ही यशोगाथा आहे मायभूमीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका देशभक्त धाडसी भारतीय जोडप्याची. पती अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात एका आघाडीच्या मल्टीनॅशनल कंपनीत डेटा इंजिनियर आणि पत्नी अमेरिकेतच जगातील अव्वल आयटी कंपनीत इंजिनियर. या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून गावाकडे परतून कृषीपूरक व्यवसाय करणे सर्वांनाच जमणारे नाही. मात्र, अमेरिकेतील नोकरी सोडून या इंजिनियर जोडप्याने हिंमत केली अन् दोन कोटींचा लाडू उद्योग उभा केला.
संदीप जोगीपार्टी आणि कविता गोपू या जोडप्याच्या हिकमतीला आपणही सलाम कराल. कोविड काळातील अनिश्चिततेच्या गर्तेत या अभियंता जोडप्याने गावाचा रस्ता धरला आणि अवघ्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून आता दोन कोटी रुपयांचा लाडू व्यवसाय उभा केला आहे.
हैदराबादमध्ये “लड्डू बॉक्स”ची स्थापना
संदीप आणि कविता यांनी 2020 मध्ये हैदराबादमध्ये “लड्डू बॉक्स” या ॲग्री फूड स्टार्ट अपची स्थापना केली. आज ते संपूर्ण भारतात हाताने बनवलेल्या पारंपरिक मिठाईचा पुरवठा करत आहेत. विशेष म्हणजे ते हैदराबाद वगळता भारतात सर्वत्र फक्त ऑनलाईन विक्री करत आहेत. त्यांच्या कोणत्याही उत्पादनात साखर किंवा कृत्रिम फूड प्रिझर्वेटीव्ह वापरले जात. सर्व उत्पादने शुद्ध शाकाहारी आहेत. बाजरी, कडधान्ये आणि सुक्या मेव्यावचे अनेक प्रकारचे लाडू “लड्डू बॉक्स”मधून दिले जातात.
मातृभूमीची ओढ घेऊन आली व्यवसायात
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये डेटा अभियंता म्हणून काम करतानाच संदीप जोगीपार्टी यांना हैदराबादला परत जाण्याची ओढ लागली होती. स्वतःच्या उद्योजकीय कौशल्यावर त्यांचा विश्वास होता. सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या कविता गोपू यांनीही कोणत्याही निर्णयात साथ देण्याचे सांगून पतीला आत्मविश्वास दिला. परदेशात पाच वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, या जोडप्याला गावाची माती खुणावत होती. दोघांनी अमेरिकेतील नोकरी सोडली आणि भारतात स्थलांतर केले. मायदेशी परतल्यावर या जोडप्याने आपल्या उद्योजकीय स्वप्नांचा पाठपुरावा सुरू केला.
देशभर फिरून केला व्यवसायसंधीचा अभ्यास
2019 मध्ये हैदराबाद, तेलंगणा येथे मूळ गावी परतल्यावर, या जोडप्याने देशभर भटकून अनेक व्यवसाय पाहिले. विविध उद्योजकतेच्या संधी, लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि बाजारपेठेतील खात्रीशीर मागणी निश्चित करण्यासाठी त्यांनी देशभरात सहा ते आठ महिने प्रवास केला. अनेक योजनांवर विचार करून शेवटी शॉर्टलिस्ट केलेल्या श्रेणींमध्ये, त्यांना फूड आणि फिटनेस विभागाकडे कल वाटला. त्यातूनच मग “लड्डू बॉक्स” उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
गोडघाशा मंडळींना मधुमेहाचा धोका टाळून पर्याय
संदीप सांगतात की, “माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून मला गोड खायला आवडते. मात्र, मधुमेहाच्या धोक्यामुळे मर्यादा येतात, गोड खायचे चोचले फारसे पुरवता येत नाहीत. बाजारात अनेक एनर्जी बार, प्रोटीन बार आणि इतर उत्पादने उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्यामध्ये अनेक अज्ञात घटक आहेत, जे ग्राहकांना समजणे कठीण आहे. गोडघाशा मंडळींना मधुमेहाचा धोका टाळून पर्याय देता येणे शक्य होईल का, याचा आम्ही विचार केला. शेवटी एक आरोग्यदायी पारंपरिक मिठाईचा पर्याय तयार करण्याचा विचार नक्की केला.”
एनर्जी बार भारतात फारसे लोकप्रिय नाही, लाडू बेस्ट
“तसेही एनर्जी बारमधील उच्च प्रथिने सामग्री एखाद्याच्या प्रकृतीस अनुरूप नसेल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, जसे की सूज येणे आणि अपचन. त्यामुळे भारतीयांमध्ये एनर्जी बार फारसे लोकप्रिय नाहीत. फक्त काही फिटनेस उत्साही लोक त्यांचे नियमित सेवन करतात. त्यामुळे आम्हाला असे उत्पादन तयार करायचे होते, जे केवळ साखरेची लालसा भागवते असे नाही, तर त्यात पौष्टिक घटक देखील असतात,” संदीप जोगीपार्टी यांनी “लड्डू बॉक्स”मागील नेमकी संकल्पना स्पष्ट केली.
