शिवतीर्थ मैदानावर अवतरणार कृषीची पंढरी
जळगाव, ता. 14 (प्रतिनिधी)ः येथील शिवतीर्थ मैदानावर उद्यापासून ता 15 (शुक्रवारी) ते 18 नोव्हेंबर दरम्यान अॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी व दुग्ध प्रदर्शन होत आहे. अॅग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या दुपारी ४.०० वाजता होणार असून या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जळगावच्या महापौर सीमा भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, महापालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी महापौर ललित कोल्हे,गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, साईराम इरिगेशनचे श्रीराम पाटील, क्वालीटी ठिबकचे रमेश पाटील, कुमार बायोसिड्सचे श्रीकांत निरफळे, ग्रब अग्रोटेकचे कैलास मगर, इंबी जलसंचयचे अनिल राजपूत, आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.
प्रदर्शनात शेती उपयोगी यंत्र, तंत्र, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टर व अवजारे, स्प्रे- पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्य, दूध काढणी यंत्र, करार शेतीची माहिती यासह इतर माहितीचा खजिनाच यात असणार आहे. प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टर्स, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवली आहे. त्याचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. याशिवाय पशुपालकांसाठी हिरव्या चाऱ्यासाठीचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अॅझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूध काढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत. या कृषी प्रदर्शनात वन्यप्राण्यापासुन संरक्षणासाठी संचलित कुंपण, शेततळे लाईव्ह डेमो / लाईव्ह सोलर डेमो गांडूळ खत लाईव्ह डेमो, रात्री कार्यरत होणारा इको-ट्रॅप कीटकसापळा, विविध फुलपीक आणि फळझाडे, करार शेती व्हर्टिकल फार्मिंग, फायदेशीर मशरूम शेती, सोयाबीन पासुन सोयामिल्क व उपपदार्थ, मोबाईल वरून चालू बंद करता येणारे स्टार्टर, हायड्रोपोनिक्स, अॅतझोला चारा डेमो, मजुर टंचाईवर पर्यायी यंत्र सामग्री या वैशीष्टपूर्ण विषयाचा समावेश आहे, तरी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीतील उपायांवर मंथनही घडवून आणले जाते. कृषी संशोधन व शिक्षण संस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, ड्रीप, टिश्यूकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात असतील. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलीहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, गांडूळ शेती अशा बाबी प्रदर्शनस्थळी मांडण्यात येणार आहेत.