न्यू यॉर्क : सोशल मीडिया सर्कलमध्ये शेतीशी संबंधित कंटेंटबाबत अमेरिकेतील ल्युबनर सिस्टर्स जगभरात प्रसिद्ध आहेत. न्यू यॉर्क फार्म गर्ल्स म्हणून त्यांची ओळख आहे. डेअरी सिस्टर्स म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सोशल मीडियाचा पुरेपूर आणि अभिनव पद्धतीने वापर करून या भगिनी नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करत आहेत. जगाला फार्मवरील वास्तविक जीवनचित्रण दाखविण्याचे कामही त्या करत आहेत.
(New York Farm Girls, Leubner Dairy Sisters Showcasing Real Life on the Farm .. Dairy Farming)
“जनरेशन झेड”च्या प्रतिनिधी ल्युबनर भगिनी
पंचविशीच्या आतील तिघी ल्युबनर भगिनी या संपूर्ण आयुष्य ऑनलाइन जगताला वाहून घेतलेल्या, नव्या पिढीच्या म्हणजेच “जनरेशन झेड”च्या प्रतिनिधी आहेत. 23 वर्षीय एव्हलिन सर्वात मोठी, त्याखालोखाल क्लॉडिया 21 वर्षांची आहे. सर्वात लहान जोजो मात्र अवघ्या 17 वर्षांची आहे. मात्र, या भगिनी फक्त ऑनलाईन आयुष्य घालवत नाहीत, तर शेती क्षेत्रातील “जनरेशन झेड”च्या प्रतिनिधी बनून ऑनलाईन जगतात वेगळा ठसा उमटवत आहेत. शेतीचे वास्तव त्या जगासमोर नेत आहेत.सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
आधुनिक काळातील दुग्धव्यवसायाचे दर्शन
ल्युबनर भगिनी शेतकऱ्यांच्या तरुण पिढीशी कनेक्ट होण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स” ही त्यांची सोशल मीडियातील ओळख आहे. आधुनिक काळातील दुग्धव्यवसाय कसा आहे, हे या न्यू यॉर्क फार्म गर्ल्स जगाला दाखवत आहेत. जनरेशन झेड म्हणजेच “जेन झेड” पिढीतील ल्युबनर भगिनींनी त्यासाठी सोशल मीडियातील सर्व प्लॅटफॉर्मवर अकाऊंट सुरू केली आहेत. इन्स्टाग्राम, टीकटॉक, फेसबुक आणि ‘युट्यूब’वर . “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”ची अकाऊंट लोकप्रिय झाली आहेत.
शेतकऱ्यांचे क्रूर चित्र रंगविल्याने खटाटोप
दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांना क्रूर आणि बेफिकीर म्हणून रंगवले जात असल्याने निराश झालेल्या ल्युबनर बहिणीनी हा सारा खटाटोप सुरू केला. त्यातूनच आपल्या पिढीला शेतीच्या, डेअरीच्या वास्तवाशी कनेक्ट करावे म्हणून एव्हलिन, क्लॉडिया आणि जोजोने सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म व आयुधांचा खुबीने वापर सुरू केला.
शेतीविषयी सोशल कंटेंट निराशाजनक
सर्वात मोठी ल्युबनर भगिनी एव्हलिन सांगते, “आम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करत होतो आणि आम्हाला दिसले, की शेती, विशेषतः दुग्धशाळेत खूप वाईट गोष्टी घडतात, असे कंटेंट अनेकांनी शेअर केलेले होते.” खरेतर, शेतकरी या नात्याने शेतकरी त्यांच्या गायी आणि पिकांची कशी काळजी घेतात, ते आम्हाला माहिती आहे. मात्र, गायी, शेतीची भरभराट व्हावी, यासाठी शेतकरी किती कष्ट घेतात, हे दर्शविणारी कोणतीही नेमकी सामग्री आम्हाला तिघींना वेबवर दिसली नाही, असे एव्हलिन सांगते.
जगाला वास्तव दाखविण्याचा निश्चय
शेतीच्या सोशल मीडियावरील नकारात्मक कंटेंटने निराश झालेल्या ल्युबनर भगिनींनी त्यानंतर जगासमोर शेती व डेअरी फार्मचे वास्तव आणण्याचा निश्चय केला. एव्हलिन सांगते, “आम्ही दररोज शेती करतो. शेतीबद्दलच्या या सोशल मीडियातील सर्व वाईट गोष्टी दाखवतात, तसे प्रत्यक्षात काहीही घडत नाही. विशेषत: दुग्धव्यवसायात तसे काहीही घडत नाही.” म्हणून मग या भगिनींनी त्यांच्या सर्व गायी आणि पिकांची चित्रे सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. 2015 पासून गेली 7 वर्षे या भगिनी नियमितपणे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहेत.
