एस. एन. पाटील, जळगाव –
आपल्यापैकी आज बहुतांश जणांना ठिबक/ तुषार सिंचन संचाची माहिती किंवा त्याचे उपयोग संपूर्णपणे माहीत आहेत असे नाही. बहुतांश लोकांचा समज हा ठिबक म्हणजे पाण्याची बचत एवढ्यापुरताच मर्यादित आहे.
ठिबक सिंचन संचाचे बरेच उपयोग खालीलप्रमाणे आहेत.
अ) पाण्याची बचत
ब) पाण्यासोबत १००% विरघळणारे खते (विद्राव्य खते) ठिबकद्वारे दिले तर खतांची बचत मोठ्या प्रमाणात होते. आज बाजारात खते खूप महाग आहेत
क) विजेची बचत
ड) हवे तेव्हा हवे तेवढेचं पाणी व खते पिकांच्या मुळाशी देता येतात
इ) जमिनीत सतत वाफसा स्थिती ठेवता येते, जेणेकरून हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण असल्याने पिकांना त्यांच्या मूळाद्वारे योग्य शोषण करता येते.
ई) प्रत्येक पिकास एकसमान पाणी व खते मिळत असल्याने एकसमान वाढ होते
यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होते.
आपल्या भारतात ठिबक सिंचन हे १९८६ साली सर्वप्रथम जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड या संस्थेने उत्पादित करून बाजारात आणले व त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात प्रामुख्याने कापूस, ऊस, द्राक्षे, केळी, डाळिंब, आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू, पपई, मिरची, टमाटे, बटाटे, भाजीपाला, अद्रक, हळद इत्यादी पिकांसाठी प्रामुख्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच बरोबर अलीकडच्या काळात तूर, मका, सोयाबीन या पिकांसाठी सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच आता रब्बी हंगामातील भात, गहू या पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसत आहे.
तसे पाहता आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत ठिबक सिंचनाचे खालीलप्रमाणे तीन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
1. नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग
2. प्रेशर कॉम्पेसेटिंग
3. प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक
जर आपली जमीन समतोल असेल तर आपण नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरू शकतो
जमीन चढ उताराची असेल तर आपण प्रेशर कॉम्पेसेटिंग ठिबक वापरले पाहिजे
तसेच आपल्याला नियंत्रित शेतीसाठी/ संरक्षित शेतीसाठी प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक ठिबक सिंचन सद्यस्थितीत वापरले जाते
यामध्ये दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत
अ) इनलाईन ठिबक
ब) ऑनलाइन ठिबक
इनलाइन ठिबक हे प्रामुख्याने कापूस, ऊस, केळी, भाजीपाला, मिरची, टमाटे, बटाटे, अद्रक, हळद, मका, तूर, सोयाबीन इत्यादी पिकासाठी वापरली जाते.
ऑनलाइन ठिबक हे प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, डाळिंब, काजू इत्यादी या फळबागांसाठी वापरली जाते. आता या फळपिकांमध्ये नवीन अति घन/ घन पद्धतीत उंच बेडवर लागवड होत असून या पिकांमध्ये सुद्धा इनलाईन ठिबकचा वापर वाढत आहे. उंच बेड पद्धतीत जमिनील हवा व पाणी यांचे संतुलन चांगले राहत असून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. वरील सर्व प्रकारच्या ठिबक प्रकारांमध्ये खालील प्रमाणे पाण्याचे प्रवाह दर उपलब्ध आहेत-
1. नॉन प्रेशर कॉम्पेसेटिंग – २ ली/तास, ४ ली/तास, ८ ली/तास
2. प्रेशर कॉम्पेसेटिंग- १.६ ली/तास, २ ली/तास, ४ ली/तास
3. प्रेशर कॉम्पेसेटिंग विथ एंटी-लीक – १.२ ली/तास, १.६ ली/तास, २ ली/तास, ४ ली/तास
आज बाजारात अनुदानासाठी आपल्या शासनाच्या भारतीय मानक ब्युरो प्रमाणित ठिबक सिंचन वापरणे गरजेचे आहे. ज्यांना अनुदानाचा लाभ घ्यावयाचा नाही अशा शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत काही सुद्धा सुविख्यात कंपन्यांनी कुठलाही परफॉरमंस मध्ये बदल न करता ठिबक सिंचन मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत. जो ड्रिपर अनुदानीत ठिबक सिंचनात वापरला जातो तोच ड्रिपर यामध्ये सुद्धा वापरला जातो व ही इनलाईन सुद्धा काही मोठ्या व सुविख्यात / चांगल्या कंपन्या व्हर्जिन मटेरियल पासून बनवतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो.
