“एका बिघ्यात चार महिन्यात 9 लाखांची कमाई” म्हणजे तुम्हाला जरा फेकाफेकीच वाटेल; पण हे 100 टक्के सत्य आहे. ‘या’ फुलाची शेती करून उत्तर प्रदेशातील शेतकरी मालामाल होत आहेत. जर्मनीतील या खास शोभिवंत आणि औषधी फुलाला बाजारात 2 हजार रुपये किलो भाव मिळतो. महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी भागातही त्याचे चांगले उत्पादन होते.
या फुलाची लागवड करून शेतकरी खरोखर श्रीमंत होऊ शकतील. यातून अवघ्या एक बिघा शेतीमधून एका हंगामात 9 लाख रुपये कमावता येऊ शकतात, असे उत्तर प्रदेशमधील कृषी विभागाचे उपसंचालक विनयकुमार यादव यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले. या जर्मन शोभिवंत फुलांची रोपे नोव्हेंबर महिन्यात तयार होते. प्रत्यारोपणाच्या तीन महिन्यांनंतर झाडांवर फुले दिसू लागतात. या फुलांपासून आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. त्यामुळेच ही फुले औषध कंपन्यांकडूनच सहज खरेदी केली जातात.
दुष्काळी बुंदेलखंडमध्ये आशेचा किरण
उत्तर प्रदेशातील बुदेलखंडचे नाव ऐकताच देशातील जनतेच्या मनात पहिले चित्र येते ते दुष्काळी भागाचे. कारण बुदेलखंड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे पाऊस खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकरी बहुतांशी मका, बाजरी यांसारख्या भरड धान्याची लागवड करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पन्न मिळते. मात्र, आता येथील शेतकरीही इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे आधुनिक पिके घेत आहेत. येथील शेतकरी आता फलोत्पादनात अधिक रस घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
जर्मनीतील ही फुले आहेत ब्लूकॉनची
शेतकऱ्यांना मालामाल करणारी जर्मनीतील ही फुले आहेत ब्लूकॉनची! हे जर्मनीचे राष्ट्रीय फूल आहे. ही फुले दिसायला इतकी सुंदर असतात, की त्यांचा वापर लग्न आणि पार्टी समारंभात सजावट म्हणूनही केला जातो. बुदेलखंड भागातील शेतकरी आता ब्लूकॉन फ्लॉवरची लागवड करणार आहेत. हे एक प्रकारचे विदेशी फूल आहे. त्याची लागवड फक्त जर्मनीमध्ये केली जाते. मात्र, आता बुंदेलखंड परिसरातील शेतकरीही ब्लूकॉनची लागवड सुरू करणार आहेत. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे याला फार कमी सिंचन लागते. म्हणजे दुष्काळी भागातही हे पीक घेता येते. यामुळेच जर्मनीतील कोरड्या भागात ब्लूकॉनचे पीक घेतले जाते.
उत्तर प्रदेश सरकारकडून पुरविली जात आहेत रोपे
उत्तर प्रदेश सरकार आता बुंदेलखंड आणि झाशीमध्येही ब्ल्यूकॉन लागवडीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, येथील हवामान ब्ल्यूकॉन फुलांच्या लागवडीसाठी योग्य आहे. कृषी विभागाकडून या फुलांसाठी रोपवाटिका तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना लागवडीसाठी सरकारच रोपे वितरित करणार आहे. ब्ल्यूकॉनची फुले बाजारात 2,000 रुपये किलो दराने खरेदी केली जातात. शेतात ही फुले उगवण्याचा सर्वोत्तम हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान असतो.
असे कमावू शकतात एका बिघामधून महिन्याला 9 लाख रुपये
या फुलांची खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक बिघामध्ये लागवड केली तर तुम्ही दररोज 15 किलो फुले तोडू शकता. म्हणजेच एका बिघा जमिनीतून तुम्ही दररोज 30,000 रुपये कमवू शकता. अशा प्रकारे शेतकरी बांधव ब्ल्यूकॉन फुलांची विक्री करून एका महिन्यात 9 लाख रुपये कमवू शकतात.
उत्तर प्रदेश सरकारची योजना
बुंदेलखंडचे मागासलेपण दूर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आधुनिक शेतीला चालना देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. यामध्ये विशेषत: बुंदेलखंडमधील झाशी, ललितपूर, ओराई, बांदा, हमीरपूर आदी ठिकाणचे वातावरण लक्षात घेऊन येथे फुलशेती इ.चा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत बुंदेलखंडमधील या भागात जर्मनीतील कोरड्या भागात पिकवल्या जाणाऱ्या ब्लूकॉन नावाच्या फुलांची लागवड करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. येथील हवामान ब्लूकॉन फुलासाठी योग्य आहे.
फुले सुकवून विकताही येतात
ब्लूकॉनची रोपे नोव्हेंबर महिन्यापासून रोपवाटिकेत तयार होतात. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून फुले येण्यास सुरुवात होते. त्याचा हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत असतो. फुले सुकवून कंपन्यांनाही विकता येतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, या फुलांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्यामुळे मांसाहारी प्राणीही शेतात जात नाहीत. लवकरच बुंदेलखंडमध्ये ब्लूकॉन फुलांची लागवड सुरू केली जाईल. सध्या येथे लेमन ग्रास, तुळस आदींचीही लागवड केली जात आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- ताम्हिणी घाट ठरले राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण; आंबोली आता दुसऱ्या स्थानावर
- लुप्त होणार्या वाणाला अॅड. गणेश हिंगमिरे यांनी दिले जीवदान