शेतकऱ्यांनो सावधान राहा, कारण महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे असतील. गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मुंबई-पुण्यासह सुरत, इंदूरला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान प्रणालींतील अचानक बदलामुळे या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. हा पाऊस रब्बी पिकाला फायदेशीर ठरणार असला तरी काही पिकांसाठी तसेच उघड्यावरील कृषी जिन्नस साठवणुकीसाठी नुकसानीचा ठरू शकेल.
भूमध्य समुद्रावर कमी दाबाचे नवे क्षेत्र
शनिवार, 25 नोव्हेंबरपासून वायव्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे IMD ने म्हटले आहे. कमी दाबाच्या नव्या पट्ट्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे. भूमध्य समुद्रावर तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्रामुळे आर्द्रता वाढू शकेल. अशा आर्द्रतेचे ढग मग पूर्वेकडे सरकताना मध्य व उत्तर भारतात पाऊस घेऊन येतात.
तामिळनाडू, केरळमध्ये अवकाळी पावसाचा कहर
सध्या तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहेत. या पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाने तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूह, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशातही गडगडाटासह पावसाची शक्यता कायम आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
एकत्रितपणे, या प्रणाली शुक्रवार ते पुढील सोमवार म्हणजेच 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण राजस्थान, गुजरात, नैऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तसेच किनारपट्टी क्षेत्रात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस घेऊन येतील. काही ठिकाणी वादळ व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. रविवारी, 26 नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर अधिक राहू शकतो.
देशातील काही भागात 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता
सोबतचे छायाचित्र पाहिल्यास, नकाशातील गडद निळसर रंगातील भागात 15 मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. हिरव्या, पिवळ्या, केसरी वा लाल रंगातील भागात अधिक जोरदार पावसाची अपेक्षा आहे. या ठिकाणी 16 मिमी ते सुमारे 200 मिमीदरम्यान पाऊस होऊ शकतो. त्यानुसार, विशिष्ट क्षेत्रातील रहिवाशांना स्थानिक हवामानाच्या परिस्थितीबद्दल, विशेषत: गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी ‘जागरूक राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
नोव्हेंबरमधील पाऊस काही ठिकाणी नेहमीचाच
सुरत, इंदूर, मुंबई आणि पुण्यासह शेजारील जिल्ह्यातही गडगडाटी पाऊस व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबरमधील पाऊस हा असामान्य असला तरी, पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागांसाठी हा अवकाळी पाऊस पूर्णपणे अपरिचित नाही. काही राज्यांमध्ये या महिन्यात 15 मिमी पर्यंत पर्जन्यवृष्टी नोंदवली जाते, त्यामुळे पावसाचा सरासरी कोटा पूर्ण होण्याचीही शक्यता असते.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता
येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस किंवा बर्फाचा अंदाज आहे. याशिवाय, उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतात धुके पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे या आठवड्याच्या शेवटी आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या वायव्य मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, या काळात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.