जिरायती व मर्यादित सिंचनावर पेरणी जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची पेरणी 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पेरणी 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान करावी. खरिपात सोयाबीन किंवा गळीतधान्य लागवड असेल तर एकच कुळवणी करावी. कुळवणीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत पसरावे.
अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित जातींची (नेत्रावती, फुले समाधान, फुले अनुपम, फुले सात्विक, एमएसीएस-4028, एनआयडीडब्ल्यू-1149, एमएसीसीएस-4058, शरद) निवड महत्त्वाची आहे.
संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी एकरी 30-40 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम तसेच थायमेथोक्झाम 1.75 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. बियाणे वाळवल्यानंतर प्रतिकिलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी.
करार शेती… म्हणजे शेतकर्यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी। Contract Farming।
जिरायती पिकास एकरी 16 किलो नत्र आणि 8 किलो स्फुरद पेरणीच्या वेळेस द्यावे. मर्यादित सिंचनावर पेरणी करताना पेरणीच्या वेळी प्रत्येकी 16 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश एकरी द्यावे. उर्वरित 16 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एका महिन्याने द्यावी. पेरणी 5-6 सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळींत 20 सें.मी. अंतर ठेऊन करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करता येते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5-4 मीटर रुंद व 7-25 मीटर लांबीचे सारे पाडावेत.

हवामान, जमिनीची निवड व पूर्वमशागत
गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. जिरायत गहू मात्र ओलावा टिकवून धरणाऱ्या जमिनीतच घ्यावा. गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. फुटवे फुटण्याच्या वेळी थंडी पडल्यास फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस तापमान असल्यास ओंबीची लांबी, दाण्यांची संख्या आणि दाण्यांचा आकार वाढण्यास मदत होते.
पूर्वमशागतीसाठी खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी 10 ते 12 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांची धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. सोयाबीन पिकाच्या बेवडावर गव्हाच्या पिकाचे उत्पादन अधिक येत असल्याचे सिद्ध झाले आहे. या पिकानंतर फणपाळी किंवा रोटाव्हेटर वापरून रान तयार करून घ्यावे.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
