दीपक देशपांडे : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा ओढा फळशेतीकडे वाढला आहे. ज्यामुळे अनेक जण पारंपारिक पिकांना फाटा देत फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना फळ शेतीमधून अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका वयोवृद्ध शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. विदर्भातील तिन्ही ऋतू पराकोटीचे असतात. उन्हाळ्यात यावर्षी तापमानाने 50 डिग्री ओलांडली तर पावसाळ्यात देखील सरासरी पावसाचे पर्जन्यमान १००० ते १५०० मिलिमीटर एवढे असते. हिवाळाही तितकाच गारठला असतो. अशा परिस्थितीत अकोल्यातील बार्शीटाकळी परिसरातील रामराव चंद्रभान ढाकोलकर आणि त्यांच्या पत्नी शोभा ढाकोलकर यांनी केशर आंब्याच्या कलमाची लागवड करून अवघे दोन वर्षातच केशर आंब्याचे उत्पादन घेतले आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दोघं दाम्पत्यांनी केशर आंब्याची बाग फुलविली आहे.
दोघं दाम्पत्यांकडे दहा एकर जमीन आहे. ते आधी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यात ते सोयाबीन, तूर, गहू, हरभरा आदी पिके घेत होते. पण, गेल्या १० वर्षांपासून उन्हाळी भुईमुगच्या उत्पादनातून आठ वर्षांपासून एकरी 20 क्विंटल उत्पादन ते घेत आहेत. यावेळी त्यांनी कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन कसे घेता येईल, याचा अभ्यास त्यांनी प्रात्यक्षिकातून केला. त्यामुळे खर्च कमी आणि उत्पादन जास्त अशा पद्धतीने ते शेती करत होते. रामराव यांना एकूण तीन मुले आहेत त्यापैकी दोन मुलींचे लग्न झालेली आहेत. तर तिसऱ्या मुलीचा नर्सिंग कोर्स झाला असून तिची पुणे महापालिकेत नर्स म्हणून निवड देखील झाली आहे. हीच मुलगी त्यांना शेतीकामात मदत करत असते. मजुरांवर लक्ष ठेवणे, बियाणे पेरताना योग्य खताचा योग्य प्रमाणात वापर करणे, पाण्याची योग्य नियोजन करणे, वेळ पडली तर स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीमध्ये काम करणे, अशी अनेक कामे ती स्वतः करते. ढाकोलकर यांच्या शेतात लालसर माती असून या मातीचा दोन ते अडीच फुटाचा थर आहे तर खालची जमीन मुरमाड आहे. संपूर्ण कुटुंबाला शेतीची आवड असल्यामुळे पारंपारिक पिकाबरोबर फळझाडांची लागवड करून त्याचे देखील ते उत्पादन घेत आहेत.
शेतीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर
शेतात लाल माती असली तरीही जमिनीची सुपीकता टिकून राहावी यामुळे ते दरवर्षी विविध सेंद्रिय पिकांचे प्रयोग करत असतात. उदाहरणार्थ ताग व इतर काही यांची लागवड करून सहा महिन्यात पीक झाल्यानंतर ते त्याच जमिनीत गाळून टाकतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच पण त्याचबरोबर सेंद्रिय खत असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा ट्रायकोडर्माचा वापर ते जास्त करून करतात. ते त्यांच्या शेतात रासायनिक खत वापरत नाही असे नाही पण रासायनिक खताचे प्रमाण कमी ठेवत चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर ते मोठ्या प्रमाणात करतात. शेतामध्ये पाण्याची कमतरता आहे त्यामुळे त्यांनी तीन किलोमीटर अंतरावरील काटेपूर्णा धरणातून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून 2012 साली तीन इंचाच्या पाईपलाईनने शेतात पाणी आणून ते विहीर व शेततळ्यामध्ये साठवून ठेवले आहे. शेतातच राहण्यासाठी घर बांधलेले असल्यामुळे देशी गाईचे संगोपन केले आहे. संपूर्ण शेतात तीन इंची पाईप लाईन आहे. सगळ्या पिकांना ठिबक व तुषार सिंचनद्वारे पाणी दिले जाते. त्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटाव्हेटर व फवारणी यंत्रांची देखील सांगड घातलेली आहे. त्यामुळे या कामांसाठी बाहेरच्या लोकांवर फारसे विसंबून राहावे लागत नाही, इतका दूरदृष्टीकोन 2012 पासून ठेवल्यामुळे अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा ते शेतीत नुकसानही झाले नाही आणि या कोरोनाच्या काळातच त्यांनी केशर आंबा लागवड केली होती.