भारतीयांना गोड पदार्थ, मिठाई अधिक प्रिय
रसगुल्ला, गुलाब जामुन, बर्फी, सोन पापडी, पेडा, लाडू इ. भारतीय पॅकेज्ड मिठाई बाजार 2023 मध्ये 6,229.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे मार्केट रिसर्च फर्म IMARC ग्रुपने म्हटले आहे. 2024-2032 मध्ये त्यात 16.67 टक्के वाढ होऊन पॅकेज्ड मिठाई बाजार 2032 पर्यंत 25,970.8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
ऑनलाईन-ऑफलाईन सहज उपलब्धता
वाढती लोकसंख्या, रेडी-टू-सर्व्ह प्रकारांकडे ग्राहकांचा वाढता आणि पॅकबंद मिठाईची ऑनलाईन आणि ऑफलाईन वितरण चॅनेलद्वारे सहज उपलब्धता हे भारतीय पॅकेज्ड मिठाई बाजाराला चालना देणारे काही महत्त्वाचे घटक आहेत. संदीप आणि कविता यांनी याच संधीतील आपला एक छोटासा घास घेण्याचे ठरवले.
घरा-घरातीलच पारंपरिक पाककृतींवर संशोधन
या जोडप्याने त्यांच्याच आसपास घरा-घरात वापरल्या जाणार्या लाडूंच्या पारंपरिक पाककृतींवर संशोधन करायला सुरुवात केली. साखरेच्या कॅलरींच्या जागी आरोग्यदायी पर्याय वापरण्याची कल्पना असल्याने दोघांनी उसाच्या गुळाचा पर्याय निवडला. गूळ एक अपरिष्कृत नैसर्गिक गोडवा आहे आणि त्यात लोह, फायबर आणि खनिजे असतात. याउलट साखरेत कोणतेही पोषक तत्व नसतात.
सुरुवातीला एक्स्पो, आयटी कंपन्यांमध्ये मार्केटिंग
संदीप-कविता सांगतात, “सुरुवातीच्या दिवसांत, आम्ही वेगवेगळ्या एक्स्पोमध्ये आणि आयटी कंपन्यांमध्ये आमच्या हाताने बनवलेल्या मिठाईचे स्टॉल्सद्वारे मार्केटिंग केले. चव आणि गुणवत्ता यावर आमचा नेहमीच कटाक्ष राहिला. त्यातून हळूहळू आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांकडून फॉलो-अप कॉल सुरू झाले. सुरुवातीची आमची गुंतवणूक फक्त एक लाख रुपये होती.”
व्यवसाय सुरू करताच कोविडचे आव्हान
या जोडप्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर, काही महिन्यांतच कोविडचा प्रादुर्भाव झाला. मे 2020 मध्ये “लड्डू बॉक्स” अधिकृतपणे लाँच झाला असला तरी, महामारीच्या काळात उत्पन्नाच्या सतत स्रोताशिवाय स्टार्टअप चालवणे हे एक आव्हानात्मक काम होते. तेव्हा कोविडमुळे झाला संपूर्ण ऑपरेशन दोन महिने बंद झाले. लॉकडाऊननंतर कंपनीला सुरक्षेच्या अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. व्यवसायाच्या अगदी सुरुवातीलाच हा फटका बसल्याने संदीप-कविता यांना व्यवसायातील खाच-खळग्याचा अनुभव आला. त्यातून उत्पादनखर्च कमी ठेवून इतर वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा धडा त्यांना मिळाला. व्यवसायात कोणत्याही क्षणी, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मानसिकताही तयार झाली.
कोविडने अधोरेखित केले निरोगी खाण्याचे महत्त्व
कोविडने निरोगी खाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि लवकरच लड्डू बॉक्सला ग्राहकांचा एक स्थिर आधार मिळाला. चार उत्पादनांपासून सुरुवात करून, लड्डू बॉक्स आता मल्टीग्रेन लाडू, बाजरी लाडू, मूग डाळ लाडू, फ्लेक्स सीड लाडू, ड्रायफ्रूट लाडू, चिक्की लाडू आणि इतर असे 15 प्रकारचे लाडूंचे पर्याय ऑफर करते. कोणत्याही उत्पादनात साखर, कृत्रिम प्रीझर्वेटीव्ह, कृत्रिम रंग किंवा कृत्रिम इसेन्स (चव) न घालता मिठाई बनवली जाते. नवी उत्पादने हळूहळू विकसित केली गेली आणि त्यावर अजूनही काम चालू आहे.
देशभरात लवकरच 100 स्टोअर सुरू करणार
कविता या संपूर्ण ऑपरेशन्स सांभाळतात, संदीप मार्केटिंग पाहतात. त्यांच्याशिवाय इतर तीन पूर्णवेळ कर्मचारी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात लड्डू बॉक्सची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपये होती. या स्टार्टअपने 2025 पर्यंत बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई आणि दिल्ली एनसीआरमध्ये सुमारे 100 स्टोअर उघडण्याची योजना आखली आहे.
गूळ, कच्च्या मालाची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी
संदीप लड्डू बॉक्सच्या वाढीचे श्रेय आरोग्याबाबत दक्षतेला देतात. बाजारात ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करण्याचा दावा करणारी साखर-मुक्त उत्पादने उपलब्ध आहेत, तरीही त्यामध्ये अनेकदा एस्पार्टम आणि इतर हानिकारक पदार्थ असतात. लड्डू बॉक्स मात्र केवळ पाच किंवा त्याहून कमी घटक वापरून पोषण मूल्यांवर लक्ष केंद्रित करतात.
लाडूंचा अविभाज्य भाग असलेला गूळ भेसळीसाठी अत्यंत असुरक्षित असल्याने, त्याचे सोर्सिंग महत्त्वाचे आहे. उत्तम दर्जाची खात्री करण्यासाठी गूळ आणि इतर कच्चा माल थेट तेलंगणा आणि महाराष्ट्रातील स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतला जातो.
मिलेट आधारित मिठाई, इतरही बरेच काही
बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या गुळात काय चांगले मिसळते हे समजून घेण्यासाठी कंपनी सतत कच्च्या मालावर प्रयोग करत राहते. बाजरी आणि इतर मिलेट्स देखील वापरली जातात, कारण ते ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करतात. बाजरीमुळे रक्तातील साखर त्वरीत वाढण्याऐवजी हळूहळू वाढ होत असल्याने, मधुमेही रुग्ण किंवा वजन कमी करू पाहणारे किंवा निरोगी जीवनशैली जगू पाहणारे कोणीही बाजरीला प्राधान्य देतात. रिफाइंड मैदा किंवा इतर धान्ये यापेक्षा बाजरी वापरणे केव्हाही चांगले.
आरोग्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत
25 दशलक्ष टन वार्षिक जागतिक उत्पादनासह, बाजरी 4,000 वर्षांपासून वापरात आहे. ते प्रथिने, फायबर, मुख्य जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्रोत आहेत. मीलेट्स-आधारित उत्पादनांबाबत भारत सरकारने अलीकडेच चालविलेल्या मोहिमेबद्दल संदीप सांगतात की, यामुळे त्यांच्या पौष्टिक मूल्यांबद्दल आणि आरोग्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत झाली आहे, ज्यामुळे लड्डू बॉक्स उत्पादनांची मागणी वाढली आहे.
गूळ घालून बेसन, नारळ, ड्रायफ्रूटस् लाडू
लड्डू बॉक्स विविध प्रकारचे लाडू बनवण्यासाठी मोती बाजरी, कोल्हाळ बाजरी आणि नाचणी वापरतात. तसेच गूळ घालून बेसन आणि नारळाचे लाडू बनवतात. मनुका, काजू आणि क्रॅनबेरीसह सुक्या फळांचा वापर इतर प्रकार बनवण्यासाठी केला जातो.
लड्डू बॉक्स कंपनी स्टार्टअप स्टीव्हिया सारख्या इतर नैसर्गिक स्वीटनर्सवर देखील काम करत आहे. स्टीव्हिया रिबॉडिना (Stevia Rebaudiana) हे वनस्पतीपासून काढलेले, नेहमीच्या साखरेपेक्षा सुमारे 250 पट गोड असते. हे सहसा अवांछित वजन वाढण्यास आणि रक्तातील साखरेच्या वाढीस कारणीभूत ठरत नाही, कारण त्यात कॅलरी आणि कमीतकमी कार्बोहायड्रेट्स नसतात.
99 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत लड्डू बॉक्स
लड्डू बॉक्सची किंमत रु. 99 ते रु. 500 पर्यंत आहे. याशिवाय, गिफ्ट हॅम्पर्स आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग पर्याय देखील आहेत. महत्त्वाचे म्हणजे, लड्डू बॉक्समधील प्रत्येक लाडूचे वजन 28 ग्रॅम असते, हे ग्राहकांसाठी कमी अपव्यय आणि आरोग्यदायी पोर्शन आकार सुनिश्चित करते. इतर उत्पादक साधारण 40 ग्रॅमचा एक लाडू बनवतात.
लड्डू बॉक्स उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे देशभरात लाडू पुरवतात. याशिवाय, काही B2B चॅनेलसह भागीदारी केली आहे, जे मोठ्या प्रमाणात उत्पादने खरेदी करतात. कंपनीचे हैदराबादमध्ये एक स्टोअर देखील आहे. अशा तीन चॅनेलद्वारे ग्राहकांना माल पुरवला जातो.
‘फीडिंग इंडिया’ कार्यक्रमांतर्गत यूपीमध्ये मिलेट्स लाडू
उत्तर प्रदेश सरकारच्या भागीदारीत लड्डू बॉक्स ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटोला सवलतीच्या दरात मिलेट्स लाडू पुरवतो. झोमॅटोद्वारे, यूपी सरकारच्या ‘फीडिंग इंडिया’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील कुपोषित मुलांमध्ये या एनर्जी लाडूंचे वितरण करते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषी सल्ला : भात पेंढा साठवण व उपयोग; साठवणुकीत कीड संरक्षण; अवशेष व्यवस्थापन
- तूर : थंडीपासून संरक्षण व कीड नियंत्रण