भारतातील उत्पादित द्राक्षाला परदेशांतील विविध बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. काही देशांनी द्राक्ष आयातीविषयक धोरणे अवलंबली आहेत. त्यातील रासायनिक अंश ही बाब प्रामुख्याने आयातीतील द्राक्षामध्ये तपासली जाते. अशावेळी द्राक्ष उत्पादकांनी पीक संरक्षणाच्या महत्वाच्या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
द्राक्ष बागायतदारांनी पीक संरक्षणातील पीएचआय (PHI) व एमआरएल (MRL) या दोन गोष्टींचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा. त्यासाठी रसायनांच्या अवशेष निरीक्षण कार्यक्रमाचा (Annexure-V) अवलंब करण्याची गरज आहे.
• द्राक्ष उत्पादनामध्ये अधिकृत केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समितीच्या शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर करावा.
• रासायनिक फवारणीनंतर शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी संपल्यानंतरच द्राक्ष काढणी करावी.
• कीडनाशक व बुरशीनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचावेत.
• कीडनाशक व बुरशीनाशक फवारणीपूर्वी आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन आवश्यकता असेल तरच फवारणी करावी.
• रासायनिक कीडनाशकांचा व बुरशीनाशकांचा वापर पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा.
काढणी
• घड काढणीच्या काळात जैविक घटकांचा उपयोग करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
• द्राक्ष घड काढणीपूर्वी किमान एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकाची फवारणी बंद करावी. त्याऐवजी जैविक कीडनाशकांचा अधिक वापर करावा.
• निर्यातीपूर्वी द्राक्षमालाची कीडनाशक अंश तपासणी करावी. निर्यातीतील द्राक्षांमध्ये रासायनिक अंश नसल्याची खात्री करावी, नंतरच निर्यात करावी.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)