AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान झपाट्याने सर्व क्षेत्र व्यापत आहे. शेतीतही हळूहळू नवतंत्रज्ञान वापरले जात आहे. एका शेतकऱ्याने AI यशस्वी प्रयोग केला आहे. या तंत्रज्ञानामुळे टोमॅटोच्या शेतीत उत्पन्न वाढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा परिणाम आता बांधापर्यंत पोहोचताना दिसून येत आहे. शेतकरीही आता पारंपरिक शेती सोडून स्मार्ट शेतीकडे वाटचाल करत आहेत. अनेक शेतकरी आता कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहेत.
हरियाणातील शेतकऱ्याने केली स्मार्ट शेती
हरियाणातील कर्नालच्या पधना गावातील शेतकरी प्रदीप कुमार यांनी टोमॅटोच्या शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कुमार यांनी त्यांच्या शेतात हवामान रिमोट सेन्सिंग सिस्टीम बसवली आहे, ज्याद्वारे त्यांना घरी बसून पिकांवर होणारा किडीचा परिणाम, हवामान, पाण्याची गरज आणि औषधांचा वापर याची संपूर्ण माहिती मिळते.
कीटकनाशकांचा वापर न करता रोगाचा बंदोबस्त
कुमार यांनी त्यांच्या शेतात पिवळे सापळेही लावले आहेत, ज्याद्वारे कीटकनाशकांचा वापर न करता पीक खराब करणाऱ्या कीटकांचा नायनाट करता येतो. या प्रयोगांमुळे त्यांचा उत्पादनखर्च कमी झाला आहे. त्यामुळे नफा वाढला आहे. कीटकनाशकांच्या कमी वापरामुळे पिकांनाही चांगला भाव मिळत आहे.
शेतात बसवली वेदर रिपोर्ट सेन्सिंग सिस्टीम
प्रदीप कुमार यांनी सांगितले की, एका कंपनीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात वेदर रिपोर्ट सेन्सिंग सिस्टीम बसवली आहे. त्यामुळे त्यांना घरी बसूनच त्यांच्या पिकाची सर्व माहिती मिळते. कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या या यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे ते पिकात येणाऱ्या किडींचे छायाचित्र काढून कंपनीच्या कार्यालयात पाठवते. ज्याची तपासणी करून त्याला पिकामध्ये किती औषध वापरायचे आहे हे कळते. एवढेच नाही तर हवामानातील बदल आणि शेतातील पाण्याचा वापर यावरही या प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवता येते.
एकरी तीन ते चार लाख रुपयांचा नफा
प्रयोगशील शेतकरी प्रदीप कुमार म्हणाले की, स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर पीक खर्च कमी झाला आहे. उत्पादनही चांगले होऊ लागले आहे. आज टोमॅटोच्या लागवडीतून एकरी तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कुमार यांनी इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेती बदलून आधुनिक शेती करण्याचा सल्ला दिला आहे.
AI मुळे शुद्ध, आरोग्यदायी अन्न
शेतकरी उत्पादक संघटनेचे संचालक डॉ.एस.पी.तोमर म्हणाले की, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकरी खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतात. आधुनिक उपकरणांद्वारे आपण कीटकनाशकांच्या वापरावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवू शकतो आणि आपले अन्न शुद्ध, आरोग्यदायी बनवू शकतो.
डॉ.एस.पी. तोमर म्हणाले की, आम्ही आमच्या टोमॅटो प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा वापर केला असून तो पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. या भागात अनेक प्रगतीशील शेतकरी आहेत, ज्यांनी यापूर्वी टोमॅटो शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- हवामान अपडेट: पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये राहील दाट धुके! पाऊस राहील का? थंडीची लाट येणार का?
- इंजिनियर जोडप्याने अमेरिकेतील नोकरी सोडून उभा केला दोन कोटींचा लाडू उद्योग