स्टोरी आऊटलाईन
* कडक उन्हाळ्यात काकडीच्या पिकातून कुटूंबाला मिळाला आर्थिक आधार.
* कमी पाण्यात कमी खर्चात काकडीचे घेतले उत्पादन.
* भाजीपाला पीक कामी घरच्या सदस्यांचे मिळते सहकार्य.
परभणी- जिल्ह्यात यंदा अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामूळे अनेक विहीरी बोअरवेल मार्च महिन्यापासून कोरडेठाक पडले आहेत. काही शेतक-यांच्या विहीर बोअरवेलला कमी टिकून राहीलेल्या पाण्यावर बरेच जण जिद्दीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. तसे पाहिले तर परभणी जिल्हा भाजीपाला उत्पादनात मराठवाड्यात अव्वल आहे. येथिल शेतकरी होतकरु आणि अतिशय जिद्दी आहेत. पाऊसकाळ कमी होत चालल्याने सर्व पाणवठे तळ गाठून आटत असताना देखील ज्यांच्या शेतात थोडके पाणी आहे तेवढ्यावरच येथे शेतकरी कष्ट पणाला लावून कमी अधिक क्षेत्रात पालेभाजी आणि फळभाजी पीक लागवड करीत त्याचे चांगले उत्पादन घेतातच. याच धर्तीवर जिल्ह्यातील उजळअंबा येथील धिरोदत्त शेतकरी अशोक गंगाधरअप्पा साखरे यांनी कडक उन्हाळ्यात कमी पाण्यात एक एकर क्षेत्रात काकडीचे भरघोस उत्पादन घेवून दाखवले आहे.
उजळअंबा हे गाव परभणी-गंगाखेड रोडवरील उमरी मार्ग रस्त्यावर पश्चिमेस ४ किमी अंतरावर आहे. या गावातील शेतकरी अशोक गंगाधरअप्पा साखरे यांना एकूण १७ एकर जमीन आहे. शेतात दोन बैल एक गाय ही पशूधने असून सिंचनासाठी विहार,बोअर,खदान,शेततळ ही साधने आहेत. ते आपल्या शेतीत खरीपात सोयाबीन,कापूस,हळद,मुग,तूर ही पिके घेतात तर काही क्षेत्रात भाजीपाला पीकेही घेतात. या वर्षी त्यांनी कमी पाण्यात एक एकर जमीनीत एप्रील-मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात काकडीची लागवड करुन त्यापासून चांगले उत्पादन घेतले आहे.
काकडीची लागवड
खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढल्यानंतर त्या जमिनीची मशागत केली. हिवाळ्यात एक एकरात मेथी भाजीचे उत्पादन घेतले. त्यातून खर्च जाता १३ हजार रुपये उत्पन्न मिळाले. मेथी काढल्यावर त्या एक एकरची मशागत केली. फेब्रूवारी महिन्यात एकरभर जमिनीत ३ गाड्या शेणखत, १ क्विंट्ल निंबोळी पेंड हे खत टाकून ७ फूट रुंद अंतरावर बेड केले. त्यावर ठिंबक लॅटरल अंथरूण बसवली. त्यानंतर मल्चिंग पेपर बसवला आणि दिड फूट लांबी अंतराने ठिंबक लॅटरलच्या दोन्ही बाजूने मल्चिंगला छिद्रे पाडून त्या ठिकाणी ७ बाय दिड फूट अंतरावर युनाइटेड जेनेटिक्स सिडस् कंपनीच्या शिवालिक काकडी वाणाच्या बियाची १२ फेब्रूवारी २०१९ रोजी लागवड करण्यात आली.
