अपराजिता फुल ही औषधी व सजावटीची वनस्पती असून तिच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. आयुर्वेदिक औषधे, पूजा-विधी तसेच नैसर्गिक रंग व चहा (Butterfly pea tea) तयार करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. योग्य पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो.
हवामान आणि जमीन
उष्ण व दमट हवामान अपराजितासाठी उत्तम असते. तसेच 20°C ते 35°C तापमान योग्य आहे. अपराजिता बियाण्यांच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी, चांगली निचरा असलेली जमीन योग्य असते. जमिनीचा pH 6 ते 7.5 असावा.
लागवडीची वेळ
या फुलांची लागवड मार्च – एप्रिल तसेच
खरीप हंगामासाठी जून-जुलै सर्वोत्तम.
रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येही लागवड करता येते.
बियाणे आणि पेरणी
प्रति एकर 3 ते 4 किलो अपराजिताचे बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे 10 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवावे. ओळीतील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे. झाडांतील अंतर 30 ते 40 सेमी ठेवावे.
खत व्यवस्थापन : शेणखत: 5 ते 6 टन प्रति एकर.
रासायनिक खत (प्रति एकर) : नत्र (N): 20 किलो, स्फुरद (P): 40 किलो पालाश (K): 20 किलो
लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी हलका टॉप ड्रेसिंग करावे.
पाणी व्यवस्थापन : सुरुवातीला 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. फुलधारणेच्या काळात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये.
कीड व रोग नियंत्रण
मावा व पांढरी माशी ही मुख्य कीड असून यावर उपाय म्हणून नीम तेल 5 मिली प्रति लिटर फवारणी करावी. आवश्यक असल्यास योग्य कीटकनाशक वापरावे.
काढणी :
लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. दर 2 ते 3 दिवसांनी फुले तोडणी करावी. ताजी फुले किंवा सुकवून विक्री करता येते.
उत्पादन आणि नफा
योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकर 800 ते 1200 किलो फुले उत्पादन मिळू शकते. सुक्या फुलांना बाजारात 300 ते 800 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळू शकतो. त्यामुळे कमी खर्चात चांगला नफा मिळू शकतो.

अपराजिता फुलांचे मार्केट कुठे आहे?
आजकाल Butterfly Pea Tea / Blue Tea खूप लोकप्रिय झाली आहे. हर्बल टी ब्रँड, हेल्थ प्रॉडक्ट कंपन्या, ऑर्गॅनिक स्टोअर्स
अपराजिता फुलांपासून नैसर्गिक निळ्या रंगाची चहा बनवली जाते आणि ती अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते.
कॉस्मेटिक आणि फूड इंडस्ट्री
अपराजिता फुलांचा वापर नैसर्गिक फूड कलर, साबण व सौंदर्य उत्पादने आणि स्किन केअर प्रॉडक्ट यासाठीही केला जातो.
ऑनलाइन मार्केट (सर्वात मोठी संधी)
सुकवलेली अपराजिता फुले ऑनलाइन खूप विकली जातात. Amazon, Flipkart, IndiaMART आणि Meesho या ऑनलाइन स्टोअर्समध्ये 10g ते 1kg पॅक मध्ये विक्री होते.
सर्वात जास्त नफा कसा मिळतो?
फुले सुकवून (Dry flower) विकल्यास दर जास्त मिळतो. Blue Tea पॅकिंग करून विकल्यास अधिक नफा आणि ऑनलाइन विक्री केल्यास बाजार मोठा मिळतो.
अपराजिता फुले सुकवण्याची योग्य पद्धत
सकाळी 7 ते 9 वाजता फुले तोडावीत. पूर्ण उमललेली पण ताजी फुले घ्यावीत. खराब, किडलेली किंवा पिवळी पडलेली फुले काढून टाकावीत. फुले हलक्या हाताने स्वच्छ करावीत. पाण्याने धुवायची गरज नाही (धुतल्यास रंग आणि गुणवत्ता कमी होऊ शकते). धूळ असल्यास स्वच्छ कापडाने हलके पुसावे.
सुकवण्याची पद्धत
फुले जाळीच्या ट्रे किंवा स्वच्छ कापडावर पसरवावीत. थेट सूर्यप्रकाश टाळावा. फुले हवेशीर जागेत ठेवावीत. 2 ते 3 दिवसांत फुले व्यवस्थित सुकतात. हलक्या उन्हात सुकवणे म्हणजे सकाळच्या उन्हात 4 ते 5 तास ठेवता येतात. दुपारचे तीव्र ऊन टाळावे.
सोलर ड्रायर / मशीन ड्रायर
तापमान: 40°C ते 50°C
6 ते 8 तासांत फुले सुकतात. ही पद्धत मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी वापरतात.
पॅकिंग आणि साठवण
सुकलेली फुले एअरटाइट पिशवी / काच बाटली मध्ये ठेवावीत. ओलावा नसलेल्या ठिकाणी साठवावीत. थेट सूर्यप्रकाश टाळावा.















