नगरमधील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार ठरली आहे. त्यातून त्याच्या ऊस शेतीला संजीवनी मिळाली आहे. शुभम उपासनी असे या तरुणाचे नाव आहे. तो स्वतः उच्च विद्याविभूषित आहे. बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) केल्यानंतर त्यांने एम.बी.ए (मॉर्केटिंग) केले आहे. त्यानंतरही त्याची शेतीत रमल्याची स्टोरी तितकीच इंटरेस्टिंग आहे.
घरची वडिलोपार्जित 15 एकर जमीन… पाण्याची चोवीस तास मुबलकता, मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला आणि ऊस शेतीला संजीवनी मिळाली असून ऊसाच्या फडात बसविलेल्या सौर संचामुळे 12 एकर शेती बहरून आली आहे.
साडेसात अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथील पदवीधारक तरूण शेतकरी शुभम उपासनी याने ऑक्टोबर 2020 मध्ये वडिलांच्या नावावर शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेत अर्ज केला. या योजनेत त्यांची निवड होऊन त्यांच्या शेतात ऑक्टोबर 2021 मध्ये साडेसात अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप बसविण्यात आला.
सोलर पंपाने ऊसाची शेती करणे फायद्याचे
सोलर पंप बसण्यापूर्वी ऊस शेती करतांना कसरत करावी लागत होती. वीजेच्या अनियमितेमुळे ऊसाला पाणी देतांना तारांबळ होत होती. कधी कधी तांत्रिक कारणांमुळे आठ-दहा दिवस विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठे नुकसान व्हायचे. आता मात्र 12 एकर ऊस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज साध्य होत आहे. त्यामुळे ऊसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे. असे शुभम उपासनी यांनी सांगितले.
खुल्या प्रवर्गातून 90 टक्के अनुदानावर मिळाला पंप
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. या पंपाची खुल्या बाजारात साधारणतः चार ते साडेचार लाख रूपये किंमत आहे. शुभम उपासनी याने यासाठी 10 टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर (सौर) संच मिळाला. शक्ती सोलर कंपनीच्या ह्या संचाला साडेसात अश्वशक्तीचा पंप जोडण्यात आला.
येरवडा कारागृहात कैदी करताहेत सेंद्रिय शेती
दिवसाला दीड एकर ऊसाच्या क्षेत्रात सिंचन
सध्या सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विनाअडथळा हा पंप सुरू आहे. सध्या दिवसाला दीड एकर ऊसाच्या क्षेत्रात सिंचन होते. सोलर पंप संच मिळवून देण्यासाठी शुभमला महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत सोनवणे, विठ्ठल हारक, बाळू घोडे, संजय गवारी, सचिन पाटील यांची मदत झाली.
बीटेक (फूड टेक्नोलॉजी), एमबीए (मॉर्केटिंग) शुभम स्वतः उच्च विद्याविभूषित आहे. बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) केल्यानंतर त्यांने एम.बी.ए (मॉर्केटिंग) केले आहे. वडिल सतीश उपासनी खासगी अनुदानित संस्थेत लिपिक आहेत. घरी आजोबा, आई, बहिण व पत्नी असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी शुभम वर आहे. शेतीच्या कामात वडील व आजोबांचे त्याला नेहमी मार्गदर्शन होत आहे व परिवाराची मदत होते.
शेतीपूरक व्यवसाय : डांगी, जर्सी, गीर गायींचा गोठा शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायींचा गोठाही शुभमने उभा केला आहे. सध्या त्याच्याकडे डांगी, जर्सी व गीर गायी आहेत. यातून दूग्ध उत्पादनासोबतच शेणखत उपलब्ध होते. या शेणखताच्या माध्यमातून सेंद्रीय पध्दतीने शेती करणं शक्य होतं आहे. भविष्यात पॉली हाऊसच्या माध्यमातून पीक उत्पादन घेण्यावर भर देणार आहे. तसेच सूक्ष्म सिंचन, सेंद्रीय खत व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करत आधुनिक पध्दतीने शेती केली तर शेती निश्चितच फायदेशीर ठरेल. असेही शुभम उपासनी यांने सांगितले.