ही कहाणी आहे युरोपमध्ये करिअर करायला निघालेल्या एका 29 वर्षीय तरुणीची. घरी कुठलीही शेतीची पार्श्वभूमी नसताना आज ती उत्तर प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांची आदर्श आहे. तिचं नाव आहे अनुष्का जयस्वाल, लखनौमधील तिच्या व्यावसायिक खानदानात या आधी कुणीही शेती केली नव्हती. ती मात्र आज पॉलीहाऊसमधील सिमला मिरची अन् काळे मिरे यातून वर्षाला एक कोटी रुपये कमावणारी “मॅडम” बनली आहे. तिला लखनौतील सर्व कृषी व्यापारी, कृषी विक्रेते, फेरीवाले, भाजीवाले आणि बहुतांश ग्राहकही आता “मॅडम” म्हणूनच ओळखतात. “मॅडम “च्या पॉलीहाऊसमधील कोणताही कृषी माल बाजारात आला की हातोहात खपतो, असा दर्जेदार, विश्वासाचा ब्रँड अनुष्काने उभा केलाय.

ग्रामीण जीवनावर प्रभाव पाडण्याचे ध्येय
लखनौची अनुष्का जयस्वाल अर्थशास्त्रातील पदवीधर. 2017 मध्ये दिल्लीतील प्रसिद्ध हिंदू कॉलेजमधून तिने डिग्री मिळवली. कॅम्पस प्लेसमेंटपूर्वी चांगली नोकरी मिळावी सोबतच्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी करण्यात तासनतास घालवले. अनुष्का या स्पर्धेपासून लांब राहिली, तरीही नोकरीची चांगली ऑफर तिला मिळाली. मात्र तिने ती स्वीकारली नाही. तिला उच्च शिक्षणासाठी युरोपात जायचे होते. तिने सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. परंतु ती असमाधानी होती, तिची ध्येये अन् स्वप्ने वेगळी होती. तिला तळागाळातील ग्रामीण जीवनावर प्रभाव पाडायचा होता. त्यावेळी नेमके काय करायचे हे कळले नव्हते, परंतु तिला तिच्या प्रेरणेबद्दल खात्री होती. तिला डेस्क जॉब अन् साचेबद्ध काम नको होते. त्यामुळे अनुष्का ध्येयाच्या शोधात दिल्लीहून घरी लखनौत परतली.

अतिरिक्त कृषी अभ्यासक्रमांमुळे संरक्षित शेतीमध्ये तिची आवड निर्माण झाली. 2020 मध्ये एका एकरात पॉलीहाऊस शेती अनुष्का जणू झपाटून गेली. ती शेतीबद्दल अन् वेगवेगळ्या पीकपद्धतीबद्दल अभ्यास करू लागली. ग्रामीण भागात जाऊन पारंपरिक शेतकरी अन् प्रयोगशील तरुण शेतकऱ्यांना भेटू लागली. भल्या पहाटे उठून भावाबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक मंडीत चकरा मारल्या, अनेक शेतकरी, एजंट, विक्रेते, फेरीवाले यांच्याशी बोलली. असंख्य युट्यूब व्हिडिओ पाहिले. व्यापक संशोधन आणि आवश्यक अभ्यासक्रमांसह स्वतःला सुसज्ज केल्यानंतर, तिने 2020 मध्ये एक एकर शेतजमिनीवर पॉलीहाऊस फार्म सुरू केला. त्या काळातच सुरू झालेल्या दुसऱ्या लॉकडाऊनने अनुष्काला जणू मदतच केली. त्यातून गेल्या चार-पाच वर्षात, तिने लखनौ आणि आसपासच्या भागात विदेशी एक्झोटिक भाज्या, विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरच्यांसाठी मोठे नाव कमावले आहे.
नियंत्रित वातावरणात, बंदिस्त शेतीच फायद्याची
अनुष्काची कहाणी वेगळी ठरवणारी गोष्ट म्हणजे तिच्या घरची पार्श्वभूमी शेतीची नाही, तरीही तिने पारंपारिकपणे पुरुषप्रधान असलेल्या शेती क्षेत्रात स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2018-19 मध्ये टेरेस फार्मिंगमधील प्रयोगांचे चांगले परिणाम मिळाले, ज्यामुळे तिला शेतीमध्ये संभाव्य भविष्य शोधण्यास प्रवृत्त केले. मिळवलेल्या कृषी ज्ञानाच्या जोरावर, अनुष्काने लखनौच्या बाहेरील मोहनलालगंज या गावात एक एकर जमिनीवर शेती सुरू केली. ऑगस्ट 2020 मध्ये तिने तिथे एक पॉलीहाऊस उभारले. नियंत्रित वातावरणात रोपे वाढवून, शेतकरी प्रतिकूल हवामानापासून सुरक्षित राहून स्थिर उत्पादन आणि दर्जेदार उत्पादन मिळवू शकतात, हे अनुष्काला अभ्यासातून कळले होते. संरक्षित लागवडीमध्ये नियंत्रित वातावरणात तापमान, आर्द्रता आणि प्रकाश यासारख्या घटकांचे नियमन करणे सहज-सोपे असते.

