‘ॲग्रोवर्ल्ड’ने राष्ट्रीय हवामान तज्ञांच्या माहितीच्या आधारे आधीच सांगितल्यानुसार, राज्यात पुन्हा पावसाचे दिवस येणार आहेत. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही आता ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या वृत्तास दुजोरा दिला आहे. अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीने येत्या काही दिवसांत थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. आज, 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून महाराष्ट्रातील हवामान बदलण्यास सुरुवात होईल. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. “स्कायमेट”नेही राज्यात पावसाचा अंदाज आधीच जाहीर केला होता.
उत्तर भारतातील परतीचे मोसमी वारे आणि सध्याच्या हवामान स्थितीमुळे अरबी समुद्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील या चक्रिय स्थितीमुळे, महाराष्ट्रातील अनेक भागात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
पुणे शहरासह लगतच्या परिसरातही पाऊस
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुणे शहर परिसरासह राज्याच्या बहुतांश भागात 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल, असे पुणे आयएमडीचे हवामान अंदाज विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले. पुणे शहरासह लगतच्या परिसरातही वातावरण ढगाळ राहील. रविवार, 15 ऑक्टोबर आणि सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी पुण्यात हलक्या-मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कश्यपी यांनी वर्तविली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या इतर भागातही हलका- मध्यम ते पृथक मुसळधार पाऊस होईल, असे आयएमडीचे अनुमान आहे.
उत्तरेतील बर्फवृष्टीने राज्यातील तापमानात होणार घट
अरबी समुद्रातील नव्या चक्रीय स्थितीमुळे येत्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सामान्य सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशातही या हवामान स्थितीचा प्रभाव पडेल. मान्सूननंतरच्या माघारीच्या टप्प्यात या वेस्टर्न डिस्टर्बन्सची निर्मिती होत असल्याने मुंबईतही रिटर्न मान्सूननंतर लगोलग पाऊस पडण्याची घटना आठ वर्षानंतर प्रथमच होणार आहे. हिमालयात जोरदार बर्फवृष्टी होण्यासाठी शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे देखील राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोकणात अजूनही पाऊस सुरूच, भातपीक धोक्यात
मान्सून परतला, असे आयएमडीने जाहीर केल्यानंतरही कोकणात अजूनही पाऊस सुरूच आहे. सकाळी दाट धुके, ढगाळ वातावरण आणि सायंकाळी विजांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस असे सध्या कोकणातील चित्र आहे. काही भागात तर ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा बसत आहे. वैभववाडी परिसराला गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या पावसाने भातपिकाचे नुकसान होत आहे. काही भागात उंच वाढलेल्या भातपिकांनी माना टाकल्या असून लोंबी जमीनीला टेकली आहे. मळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास ही लोंबी वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. कापणीलाही पावसाने अडथळे येणार आहेत.
मराठवाडयालाही मिळणार ‘ऑक्टोबर हीट’पासून दिलासा
बदलत्या स्थितीमुळे मराठवाडयालाही ‘ऑक्टोबर हीट’पासून दिलासा मिळणार आहे. मराठवाडयातील सर्वच जिल्ह्यात येत्या तीन-चार दिवसानंतर किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील कमी दाब अन् वादळे
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भारतीय समुद्रांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा प्रमुख वादळी हंगाम आहे. मार्च ते मे पर्यंतचा मान्सूनपूर्व हंगाम वादळांसाठी मान्सूननंतरच्या कालापेक्षा तुलनेत थोडासा सौम्य असतो. असे असले तरी, या वर्षी दोन चक्री वादळे मान्सूनआधीच तयार झाली. ही दोन्ही अत्यंत तीव्र चक्री वादळे होती. बंगालच्या उपसागरात मोचा आणि अरबी समुद्रात बिपरजॉयने यंदा पावसाळ्याआधीच तडाखा दिला.
यंदा मोचा, बिपरजॉयने; गेल्या वर्षी सित्रांग, मंडौस
भारतीय समुद्रात एका वर्षात सरासरी 4-5 उष्णकटिबंधीय वादळांची वारंवारता असते. त्यात बंगालच्या उपसागराचा 60% तर उर्वरित 40% अरबी समुद्रात निर्माण होतात. गेल्या वर्षी, बंगालच्या उपसागरात मान्सूननंतरच्या काळात सित्रांग आणि मंडौस ही दोन चक्रीवादळे निर्माण झाली. सित्रांगने बांगलादेशात धडक दिली, तर तीव्र चक्रीवादळ मंडौस तामिळनाडू किनारपट्टीकडे वाटचाल करत असताना समुद्रावरच कमकुवत झाले आणि चेन्नईजवळचा किनारा ओलांडत विसर्जित झाले.
सध्या निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाबाबत…
सध्या अरबी समुद्राच्या आग्नेय भागात, विषुववृत्तीय प्रदेशाच्या पुढे चक्रीवादळ परिस्थिती निर्माण होत आहे. 15 ऑक्टोबरच्या सुमारास दक्षिणपूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होईल. ते पुढील 72 तासांत महासागराच्या अत्यंत दक्षिण-मध्य भागांवर बदलू शकते आणि कमी दाबाचे क्षेत्र बनू शकते. सध्या तरी ते कमजोर दिसत आहे. मात्र, या हवामान प्रणाली 10°N अक्षांश ओलांडल्यानंतरच वाढू लागतात. अर्थात ही प्रणाली मजबूत झाली तरी या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीकडे ट्रॅक बदलण्याची फारच कमी शक्यता आहे. सध्याच्या हवामानविषयक नोंदी त्याचा मार्ग सोमालिया, एडनचे आखात, सोकोत्रा बेटे, येमेन आणि ओमानकडे सूचित करतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- राज्यातील ‘या’ भागात रविवारी, सोमवारी पडणार पाऊस; उकाडा झालाय कमी
- पावसावर इंडियन निनोचा प्रभाव, पुढील महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता