मुंबई : अनेक शेतकरी शेतीच्या कामासोबत पशुपालनाचा व्यवसाय देखील करतात. शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असून या व्यवसायातून चांगला नफा कमावता येतो. हा व्यवसाय तुम्ही कमी जागेत सुरु करू शकतात. यातच एका युवा शेतकऱ्याने शेळीपालन व्यवसाय सुरु केला असून लाखोंची कमाई करत आहेत.
भारतात गेल्या काही वर्षांत शेळीपालनाचा आलेख वाढला आहे. हा व्यवसाय मजबूत असून गाई-म्हशीच्या तुलनेत अगदी कमी खर्चात करता येतो. शेळीपालन हा लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान असून हा व्यवसाय पुरुषांबरोबरच महिलांनाही सहज करता येते. महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावातील शांतीपाल आनंद सोनुने हा युवक शेळीपालन व्यवसाय करत आहेत.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
तांत्रिक व विपणन कौशल्याची घेतली माहिती
कृषी विषयात शांतीपाल सोनुने हे पदवीधर आहेत. आज ते दीडशेहून अधिक शेळ्यांचे पालनपोषण करत आहेत. शांतीपाल हे ॲग्री-क्लिनिक अँड ॲग्री-बिझनेस सेंटर योजनेअंतर्गत प्रशिक्षित कृषी-उद्योजक आहेत. नागपूर येथील कृष्णा व्हॅली प्रगत कृषी प्रतिष्ठान येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शेळीपालन युनिटला भेट दिली. आणि तांत्रिक व विपणन कौशल्याची मदत घेतली. आज अर्धा एकर जमिनीवर शांतीपाल यांचे १५० शेळ्यांचे फार्म आहे. १५० शेळ्यांसाठी जमीन निवडताना कोणतेही कठोर नियम नसून तुम्ही तुमच्याकडे जी काही जमीन आहे ती वापरणे चांगले आहे. जर हिरवळ आणि कुरण असलेली अतिरिक्त जमीन असेल तर शेळ्यांना चरण्यासाठी फायदेशीर ठरते, असे शांतीपाल सोनुने सांगतात.
व्यवसायाचे पूर्ण नियोजन करा – शांतीपाल सोनुने
शांतीपाल सोनुने पुढे सांगतात की, भारतात शेळीपालन हा व्यवसाय पूर्ण नियोजन करून केला तर हा उत्तम पर्याय ठरेल. मात्र, ज्ञान, अनुभव आणि फायदेशीर शेळीपालन व्यवसाय नियोजनाच्या अभावामुळे अनेक शेळीपालन करणारे या व्यवसायात अधिक चांगला लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच वयोमानानुसार फरक ठेवून शेळ्या पाळल्या तर रोज पैसे कमावता येतात, असे शांतीलाल सोनुने यांनी सांगितले.
लाखोंची होतेय कमाई
शेळीपालन आणि प्रशिक्षणातून शांतीपाल हे चांगली कमाई करत आहेत. यातून शांतीपाल हे वार्षिक उलाढाल ८ लाख रुपयांपेक्षा जास्त करत आहेत. जवळच्या ८ गावातील १०० हून अधिक शेतकऱ्यांना शांतीपाल हे सल्ला व सेवा देतात. ते शेळीपालन व्यवसायातून ३ जणांना रोजगारही देत आहे.