शहादा – येथील नवीन बस स्टॅन्ड जवळील लोणखेडा रस्त्यावर उद्या 2 जानेवारी (शुक्रवारी) पासून चार दिवसीय ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास सुरुवात होत आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. निर्मल सीड्सतर्फे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या पहिल्या पाच हजार जणांना भाजीपाला बियाणे सॅम्पल पाकीट भेट देण्यात येईल. पदमावती सीड्सतर्फे लकी ड्रॉच्या माध्यमातून रोज शंभर जणांना आकर्षक ग्रो बॅग देण्यात येणार आहे.

कृषी यंत्र व औजारांवर भर
भर पावसातही मशागत करणाऱ्या हाय व्हील्ससह फवारणीसाठीचे ड्रोन प्रात्यक्षिक, सोलर फार्मिंग, झटका मशीन, सोलरवरील वॉटर पंपाचेही स्टॉल्स आहेत. शेत मजुरीला पर्याय ठरतील, अशा पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणी, मळणीपर्यंतच्या अवस्थेतील विविध प्रकारचे लहान मोठे अत्याधुनिक 25 हून अधिक कृषी यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन आहे. या प्रदर्शनात 150 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
तरुणांना व्यवसायाची संधी
इंदौर, धारसह राजकोट येथील कंपन्या प्रथमच शहादा येथे प्रदर्शनात सहभागी होत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून परिसरातील सुशिक्षित तरुणांसाठी तालुकानिहाय डीलरशिपच्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, मिरची, मोहगनी, सुबाभूळ, निलगिरी, बांबू, पांढरा कांदा यांची करार शेती, 12 पेक्षा जास्त कंपन्यांचे केळीचे टिशूकल्चर रोपे, पपई, कलिंगड उसासारख्या विविध फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी, किचन गार्डन टूल्स, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात मिळेल. कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, बँक, कृषी विषयक पुस्तकेही एकाच छताखाली उपलब्ध होतील.
किचन गार्डन ते शॉपिंग फेस्टिवल
शहरी भागात टेरेस – किचन गार्डनिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेता लहान लहान अवजारांसह किचन गार्डनसाठीचे टूल्सही उपलब्ध करून दिले आहेत. खवय्यांसाठी खास खाऊ गल्ली तसेच शॉपिंग फेस्टिवलचेही आयोजन असून प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाची देखील रेलचेल आहे.
अॅग्रोवर्ल्ड आयोजित या कृषी प्रदर्शनासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, मेट्रोजन बायोटेक प्रायोजक आहे. प्लॅन्टो कृषी तंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांट्स, ओम गायत्री नर्सरी, एअरटेक बायो सहप्रयोजक आहेत.