पहिल्याच वर्षी 51 टन इतके तिप्पट काकडी उत्पादन
अनुष्काने इंग्रजी काकड्यांपासून म्हणजे झुकिनीपासून पॉलीहाऊस शेती सुरू केली. पहिल्याच कापणीत तिने 51 टन इतके प्रभावी उत्पादन मिळवले. हे पारंपारिक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जवळजवळ तिप्पट होते. सुरुवातीच्या यशाने उत्साहित होऊन तिने नंतर लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीची लागवड केली, जी देखील चांगलीच भरभराटीला आली. एक एकर पॉलीहाऊसमधून तिने 35 टन शिमला मिरचीचे उत्पादन घेतले, ज्याची सरासरी किंमत 80-100 रुपये प्रति किलो होती. याचाच अर्थ, एक एकराच्या पॉलीहाऊसमधून तिने शिमला मिरचीतून तब्बल 32 ते 35 लाखांची कमाई केली. या सुरुवातीने तिला अजून बळ दिले.
210 टन शिमला मिरचीचे उत्पादन
आज, अनुष्का प्रगतीशील शेतकरी झाली आहे. तिचे पहिले पॉलीहाऊस जसजसे वाढत गेले, तसतसे तिने आणखी पाच एकर जमीन भाड्याने घेतली आणि तिच्या पिकांमध्ये विविधता आणली. काकडी, शिमला मिरची याबरोबरच आता ती लेट्यूस, बोक चॉय, झुकिनी, केल, पार्सली आणि लाल कोबी अशा अनेक विदेशी भाज्यांचे उत्पादन घेत आहे. सोबतच तिने एक रोपवाटिका (नर्सरी) देखील सुरू केली आहे. आज, ती दरवर्षी जवळजवळ 210 टन शिमला मिरचीचे उत्पादन करते. अनुष्का फार्मचे उत्पादन ब्लिंकिट आणि बिग बास्केट सारख्या ऑनलाईन क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच लुलू हायपरमार्केट सारख्या शॉपिंग मॉलमधून हातोहात विकले जाते. त्याव्यतिरिक्त, तिच्या भाज्या दिल्ली आणि वाराणसीमधील घाऊक बाजारपेठांमध्ये देखील जातात, ज्यामुळे एक कोटींहून अधिक उलाढाल होते. तिच्याकडे 25-30 कामगार आहेत, ज्यात प्रामुख्याने महिला आहेत.

मे, जूनमध्ये जमिनीला सौर ऊर्जेसाठी विश्रांती
अनुष्का जयस्वाल सांगते, “प्रत्येक भाजीपाल्याचा कापणीचा काळ वेगवेगळा असतो. शिमला मिरचीचे पीक चक्र 10 महिन्यांचे असते, काकडींना तीन ते चार महिने लागतात, सॅलड भाज्यांना पिकायला 45 दिवस लागतात, तर झुकिनीला सुमारे चार महिने लागतात.” तिने सांगितलेले सर्वात महत्त्वाचे तंत्र म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी तिला वेळोवेळी विश्रांती देऊ द्यावी! ती सांगते, “आम्ही दरवर्षी मे आणि जूनमध्ये जमिनीला सूर्याची ऊर्जा वापरण्यासाठी पूर्णपणे वाव देतो. या प्रक्रियेत मातीला श्वास घेता यावा म्हणून झाकणे समाविष्ट असते. आम्ही रसायने वापरत नाही; त्याऐवजी, मातीमुळे होणाऱ्या रोगांना तोंड देण्यासाठी आम्ही सेंद्रीय खत घालतो.” नियंत्रित वातावरणातील शेती हेच खरे भविष्य संरक्षित अन् नियंत्रित वातावरणातील शेती हेच खरे शेतीचे भविष्य आहे, असे अनुष्का ठामपणे सांगते. ती म्हणते, “पाण्याचा वापर अनुकूल करून, नियंत्रित वातावरण प्रदान करून, पिकांचे नुकसान कमी करून आणि उत्पादन सुधारून ते लहान शेतकऱ्यांसाठी फारच फायदेशीर ठरते. नियंत्रित हवामान प्रदान करण्यासाठी आम्ही जीआय पॉलीशीट, सिंचन स्प्रिंकलर, एक पंखा आणि एक पॅड सिस्टम बसवले. यामुळे आम्हाला तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी एक सूक्ष्म हवामान तयार करता येते. आमची पिके अति तापमानापासून संरक्षित आहेत, ज्यामुळे त्यांना कालांतराने आव्हानांना तोंड देण्यास मदत होते.”

चांगली, सक्षम टीम मोठी स्वप्ने साकार करू शकते!
अनुष्का सांगते, “योग्य टीम शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी भाग्यवान आहे की, मला उत्तम लोक मिळाले. आज, माझ्या अनुपस्थितीतही ते स्वतः शेती चालवू शकतात. सक्षम टीम उभी करणे, हे तुमची गुणवत्ता आणि यश द्विगुणित करते.” आपल्या कार्यबलात अधिकाधिक महिलांना समाविष्ट करण्याचे तिचे ध्येय आहे. ती सांगते, “मला आशा आहे की, सध्या टेरेस गार्डनिंगमध्ये गुंतलेल्या अधिकाधिक महिला त्यांचे प्रयत्न वाढवण्याचे मार्ग शोधतील. गेल्या काही वर्षात त्यांना मिळालेले ज्ञान मोठ्या प्रमाणावर लागू करता येईल.” शेवटी ती शेतीत करिअर करू पाहणाऱ्यांना सल्ला देते की, “स्वप्ने जरूर मोठी पाहा; पण सुरुवात अगदी लहान करा, शिका, चुका सुधारा, चांगली अन् सक्षम टीम उभी करा, त्यातूनच तुम्ही मोठ्या गोष्टी सहज साध्य करू शकता.”