भुईमूग पिकातून चांगला नफा
उन्हाळी भुईमुगाची ट्रेनिंग करताना खरिपाचे पीक निघाल्यावर एक किंवा दोन एकर क्षेत्रावर हे नांगरणी करून बाळ्या घालून घेतात. त्यानंतर जमिनीमध्ये चार कोटी तीन सुपर फॉस्फेटची अर्धी बॅग, मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो, पोटॅश चाळीस किलो असे फिरून घेऊ त्यावर भुईमुगाची पेरणी करतात. दोन बॅग प्रमाणे पेरणी करतात. गेल्या तीन वर्षापासून ते चार एकर क्षेत्रावर पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 11 इंच ठेवतात. काकडी काढलेली असते या काकडीवर दहा मजूर दोन दिवसात बियाणे लावून काढतात. भुईमुगाला अरे धरू लागल्यानंतर एकरी एक पोते पोटॅश देऊन बुरशीनाशकाची फवारणी करतात. त्याचबरोबर अळीसाठी कीटकनाशक वापरून कोणत्याही प्रकारचा रोग पडू नये, यासाठी ते वेगवेगळ्या फवारण्या करतात. त्यात अगदी पंचकव्याची सुद्धा ते फवारणी करतात. पीक चार महिन्याचे झाल्यानंतर त्याच्या काढणीला जवळपास दहा दिवसाचा कालावधी लागतो. काढल्यानंतर शंभर ग्राम शेंगांमध्ये 70 ते 75 शेंगा दाणे निघतातच हा त्यांचा विश्वास असतो. भुईमूग खरेदीसाठी गावातच व्यापारी येतात त्यात जो चांगला भाव देईल व जागेवर पेमेंट करेल, त्याला जातो गतवर्षी जागेवर 7,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. म्हणजेच दरवर्षी एकरी किमान 1 लाख 40 हजार रुपये त्यांना फक्त चार महिन्यांच्या पिकातून मिळतात.
आधुनिक पद्धतीने केशर आंब्याची लागवड
खरीप हंगामात खरीप पिकांपैकी ते सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत त्यांनी शेतात सगळे प्रयोग केले आहेत. खरीप हंगामात तूर उत्पादन घेतले जाते तर रब्बीत गहू आणि हरभरा याचे चांगले उत्पादन ते घेतात. शेतातील पिके काढताना त्यांना फळझाडांची देखील आवड आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये कागदी लिंबूची लागवड केली आहे. अगदी लिंबूची लागवड करताना 18 फूट बाय 18 फूट अंतर ठेवले असून जुलै 22 मध्ये त्याची लागवड करण्यात आलेली आहे. झाडांच्या वयोमानानुसार फळ उत्पादन कमी होत गेले व झाडांना कीड लागत गेली. त्याचबरोबर अतिग्रामीण भागात असल्यामुळे आंब्याच्या देशी वाणाला पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या येथे आधुनिक पद्धतीने केशर आंब्याची लागवड करण्याचे ठरवले. कोरोनाच्या काळामध्ये रिकामे बसण्यापेक्षा फळबाग लागवड करण्यासाठी विविध ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांनी भेटी देत चर्चा केल्या, फळबागेतील अडचणी जाणून घेतल्या, विक्रीची उपलब्धता याबद्दल माहिती जमा केली. त्यातूनच केशर जातीच्या आंब्याची लागवड करण्याचा निर्णय ढाकोलकर यांनी घेतला.
दोन वर्षातच लागली फळे
बीड जिल्ह्यातील उंदरी येथील भागवत ठोंबरे यांच्या शेतातील नर्सरीतून केशर जातीची सहा महिन्याची कलमे 100 रुपये प्रमाणे त्यांनी खरेदी केली व आणून ठेवली. दोन एकर क्षेत्रावर त्यांनी नागरण करून पाया घालून व शेतामध्ये शेणखत पसरून जमीन तयार करून ठेवली. जून 2021 मध्ये पहिला पाऊस पडून गेल्यानंतर त्यांनी जेसीबीने शेतामध्ये चर काढून त्या चरामध्ये शेणखत व स्थानिक माती भरून सघन पद्धतीने म्हणजेच 5 बाय 12 फूट अंतरावर 770 कलमे लागवड केली व त्यांची निगा राखणे सुरू ठेवली. दुसऱ्या वर्षी जूनच्या सुरुवातीला शेणखत झाडांच्या भोवती टाकले. इतर कोणत्याही प्रकारचे खत न देता दरवर्षी आंतरपिकातून जे रासायनिक खत मिळेल ते त्या झाडांनी घेत गेले आणि निसर्गाने आपली किमया दाखविली. केशर आंब्याला दोन वर्ष पूर्ण झाली आणि झाडांना फळे लागली. यासाठी त्यांनी ट्रायकोडर्मा, गाईचे गोमूत्र याच्यासह पंचकव्याची फवारणी केली होती. फळ पाहून सर्व कुटुंब आनंदीमय झाले. नर्सिंग पूर्ण केलेल्या शारदा नावाच्या 24 वर्षीय मुलीने स्वतः ट्रॅक्टरने या झाडांवर बुरशीनाशकाची फवारणी केली. पाण्याचे योग्य नियोजन खत व बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे त्याला दोन वर्षात फळधारणा झाली. पण, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे फळ गळून पडले व जे राहिले त्याला मार लागला. त्यामुळे फळांचे नुकसान झाले त्या नुकसानीचा अंदाज किमान 6 ते 7 लाख रुपये आहे. पण यातून त्यांनी नवीन बोध असा घेतला की, नैसर्गिक आवाहन तर येतच राहतील पण, त्यावर उपायोजना करण्यासाठी पुढील वर्षी काय करता येईल ?, याची मोर्चेबांधणी आतापासून सुरु केली.
