मुंबई : महाराष्ट्रात गेले कित्येक वर्ष थॉम्पसन सिडलेस, सोनाका, माणिक चमन व किसमिस चरनी या द्राक्षांची लागवड केली जाते. मात्र, आता अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेवू लागले आहेत. अशातच एका शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात नवीन वाणाचा शोध लावलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या वाणाचे नाव, या वाणाचा कसा शोध लागला?
सांगली जिल्ह्यातील प्रयोगाशील द्राक्ष बागायतदार जयकर माने यांनी या काळ्या द्राक्षातील नवीन वाणाचा शोध लावला आहे. जयकर माने हे पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे राहतात. दरम्यान, काळ्या द्राक्षातील या नवीन वाणाला ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच या विकसित केलेल्या नवीन वाणाला दिल्ली नॅशनल रिसर्च सेंटरचे पेटंटही मिळालेले आहे.
2012 पासून सुरू केला प्रयोग
गेल्या वीस वर्षांपासून जयकर माने हे शेती करत असून त्यांनी द्राक्षांमधील अनेक वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. कृषी सेवा केंद्रात देखील माने यांनी काही काळ काम केले आहे. त्यामुळे माने यांचा चांगला अभ्यास झाला आहे. माने यांनी 2012 पासून रोगाला बळी न पडणारी आणि चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाचे नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला.
2018 मध्ये नवीन वाण विकसित करण्यात यश मिळाले
माने यांनी नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला आणि त्यांनी सुरुवातीला जंगली द्राक्ष वेलीच्या एका काडीवर वेगवेगळ्या वाणाचे डोळे भरले. असे करत असतानाच 2018 मध्ये नवीन वाणाच्या विकसित करण्यामध्ये अखेर माने यांना यश मिळालं. त्यानंतर माने यांनी तीन एकर शेतात या नवीन वाणाच्या द्राक्षाची लागवड केली.
असे पडले या वाणाला नाव
या वाणाचे नाव ब्लॅक क्वीन बेरी असे का ठेवण्यात आले? यावर माने सांगतात की, इंग्लिश मध्ये नाव असावं या हेतूने आणि कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या नावानुसार या नवीन वाणाला ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असं नाव दिलं आहे. ब्लॅक क्वीन बेरी या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे आणि या द्राक्षाची चव बघून मागणी देखील चांगली मिळत आहे, असं देखील जयकर माने सांगतात. तसेच या नवीन वाणाला 15 नोव्हेंबर 2022 रोजी एनआरसी कडून पेटंट देखील मिळाले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