शेतकऱ्यांबद्दल स्टिरियोटाइपचा ऑनलाइन सामना
“सर्व डेअरी शेतकरी दुष्ट आहेत,” या स्टिरियोटाइपचा ल्युबनर भगिनींना ऑनलाइन सतत सामना करावा लागत आहे. त्यांचे फॉलोअर्स सुरुवातीला हळूहळू वाढले. चार वर्षांत त्यात वाढ झाली. 2019 मध्ये, टिकटॉक आल्यानंतर मात्र त्यांची एंगेजमेंट, फॉलो अर्स आणि लोकप्रियताही प्रचंड वाढली. या तरुण शेतकरी भगिनी गुरेढोरे, रोपे आणि कापणी पिकांची काळजी घेतात, तसेच यंत्रसामग्रीही चालवतात म्हणून अनेक तरुण फॉलोअर्स तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इतर तरुण त्यांचे अनुसरण करू लागले.
टीका, सूचना सहजपणे स्वीकारतात
पुढे शेतीबरोबरच, ल्युबनर भगिनींनी मागणीनुसार, त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा आणि विचारांचाही आढावा सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली. तिघी भगिनी नव्या पिढीतील असल्याने त्यांचा तरुणाईशी कनेक्ट अगदी सहज खुलत गेला. एव्हलिनच्या नुकत्याच झालेल्या लग्नाची झलक देणारे व्हिडिओही सोशल प्लॅटफॉर्मवर दाद मिळवून गेले. मात्र, कधी-कधी होणारी टीका आणि नकारात्मक सूरही त्यांना झेलावी लागते. ते सारे या भगिनी सहजपणे घेतात, अनेक सूचना स्वीकारतात.
मॅरिएटा, न्यूयॉर्क डेअरी फार्म होतेय लोकप्रिय
ल्युबनर कुटुंबाच्या मॅरिएटा, न्यूयॉर्क डेअरी फार्मचे दैनंदिन सारे व्यवहार “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”नी ऑनलाईन खुले केले आहेत. त्यामुळे त्यांच्या डेअरी फार्मची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. अनेक नवे ग्राहक जोडले जात आहेत. याशिवाय, फार्म, डेअरी उद्योगाबाबत जनतेच्या मनात नाहक पसरविले गेलेली नकारात्मकता पुसली जाऊन ग्राहकांचे गैरसमजही दूर होत आहेत. जेन झेड पिढीचा एक भाग असलेल्या या ल्युबनर भगिनी इतर क्षेत्रात जसे वकील मंडळी वकिली करतात तसे शेतीची ॲग्वोकेटिंग (AGvocating) करत आहेत. शेतीबद्दलचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने त्यांचे शेतीचे अनुभव जगाशी शेअर करणे हेच आता त्यांचे ध्येय आहे.
टिकटॉकवर साडे सहा लाख फॉलोअर्स
ऑनलाइन व्हायरल झालेल्या सामग्रीनुसार, ल्युबनर भगिनी सोशल मीडियावर ट्रेंडिंग स्टेटस ठेवतात, ट्विट व पोस्ट्स करतात. शिवाय, त्या शेतातील व डेअरी फार्ममध्ये सुरू असलेल्या दैनंदिन कर्तव्यांचेही प्रदर्शन त्यातून करतात. शेतात काम करणाऱ्या या तिघी भगिनी या आकर्षक मथळा व कॅप्शनसह सोशल अपडेट्स देतात. त्यातून त्यांचे आंतरिक विचार आणि भावना मनापासून व्यक्त करतात. त्यातून या बहिणींनी फॉलोअर्सचा एक मोठा ग्रुप तयार केला आहे. आता, “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”चे इन्स्टाग्रामवर जवळपास दीड लाख तर टिकटॉकवर साडे सहा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय, त्यांचे एक लोकप्रिय युट्यूब चॅनेलही आहे. ल्युबनर भगिनी त्यांची सर्व उत्पादने ऑनलाईन विकतात. त्यांची स्वतःची ब्रॅण्डिंग मर्चंटाईजसुद्धा आहे.
शतकाभरची कुटुंबाची शेती
ल्युबनर कुटुंबाची सुमारे 100 वर्षांपासूनची कौटुंबिक शेती आता चौथी पिढी सांभाळत आहे. तिघा बहिणींनी त्याला आता ऑनलाईन प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या प्रत्येकीची स्वत:ची अशी एक खासियत आहे. या तिघींनीही वासरांच्या गोठ्यात मदतीला हातभार लावून लहानपणीच कौटुंबिक शेतीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे शेतीतील त्यांच्या भूमिका विकसित झाल्या आहेत.
