धामणा गावात 90 टक्के क्षेत्रात ठिबक सिंचन
स्टोरी आऊटलाईन…
* गावातील एकूण क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्र ठिंबकखाली.
* भाजीपाला पिकांखालील सर्वाधीक क्षेत्र या गावात आहे
* गोविंदा टोंगे यांनी घेतला पुढाकार 2010 पासून ठिंबक वापरास सुरुवात
* ठिंबकवरील पिकपध्दतीमुळे उत्पादकतेत वाढ
परिवर्तनवादी गावांनी नवनव्या क्रांती आपल्या नावे केली आहे. अशाच परिवर्तनवादी आणि क्रांतीकारी गावामध्ये धामणा (ता. जि. नागपूर) या गावाचा समावेश होतो. पाण्याचे महत्व कळालेल्या या गावातील शेतकर्यांनी जल संवर्धनाकरीता सरसावत सिंचनाकरीता ठिबकचा पर्याय निवडला. त्यामध्यमातून पाणी बचतीचा वारसा हे गाव जपत आहे. गावातील एकूण क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्र ठिबकखाली आहे. राज्यात अनेक गावे पाण्याअभावी दुष्काळामुळे होरपळत असताना धामणा गावाने मात्र, बरं चाललय आमच, असा संदेश दिला आहे.
गोविंदा टोंगे यांनी घेतला पुढाकार
गावाला परिवर्तनाच्या वाटेवर नेण्यामध्ये गोविंदा आणि चंद्रभान टोंगे या दोघांचा पुढाकार आहे. गावात सर्वात आधी त्यांनी ठिंबक बसविले. गोविंदा टोंगे यांच्यासह त्यांची चार भावंड शेतीत राबतात. त्यांची एकूण जमीनधारणा 12 एकर आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे संपूर्ण शिवार ठिंबकखाली आहे. 2010 साली त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांच्या अनुकरणातून गावात ठिंबक लावण्यास सुरवात होत हे गाव 90 टक्के ठिंबकखाली आले आहे. पाणी थेंबान आणि पीक जोमान हा विचारच या गावाने आपल्या कृतीशिलतेतून प्रत्यक्षात आणला. भाजीपाला पिकांखालील सर्वाधीक क्षेत्र या गावात आहे. या पिकाच्या पाण्याच्या व्यवस्थापन ठिबकव्दारेच होते. गोविंदा आणि चंद्रभान यांनी अभ्यासूबाणा जपला होता. त्यातूनच त्यांनी राज्यातील प्रयोगशील शेतकर्यांच्या शेतांना भेटी दिल्या. शेडनेट, पॉलीहाऊससारखे हायटेक तंत्रज्ञान देखील त्यांनी डोळ्याखालून घातले. त्यातील विदर्भातील कोरडवाहू शेतीला पोषक असे तंत्रज्ञान अंगीकारण्याचे त्यांनी ठरविले. त्यामध्ये ठिंबकचा समावेश होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची संवादिनी हाताळली त्यातून ठिंबक बसविणे, वापरणे व निगा याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानंतर ठिंबक व्यवसायिकाशी संपर्क साधत संपूर्ण क्षेत्र त्यांनी ठिंबकखाली आणले. त्यावेळी पैशाची सोय नसल्याने नातेवाईकांकडून उसनवारी करावी लागली, असा अनुभव देवा टोंगे यांनी सांगीतला. आज मात्र परिस्थितीलाच टोंगे कुटूंबीयांनी शरण आणले. स्वमालकीचा ट्रॅक्टर, टूमदार घर संसाधनाचा विकास त्यांना केवळ पाणी बचतीच्या बळावर साधता आला.