ठिबक सिंचन घेण्यापूर्वी खालील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे –
जमिनीचा प्रकार (काळी / चोपण, मध्यम, हलकी)
ठिबक सिंचनाखाली आणावयाचे क्षेत्र (एकर मध्ये- लांबी (मी) व रुंदी (मी)
पिकातील आणि ओळीतील अंतर
पाण्याची क्वालिटी / प्रत व उपलब्धता
विजेची उपलब्धता (तास / दिवस)
पंपाचे फ्लो व हेड/ हॉर्स पॉवर
विहिरीची खोली इत्यादी
वरील सर्व प्रकारच्या इनलाईन ठिबकमध्ये दोन ड्रिपरमधील अंतराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. (२० सेमी, ३० सेमी, ४० सेमी, ५० सेमी, ६० सेमी इत्यादी) जमिनीचा प्रकार, पिकाच्या गरजेनुसार, पाण्याची गुणवत्ता, विजेची उपलब्धता व आपल्या उपलब्ध पंपाच्या फ्लो व हेडनुसार ड्रिपरचा डिस्चार्ज निवडावा. तसेच दोन रोपातील अंतर व भविष्यातील पिके (पिक बदल) या नुसार दोन ड्रीपरमधील अंतर निवडावे, जेणेकरून तेच ठिबक इतर पिकांसाठी सुद्धा त्याच जमिनीत उपयोगात येईल. याच बरोबर ठिबक सिंचन संचात खालील महत्वाच्या घटकांचा समावेश असतो.
१) पिव्हीसी/ एचडीपीइ पाइप
२) फिल्टर- पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टर घेणे गरजेचे आहे या मध्ये प्रामुख्याने खालील प्रकारचे फिल्टर उपलब्ध आहेत
अ) स्क्रीन/ डिस्क फ़िल्टर – पाणी जर विहिरीतील स्वच्छ असेल तर फक्त या फिल्टरचा वापर केला तरी चलतो
ब) सैंड फ़िल्टर (मीडिया फ़िल्टर) – पाण्यात जर शेवाळ, पालापाचोळा असेल (नदी किंवा धरण किंवा शेततळे किंवा कॅनॉल) तर या फिल्टरचा वापर करणे गरजेचे आहे.
क) सैंड सेपरेटर/ हायड्रो सायक्लोन फ़िल्टर- जर पाण्यासोबत वाळू येत असेल (बोरवेल/ नदी) तर या फिल्टरचा वापर करणे गरजेचे आहे.
वरील प्रकारच्या फिल्टर्समध्ये घाण जमा झाल्यास ते वेळोवेळी साफ करणे खूप गरजेचे आहे. खालील तीन प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत
१) साधे मैन्युअल (मनुष्य चलित)
२) सेमी ऑटोमैटिक
३) ऑटोमैटिक (स्वयंचलित)
याच बरोबर खते देण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत
अ) वेंचुरी – हा सर्वात स्वस्त पर्याय असून यामध्ये पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहत नाही प्रेशरडिफरन्स निर्माण करावा लागतो
ब) फर्टिलायझर टैंक – स्वस्त, साधा व सोपा पर्याय परंतु यात एकसमानता पाहिजे तेवढी ठेवता येत नाही
क) पिस्टन पम्प – पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो. त्यासाठी पाण्याचा प्रवाह दाब एकसारखा ठेवावा लागतो, कारण हा पाण्याच्या प्रेशरवर अवलंबून असतो
ड) इलेक्ट्रिक पम्प -पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो
इ) ऑटोमेटेड पम्प -पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो व पाण्याचा सामू व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजता येते
वरील साहित्यात आपल्या गरजेप्रमाणे आपण कुठलाही पर्याय निवडावा.
या व्यतिरिक्त वाल्व, फिटिंग्स गरजेप्रमाणे लागतात
आपण जर कसल्याही आमिषाला बळी न पडता जर चांगल्या ठिबकची निवड केली, व्यवस्थित निगा व देखभाल केली तर नक्कीच याचा फायदा आपणास बऱ्याच वर्षांपर्यंत होऊ शकतो. बऱ्याच वेळा शेतकरी स्वस्त / उधार म्हणून ठिबक संच घेतात व एक/ दोन वर्षातच बंद पडतो किंवा बदलायची वेळ येते व पुन्हा खर्च करावा लागतो. आपण जर बघितले तर सर्वात जास्त खर्च ठिबक सिंचन संचात हा इनलाइन/ ऑनलाइन ठिबक नळीचा असतो. याच बरोबर ९०% एकसमान पाणी व खते मिळाले तर खूप चांगले हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
– एस. एन. पाटील, जळगाव (मोबा. 9422292102)