एव्हलिन सांभाळते गायी आणि कंटेंट
एव्हलिनने कॉब्लेस्कील विद्यापीठातून प्राणी विज्ञानाचा अभ्यास केला आहे. गायींचे सारे व्यवस्थापन ती सांभाळते आणि सोशल मीडियातील कंटेंटसाठी सारा शब्दांचा खेळही मुख्यत: तीच करते. ती एक उत्तम कळप व्यवस्थापक म्हणून काम करते, शेतातील 500 गायींच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टी ती कव्हर करते. याशिवाय, सोशल मीडियावर जाणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठीच्या बहुतांश लिखाणासाठी तीच जबाबदार असते.
क्लॉडियावर कॅमेरा आणि पिकांची जबाबदारी
क्लॉडियावर कॅमेरा आणि पिकांची जबाबदारी आहे. स्क्रीनवर ती सहजपणे बोलते. “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”च्या युट्यूबतु आणि टिकटॉकवरील बहुतांश व्हिडिओंमध्ये अनेकदा क्लॉडियाच दिसेल. याशिवाय, 1,800 एकरवरील गहू, सोयाबीन, सुगंधी गवत आणि मक्याच्या शेतीचा सर्व कारभार ती पाहते. या शेतात काम करण्यावर तिने लक्ष केंद्रित केले आहे. लागवड आणि कापणी करणे, तसेच कुटुंबाच्या कृषी पर्यटन व्यवसायासाठी भोपळे पिकवणे, ही कामे ती करते. मुख्य शेताजवळच हमरस्त्याला लागून 70 एकरात असलेले भोपळ्याचे मळे आकर्षक ठेवण्याचे काम क्लॉडिया करते.
धाकटी जोजो सांभाळते छोटी वासरे
सर्वात धाकटी, जोजो सध्या हायस्कूलमध्ये शिकतेय. तरीही ती फार्मची सक्रिय सदस्य आहे. ती छोट्या वासराची व्यवस्थापक म्हणून काम करते. त्यांच्या फीडिंगचे निरीक्षण करते, तसेच सोशल मीडिया खात्यांसाठी पोस्टमध्ये ती दोघी मोठ्या बहिणींना मदत करते.
“न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”च्या कामात अनेक आव्हाने
शेती प्रमाणेच, “न्यू यॉर्क फार्म गर्ल्स”च्या सोशल मीडियावरील कामात अनेक आव्हाने आहेत. ल्युबनर भगिनींच्या मिशनचा एक मोठा भाग म्हणजे जणू पडदा मागे खेचून ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या निर्मितीमागचा संपूर्ण प्रवास काय आहे, हे लोकांना दाखवणे. एव्हलिन म्हणते, “लोकांना दुग्धव्यवसायाचे वास्तव दाखवणे हे खूप मोठे आव्हान आहे. लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अरे, असेच दूध बनवले जाते किंवा अरे, त्या गायींना चांगले वागवले जाते, अशा टिप्पण्या मिळवणे, खूप आनंददायी आहे. ज्यांना शेतीबद्दल खात्री नाही, अशा लोकांवर प्रभाव पाडणे, हे आम्हाला खूप आवडणारे काम आहे.”
ऑनलाइन गोतावळा, समुदायाबद्दल कृतज्ञ
“न्यू यॉर्क फार्म गर्ल्स” या त्यांना ऑनलाइन जोडला गेलेला गोतावळा, समुदाय आणि फॉलोअर्सबाबत कृतज्ञ आहेत. ल्युबनर भगिनी म्हणतात, “जेव्हा आम्ही शेतीच्या जगात असतो आणि नेहमी शेतात असतो, तेव्हा आम्हाला थोडे वेगळे वाटते. परंतु ऑनलाइन आल्यावर आमच्या लक्षात येते, की आमच्यासारखे आणखी कितीतरी शेतकरी या जगात आहेत. मग आमची एकटेपणाची भावना कमी होते, उत्साह येतो.” ऑनलाईन फॉलोअर्स आणि शेतीतील प्रगतीही भविष्यात वाढतच राहतील, अशी या तिघी भगिनींना आशा आहे. एव्हलिन म्हणते, “आमच्याशी रिलेट होऊन जगभरातील बरेच तरुण आमचे अनुसरण करतात. म्हणून, जसजसे आमचा कारभार वाढत जाईल, तसतसे आम्ही सोशल मीडियावर आमचा समुदाय वाढवत राहू. आम्ही अधिकाधिक, नवनवीन गोष्टी शेअर करीत राहू आणि लोकांना शेतीबद्दल शिकवत राहू.”
Comments 8