण्यात, कमी खर्चात रेशीम उत्पादन करता येत असल्याने त्यातून महिन्याभरातच चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. यामुळे एकमेकांचे पाहून रेशीम उत्पादक तुती लागवडीकडे वळत आहेत.एकंदरीत तूती लागवड क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. शिवाय या शेतीपूरक व्यवसायासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान सुध्दा मिळत आहे.
शेतकर्यांनी उभारले चॅकी सेंटर
रेशीम शेती करण्यासाठी तूतीचे लागवड क्षेत्र दिवसेंदिवस वाढून उत्तम दर्जाचे कोष शेतकरी उत्पादीत करु लागलेत. परंतु रेशीम कोष निर्मितीसाठी किटक (अळ्या) आवश्यक असतात. ते उपलब्ध होण्यासाठी विदर्भ, मराठवाडा विभागातील बर्याच शेतकर्यांनी रेशीम उद्योगाबरोबरच अंडीपुंज चॉकी सेंटर उभारले आहेत. या मार्केटमुळे त्यासाठी मोठी चालना मिळाली आहे.
कोषापासून रेशीम धागा निर्मिती
येथे मुबलक प्रमाणात कोषला उपलब्ध होत असल्यामुळे निखिल दिगंबरराव धामणगावे, संभाजी शंकरराव मोहिते यांनी धारवाड येथील केंद्रीय रेशीम बोर्ड येथे रेशीम धागा निर्मितीचे केंद्र चालू केले आहे. येथे दोन प्रकारचा रेशीम धागा निर्मीती केला जातो. यात उत्तम कोषल्यापासून तयार झालेला धागा हा रेशीम वस्र उद्योगासाठी तर डागी कोष्यापासून निघालेला जाड धागा टायर निर्मितीकरीता इंडस्ट्रीज मध्ये पाठवला जातो.
7 कोटी रुपयांचा नफा
येथे दररोज 2 ते 3 टन कोषला खरेदी केला जातो. तर रेशीम धागा तयार करण्याकरीता महिन्याकाठी 2 कोटी खर्च येतो तर कोषला विक्री आणि रेशीम धागा विक्रीतून खर्च जाता वार्षिक 7 कोटी रुपया पेक्षा अधिक निव्वळ नफा राहतो. शेतकर्यांकडून कोणतीही मार्केट फी अथवा आडत हमाली घेतली जात नाही. एक टक्का फीस ही खरेदीदाराकडून वसूल करण्यात येते. त्याचबरोबर मार्केटचा सर्व व्यवहार हा संगणकीकृत चालवला जातो.
धागा निर्मिती वाढविण्याचे उद्दीष्ट
सध्या रेशीम कोषची हजारो टनावर आवक होत आहे. तो खरेदी केला जातो. येथे रेशीम धागा निर्मितीचे एकच युनीट चालू असल्यामुळे शिल्लक राहीलेला कोषला इतर व्यापार्यांना विकावा लागतो. यापुढे कोष व्यापार्यांना न विकता येथे दररोज 1 टन रेशीम धागा निर्मीती होणार्या क्षमतेचे मोठे युनीट चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
शेतकर्यांच्या मुलांनी उभारावा धंदा
मी रेशीम धागा निर्मीती प्रशिक्षण हे कर्नाटकातील धारवाड येथे केंद्रीय रेशीम बोर्डात घेऊन पूर्णा येथे समर्थ मार्केटमध्ये रेशीम धागा निर्मीतीचे एक युनीट चालू केले आहे. त्यासाठी कॉटेज बेसिनच्या चार टेबलची मशीन आणून हा व्यवसाय सुरु केला. त्याकरीता येथेच कोषला उपलब्ध होत आहे. शेतकर्यांच्या सुशिक्षित मुलांनी देखील हा रेशीम धागा निर्मीती उभारला तर चांगला आर्थिक नफा मिळवता येतो.
– निखील धामणगावे, पूर्णा, जि. परभणी.
इतर मार्केटपेक्षा अधिक दर
आम्ही गेल्या चार वर्षापासून रेशीम कोष खरेदीचा व्यवसाय करतोय. येथे शेतकर्यांना इतर मार्केटपेक्षा अधिक दर मिळवून दिला जावून शेतकर्यांचे हित साधले जाते. त्यामुळे या रेशीम उद्योगातून रेशीम उत्पादक शेतकरी आर्थिक उन्नती साधत आहेत.
– संभाजी मोहिते, पूर्णा, जि. परभणी.
रेशीम उद्योग काळाची गरज
या पूर्वी शेतकर्यांना रेशीम कोष कर्नाटक, रामनगर येथील मार्केट येथे विक्रीसाठी न्यावा लागे. त्याकरीता लांब पल्ल्याचा हेलपाटे मारावा लागायचा. प्रवास व वाहतूक करण्यासाठी भरीव खर्च लागे. त्यामुळे तेथे नेवून विक्री करणे परवडायचे नाही. याचा आम्ही सखोल अभ्यास करुन रेशीम उत्पादकांचा त्रास वाचावा, त्यांना रेशीम उद्योग करण्याकरिता उभारी यावी, या शेतीपूरक जोड धंद्यातून त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी मोठा आर्थिक खर्च व जोखीम पेलून खुप मोठा आटापिटा, जिद्द पणाला लावून आर्थिक भागभांडवल उभे केले.
बर्याच अडचणी येत असताना आवश्यक तेथे काटकसर करुन अखेर हे समर्थ कृषी रेशीम बाजार व रेशीम धागा निर्मीती केंद्र उपलब्ध करुन दिले. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की शेतकर्यासाठी काही करुन दाखवले. हा कृषी उद्योग उभारण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी कदम, रेशीम उपसंचालक ढवळे, संचालक सुधीरचंद्रन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पुढील हंगामात चालू होणार्या समर्थ सिल्क प्रोसेसिंग मोठ्या युनीटमध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम धागा निर्मीती होऊन तो परदेशात निर्यात केला जाईल. प्रत्येक शेतकर्यांनी आपल्या शेतात एक तरी एकर तुतीची लागवड करुन रेशीम उद्योग चालू करणे आता काळाची गरज आहे.
– डॉ. संजय प्रकाशराव लोलगे, संचालक, समर्थ कृषी रेशीम बाजार प्रा.लि, आडगाव शिवार, ता.पूर्णा, जि.परभणी.