डॉ. उज्वल राऊतांचे वेळोवेळी मार्गदर्शन
ढाकोलकर यांनी केशरच्या सर्वच झाडांची कटिंग करून घेतली. यानंतर झाडांवर रोगराई होऊ नये म्हणून बुरशीनाशक व गुळ लावला. अशा माध्यमातून फक्त दुसऱ्या वर्षी म्हणजेच अडीच वर्षात फळ घेणारे महाराष्ट्रातील ते बहुधा एकमेव शेतकरी असावे, कारण कलम लावल्यानंतर व्यापारी दृष्टिकोनातून कोणताही शेतकरी पाचव्या वर्षी फळ देतो. दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून येणारे फळ अनेक लोकांच्या सांगण्यानुसार व त्याच्या अल्पभूतीनुसार तो छाटून टाकतो किंवा मग तो घरी वापरतो. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष उत्पादन व नफा पाच वर्षाच्या नंतरच मिळायला सुरुवात होते. तोपर्यंत त्याची फक्त गुंतवणूकच होत राहते आणि याच मानसिकतेला या शेतकऱ्याने शह दिली आहे. दुसऱ्या वर्षीपासून एका एकरामध्ये 2 ते 3 लाख रुपये एकरी उत्पन्न घेता येते हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे कळणार नावाच्या विषारी औषधाचा वापर त्यांनी कुठेही केला नाही या कामासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील डॉ. उज्वल राऊत यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेले. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये खचून न जाता विविध माध्यमातून विविध प्रयोग करणे सुरू ठेवले आहे.
भुईमूग लागवडीचा जमा खर्च हा एक एकराचा आहे. नांगरणी, फवारणी, खते, लागवड व काढणीचा खर्च साधारणपणे 8 हजार रुपये असा एकूण खर्च 16 हजार पाचशे रुपये आहे. यावर्षी 7 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यातून 1 लाख 54 हजार रुपये मिळाले. म्हणजेच खर्च वजा जाता रामराव ढाकोलकर याना एकरी 1 लाख 35 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे. त्यातही तरुण पिढीने यातून बोध घ्यायला हवा. ढाकोलकर दरवर्षी बँकेकडून लोन घेऊन ते वेळेवरही परत करतात. त्यामुळे दोघं दाम्पत्यांना बँकेने 50 हजार रुपये रोख रक्कमसह पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ।
नवीन शेतकरी पिढीला सल्ला देण्यात मी एवढा मोठा नाही मात्र, युवकांनी शेतीशी एकनिष्ठ राहून निसर्ग समजून घेऊन शेती केली तर ती नुकसानीची नक्कीच ठरत नाही. त्यासाठी शेतीत वेळ द्यावाच लागतो असे ढाकोलकर म्हणतात. त्याची मुलगी कु. शारदा म्हणते, शेतीत काम करताना मन रमते. इतर कोणतेही विचार मनात येत नाहीत व निसर्गाची ओळख होत राहते. आवड निर्माण होऊन सवड मिळतेच मग त्यातून उत्पन्नही वाढतेच. तसेच माती, पाणी व निसर्ग यांचा अभ्यास करावा लागतो व शेती तंत्र, बाजार व नवनवीन ताहिती यांचा सतत अभ्यास करून अपडेट राहावे लागते.
संपर्क :
श्री. रामराव ढाकोलकर बार्शीटाकळी,
अकोला.
मो. नं. ९९२३४६७४५८ / ९३७३३३९७३१