कृषी विभागाने दिली चालना
धामणा गावात 40 खातेदार आहेत. त्याच्या लगत असलेल्या मोहगाव खुर्द व शिरपूरचे प्रत्येकी 78 खातेदार आहेत. धामणाचे भौगौलीक क्षेत्र 400 हेक्टर तर वहितीखाली 81 हेक्टर क्षेत्र आहे. मोहगावचे 145 हेक्टर तर शिरपूरचे 147 हेक्टर क्षेत्र आहे. या गावांमध्ये बहूतांश क्षेत्र ठिबकखाली असून केवळ दहा टक्के क्षेत्रच ठिबकविना आहे. धामना परिसरात 30.20 हेक्टर, मोहगाव 62 हेक्टर, शिरपूर 30 हेक्टर याप्रमाणे ठिंबकखालील क्षेत्र आहे. कृषी विभागाचे अनुदान मिळालेल्या क्षेत्राचीच नोंद घेण्यात आली. आर्थिकदृष्टया सक्षम शेतकर्यांनी आपल्या स्तरावर बसविलेल्या ठिबकची नोंद कृषी विभागाकडून घेतली जात नाही. कृषी सहाय्यक श्री. प्रकाश टोंगसे यांनी गावाला परिवर्तनाच्या वाटेवर नेण्यासाठी पुढाकार घेतला. ठिबकच्या जोडीला सरी वरंब्यावरील लागवडीला देखील चालना देण्यात आली. पावसाचे अतिरिक्त पाणी सरीतून निघून जाते आणि बेडवर ओलावा कायम राहतो. उत्पादकता वाढीसाठी ठिंबकच्या जोडीला हे देखील एक कारण ठरले. या तंत्रज्ञानाचा प्रसार श्री. प्रकाश टोंगसे यांनी गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर केला आहे. त्याचीच दखल घेत कृषी विभागाचे तत्कालीन अवर सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी देखील गावाला भेट देत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी या गावाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
कपाशीची वाढली उत्पादकता
ठिंबकवरील पिकपध्दतीमुळे उत्पादकतेत वाढीचा अनुभव शेतकर्यांचा आहे. देवा टोंगे यांनी कपाशीची उत्पादकता सरासरी 22 ते 25 क्विंटलची मिळविली आहे. यापूर्वी कपाशीची उत्पादकता जेमतेम 4 ते 5 क्विंटलची होत होती, असे देवा सांगतात. खासगी कंपनीत काम केल्यानंतर देवाने शेतीत कष्ट उपसण्यास सुरवात केली आणि नोकरीपेक्षा शेतीव्यवसाय फायद्याचा असल्याचा त्याचा अनुभव आहे. परंतु, पाण्याचे योग्य नियोजन करणे त्याकरीता महत्वाचे असल्याचे ते सांगतात.
ठिंबकवर केली चारा लागवड
अशोक मोहोड यांच्याकडे 4 एकर 23 गुंठे इतकी अत्यल्प जमीनधारणा आहे. हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी ठिंबकखाली आणले आहे. विशेष म्हणजे पशुपालनाचा व्यवसाय असलेल्या अशोक मोहोड यांनी नेपीयर चार्याची लागवड देखील ठिंबकवरच केली आहे. ठिंबकमुळे पाणी बचतीचा हेतू साध्य होतो. एक एकर क्षेत्राकरीता लागणार्या पाण्यात 4 एकराचे ओलीत करणे ठिबकने शक्य होते, असा आशावादी अनुभव अशोक मोहोड यांनी व्यक्त केला. चार एकरापैकी अडीच एकरावर ते कपाशीची लागवड करतात. कपाशी निघाल्यानंतर रिकाम्या झालेल्या क्षेत्रावर त्यांच्याव्दारे पुन्हा चारा लावला जातो.
दोन एकर शेती असलेल्या चंदू नागपूरे यांचे देखील संपूर्ण क्षेत्र ठिंबकखाली आहे. पाणी बचतीचे महत्व समजल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले. कपाशी व भाजीपाला पिकाची लागवड ते करतात. कुटूंबात एकमेव कर्ता व्यक्ती व खाणारी तोंडे अधिक असल्याने मजूरांचा शेतीकामी वापर परवडणारा नाही. त्याचा विचार करता चंदू यांनी पाणी व्यवस्थापनासाठी ठिंबकचा पर्याय अवलंबीला.
चेतन टोंगे हा गावातील युवा शेतकरी. वयाच्या 18 व्या वर्षीच चेतनने कुटूंबाच्या शेतीची सूत्रे आपल्याकडे घेतली. शेतीला दूग्ध व्यवसायाची जोड देण्यासाठी त्याने 3 गाईंचे संगोपन चालविले आहे. चेतनकडे जेमतेम साडेतीन एकर शेती. पाणी बचतीच्या ध्यासाने हे संपूर्ण क्षेत्र त्याने देखील ठिंबकखाली आणले आहे. चवळी, वांगी, टोमॅटो, तूर यासारखी पिके त्याने ठिंबकवरच घेतली आहेत. त्याच्या शेतात विहीर असून त्यातील पाण्याचा विनियोग सामजस्यपणे करण्याच्या दृष्टीने त्याने हे पाऊल उचलले.
जल है तो कल है असे म्हटले जाते. त्यामुळेच उद्यासाठी आजच पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. सद्यस्थितीत वातावरणातील बदल आणि त्यामुळे शेतीक्षेत्रावर अनिश्चीततेचे मळभ दाटले आहेत. धामणा गावाने मात्र परिवर्तनवादाचा वारसा जपत आणि येणार्या धोक्यांना ओळखत ठिंबकच्या माध्यमातून जलसंरक्षणाचा हेतू साधत भविष्य निश्चीत केले आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणार्या विदर्भ मराठवाड्यातील इतर गावांनी देखील या कृतीशिलतेचे अनुकरण करण्याची गरज या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.
संपर्क ः
श्रीप्रकाश टोंगसे
कृषी सहाय्यक
9404951078