मुंबई : Chara Tanchai… शेतीसोबत पशुपालन हा पूर्वापारपासून चालत आलेला जोडधंदा आहे. शेती उत्पादन निघाल्यानंतर पिकाचे उरणारे अवशेष चारा म्हणून वापरले जातात. त्यामुळे शेतकर्यांकडून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला प्रथम प्राधान्य दिले जाते. मात्र, रासायनिक खतांच्या वापर, पाण्यावर अवलंबून असलेली शेती, कमी अधिक पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान या सारख्या प्रकारांमुळे चारा मिळणे कठीण झाले आहे, परिणामी जनावरांची प्रकृती खालावून दुग्ध उत्पादन घटत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका तंत्रज्ञानाविषयी सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन पशुपालक शेतकरी कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यात हिरवा आणि पौष्टीक चार्याचे उत्पादन घेवू शकतात. चला तर मग जाणून घेवूया… काय आहे हे तंत्रज्ञान.., कसा केला जातो वापर… आणि फायदे काय?
शेती मालाचे उत्पादन वाढावे यासाठी जसे पिकांना खते वगैरे देणे गरजेचे आहे, तसेच जनावरांची दुध देण्याची क्षमता वाढावी, यासाठी त्यांना हिरवा, पैष्टीक चारा मिळणे गरजेचे आहे. राज्यातील बर्याच भागात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जनावरांना पावसाळ्यातच हिरवा चारा उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने जनावरांना कुट्टी, वाळलेले गवत यासारखा सुका चारा खायला मिळतो. त्यामुळे अनेक शेतकर्यांना चारा विकात घ्यावा लागतो. मात्र, या सर्वांवर हायड्रोपोनिक तंत्र उत्तम पर्याय ठरत आहे.
कमी जागेत अधिक चारा
हायड्रोपोनिक तंत्राद्वारे कमी जागेत, कमी पाण्यात व कमी वेळेत पौष्टिक हिरवा चार्याचे उत्पादन घेता येते. त्यासाठी सर्वात आधी आसरा तयार करणे गरजेचे असते. शेड तयार करतांना त्यामधील तापमान, आद्रता नियंत्रित ठेवता येईल याची काळजी घ्यावी, शेड बनवण्यासाठी बांबू, लाकूड, लोखंडी पाईप, शेडनेटचे कापड किंवा जुन्या साड्यांचा वापर करू शकतो. चारा निर्मिती करतांना स्वयंचलित सूक्ष्मसिंचनाद्वारे किंवा पंपाद्वारे बाहेरील वातावरणानुसार ठरावीक कालावधीमध्ये पाणी मारावे लागते.
अशी करा बियाण प्रक्रिया
हायड्रोपोनिक पद्धतीने चारा लागवड करतांना मका, गहू, बाजरी यासारखे बियाणे वापरले जाते. बियाणे निवड करतांना ते चांगल्या प्रतीचे, स्वच्छ, कीडमुक्त, प्रक्रिया न केलेले, चांगली उगवण क्षमता असलेले असावे. उगवण प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मका बियाणे 4 ते 5 तास पाण्यात चांगले भिजवावे. त्यानंतर 1 ते 2 दिवस गोणपाटात दडपून ठेवावे. असे केल्यास बियाण्याला कोंब फुटतात. कोंब आलेले बियाणे ट्रेमध्ये स्थलांतरित करावे. चारा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ट्रे निर्जंतुक करणे महत्वाचे आहे, जेणेकरून ट्रेमध्ये बुरशीची वाढ होणार नाही.
अशी आहे चारा उत्पादन पद्धत
चारा लागवड करतांना प्रति एक मीटर वर्ग ट्रे मध्ये 6 ते 8 किलो बियाणे वापरावे. बियाणे पेरतांना सुटसुटीत पेरावे, जास्त दाट झाल्यास त्यास बुरशी लागून उत्पादन घटू शकते. ट्रे मधील बियाण्यांना 1 ते 2 दिवसानंतर कोंब फुटण्यास आणि पुढील 2 ते 3 दिवसांनी मुळांची वाढ होण्यास सुरवात होते. साधारणतः सात ते दहा दिवसामध्ये पिकाची काढणी करणे आवश्यक आहे.
हिरव्या चार्याची वाढ होताना रोपांमध्ये पाण्याची वाढ होते, तर शुष्क पदार्थ म्हणजेच एकूण अन्नद्रव्यांची घट होते. एक किलो मका बियाणांपासून 7 ते 10 दिवसांत 8 ते 10 किलो हिरवा चारा तयार होतो. बियाणांचा दर्जा व प्रकारानुसार रोपांची 10 ते 30 सेंमी उंचीपर्यंत वाढ होते. बियाणांमध्ये असलेल्या स्टार्चचा वापर करून रोपे मोठी होतात. त्यामुळे शुष्क पदार्थांचे प्रमाण कमी होते, पाणी शोषले जाते. प्रथिने व तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण वाढते.
असे आहेत चारा निर्मितीचे फायदे
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा निर्मिती करतांना कमी जागा व पाणी लागते. शिवाय मातीची आवश्यकता नसल्याने अवघ्या 8 ते 10 दिवसात चारा उपलब्ध होतो. शेतामध्ये चारा तयार होण्यासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. एक किलो बियाण्यापासून 7 ते 8 किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चार्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दुष्काळी भागांत तसेच अल्पभुधारक शेतकर्यांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठे फायद्याचे आहे.