पिकाचे व्यवस्थापन
लागवडी नंतर दुस-या दिवशी ठिंबकव्दारे पाणी देण्यात आले. लागवड केल्यावर चौथ्या दिवशी बियाण्यातून रोपाची उगवण झाली. उगवणीनंतर ८ व्या दिवसाला वेलीच्या पानावरील नागअळीचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी १० एम एल बाॅयो ३०३ एका स्प्रे पंपात टाकून २ टाक्या फवारणी केली. तेथून पुढे १० दिवसाला २ कि ग्रा १९-१९-१९ खत ठिंबकमधून दिले. त्यानंतर याच खताची मात्रा २ दिवस आड करुन ५ वेळा दिल्या गेली. तद्नंतर २ कि ग्रा कॅल्शियम नायट्रेट ठिंबक व्दारे सोडले. त्यापुढे २ कि ग्रा १२-००-६१ हे खत २ दिवसाआड ५ वेळा दिले. पिक ४० दिवसाचे झाल्यानंतर फूलधारणा होताना २ कि.ग्रा कॅल्शियम नायट्रेट,१ कि.ग्रा बोराॅन ही खत मात्रा देण्यात आली. हेच प्रमाण फवारणी देखील केले. वेलींना फूले अधिक प्रमाणात लगडण्यासाठी व ती टिकण्याकरीता प्रती पंप दिड ग्राम जिब्रेलिक अॅसिड औषध फवारणी करण्यात आले व आवश्यक त्या वेळी ठिंबकने पाणी पाळ्या दिल्या. या पध्दतीने पिकाचे व्यवस्थापन करण्यात आले.
उत्पादन व विक्री
हे वेलवर्गीय काकडीचे पीक ५५ दिवसाचे झाल्यावर काकडी फळाचा पहिला तोडा करण्यात आला. तो १ क्वि.८० किलोचा निघाला.तो परभणीच्या स्थानिक भाजी मार्केट मध्ये विक्री करण्यात आला. त्या काकडीस प्रति किलो १५ रु दर मिळाला. एक दिवस आड करुन दूसरा तोडा ४ क्विंट्लचा निघाला. त्यास प्रति किलो १२ रु दर मिळाला. तर तिसरा तोडा ४ क्विंट्ल, चौथा ७ क्वि.८० किलो, पाचवा १० क्विंट्टल उत्पादीत झाला. सरासरी दर १२ ते १५ रु प्रती किलोस दर मिळत असून या पूढील एप्रील-मे महिन्यात १५ टन काकडी उत्पादन होणार असल्याचे साखरे सांगतात.
उत्पादन आणि मिळालेले उत्पन्न
आजतागायत त्यांना एक एकर क्षेत्रातील काकडीचे २७६० कि.ग्रा उत्पादन हाती आले आहे. फळ विक्रीतुन त्यांना ३६६६० रुपये मिळालेत. तर आजवरचा उत्पादनासाठी आलेला २५ हजार रुपये खर्च वजा जाता ११६६० रु निव्वळ उत्पन्न हाती आलेय. पुढील १५ टन अपेक्षीत उत्पादनातून खर्च जाता १ लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याची त्यांना खात्री आहे.
मिळालेले मार्गदर्शन
शेतकरी अशोक साखरे यांचा काकडी उत्पादनाचा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांना या पिकाच्या संगोपनाकरीता युनायटेड जेनेटिक्स सिडस् कंपनीचे विक्री प्रतिनिधी संदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी/ संपर्क अशोक गंगाधरअप्पा साखरे रा. उजळअंबा,ता जि परभणी. मो.९८३४०११२४०.
प्रतिक्रिया कोणतेही पाले आणि फळभाजी हे पिक कमी पाण्यात कमी कालावधीत पिकवता येतो. त्यास उत्पादन खर्च शुध्दा जास्त लागत नाही. भाजीपाल्याच्या विक्रीतून दररोज शेतक-याकडे पैसे येतात. सर्वच शेतक-यांनी त्यांच्या शेतीत उपलब्ध पाण्यानूसार कमी अधिक क्षेत्रात भाजीपाला पिक घेतले तर त्यांना पैसाची चणचण भासणार नाही. मी दरवर्षि एक दोन एकरात सर्व भाजी वाणासह कलिंगड पिक घेत असतो. या वर्षी हा काकडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. उन्हाळ्यात काकडीला चांगली मागणीही असते. काकडी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक आहे.
अशोक गंगाधरअप्पा साखरे काकडी उत्पादक शेतकरी,
उजळअंबा,जि परभणी.