विष्णू मोरे
कधी काळी चुल आणि मुल असे समिकरण महिला व मुलींसाठी होते. मात्र, महिलांनी आपल्या कतृत्वाच्या जोरावर हे समिकरण बदलायला भाग पाडले आणि आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. सर्वात मेहनतीचे काम असलेल्या शेती क्षेत्रात देखील त्या मागे नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेळकेवाडी येथील वंदना शेळके या आहेत. वंदना या गायींचे दूध काढणे, ते डेअरीला घालणे, शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरंटी, वखरणी करण्यापासून ते फवारणी करण्यापर्यंतची कामे स्वत: करीत असून त्या आजच्या उच्चशिक्षित तरुणींसाठीच नव्हे तर तरुणांसाठी देखील आदर्श ठरत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे लिंबाजी शेळके हे वास्तव्यास असून त्यांना वंदना आणि ऋतुजा या दोन मुली आहेत. वंदना या बी.फार्मसीचे तर ऋतुजा ही इयत्ता 10 वीला शिक्षण घेत आहे. लिंबाजी यांच्याकडे 20 एकर बागायती शेती असून त्यांची ही संपर्णू शेती त्यांची मोठी मुलगी वंदना ही सांभाळत असून या शेतीत एखाद्या तरुणालाही लाजवेल असे शेतीचे प्रयोग करीत आहे.
बी.फार्मपर्यंत शिक्षण
शेती ही पूर्णता निसर्गावर अवलंबुन असल्याने तसेच उत्पानातील अनिश्चीतमुळे घरची शेती असतांनाही अनेक तरुण शेती न करता चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावताना दिसतात. परंतु, वंदनाने याला छेद देत बी.फार्मसीचे शिक्षण सुरू असतांनाही आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आहे. उच्च शिक्षित असूनही वंदना काळ्या मातीत घेत असलेले परिश्रम पाहून तिवे कुटुंबीय देखील तिच्या या कामात मदत करत आहे.
लहानपणापासूनच शेतीची आवड
शेळके कुटूंबियांकडे 20 एकर बागायती शेतजमीन असल्याने वंदना ही लहानपणापासूनच वडीलांना शेतीत काम करतांना पाहत होती. त्यामुळे तिला लहानपणापासूनच शेतीची आवड निर्माण झाली होती. इयत्ता सातवीत असतांनाच वंदना हिने ट्रॅक्टर शिकून शेतीकरण्याकडे पाऊल टाकायला सुरुवात केली होती. या विषयी बोलतांना वंदना सांगते की, शेतीशी संबंधित कोणतेही काम असो वडील लहानपणापासून मला सोबत ठेवायचे. त्यांनी मला शेतीची कामे समजून सांगितली. त्यामुळे मला शेतीमध्ये आवड निर्माण झाल्याचे ती सांगते.
थोडक्यात महत्त्वाचे
लिंबाजी शेळके यांच्याकडे 20 एकर बागायती जमिन.
वंदना हिने लहानपणापासूनच वडीलांना शेतात राबतांना पाहिल्याने शेतीची आवड निर्माण झरली.
ट्रक्टरसह सर्व कामे शिकून घेतली.
पहाटेपासून दिवसाला सुरुवात.
गायींचा टाकणे, दूध काढणे, डेअरीला घालणे अशी सर्व कामे करते.
शेतातील नांगरणीपासून ते फवारणीपर्यंतची सर्व स्वत: करते.
महाविद्यालय सांभाळून शेतीची कामे करत असल्याने ठरतेय आदर्श
वंदनाच्या कामाची सुरुवात पहाटे 5 पासूनच सुरु होते. पहाटे लवकर उठून स्वतःचे आवरणे. त्यानंतर गायींचे दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध स्कूटीवरून डेअरीवर घालणे. घरी परतल्यावर गायींसाठी पेंड व खाद्य घेऊन येणे. शेतातून चारा आणणे. गायींना खाऊ घालणे. शेतातील कामे करणे. ही सर्व कामे करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करणे. महाविद्यालयाला जाणे. असा दिनक्रम ठरलेला असतो. शेतीच्या कामांइतकीच वंदना शिक्षणाच्या बाबतीतही अपडेट आहे. शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने आई-वडिलांना वंदनाचा मोठा अभिमान वाटतो.
स्वत: चालविते ट्रॅक्टर
शेतात राबत असतांना कोणावरही निर्भर न राहता वंदना शेतातील जवळ जवळ सर्वच कामे स्वत: करते. ट्रॅक्टर चालविणे, नांगरणी करणे, रोटा मारणे, फवारणी करणे, पाणी भरणे, दूध काढणे आदी सर्व कामे ती करते. वंदना ही उच्च शिक्षित असल्याने शेतीतील अभ्यासासह स्वत:च्या मेहनतीला तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आणि नवनवीन प्रयोग याची जोड देत उत्तम प्रकारे शेती करीत आहे. मोठी बहीण शेतामध्ये जीव ओतून काम करीत असल्याचे पाहून छोटी बहीण ऋतुजा देखील तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मदत करीत असते.
शेतीला जोडधंदा
शेळके यांच्या शेतात डाळिंब, कांदे, गहू, हरभरा, ऊस यांसह चारापिकांची लागवड करण्यात येते. शेतीला जोडधंदा म्हणून वंदना पशुपालन देखील करीत आहे. दुधाची धार काढण्यापासून ते डेअरीवर घालण्यापर्यंतची सर्व कामे वंदना करत आहे. वडीलांच्या स्वप्नातील आदर्श शेती उभारण्यासाठी ती काम करत असल्याची भावना वंदनाने व्यक्त केली आहे.
शेतीमध्ये मोठे भविष्य
शेती करतांना शेतकर्यांना अनेक समस्या येतात. वेळेवर मजूर मिळत नाही… त्यामुळे सगळी काम शेतकर्याला करावी लागतात. त्यामुळे शेतकर्यांच्या मुला, मुलींनी हार न मानता व नोकरीच्या मागे न धावता शेती केली पाहिजे. शेतकरी मुलगा नको म्हणणार्या मुलींनी सुद्धा शेती केली पाहिजे. शेतीमध्ये करण्यासारखे खुप आहे. शेतीमध्ये मोठे भविष्य असल्याचे वंदना अभिमानाने सांगते.
माझ्या वंशाचा दिवा मुलीच
मला वंदना व ऋतृजा अशा दोन मुली आहेत. मुलगा नसल्याने शेती करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र आज माझ्या दोन्ही मुली मुलाप्रमाणेच शेती करत आहे. वंदना बी.फार्मसी करत असून, तिला ट्रॅक्टर चालविण्याचा छंद होता म्हणून ट्रॅक्टर घेऊन दिला. त्यामुळे ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची सर्व कामे करत आहे. दोन्ही मुलींनी आजपर्यंत मुलाची उणीव भासून दिली नाही. त्यामुळे माझ्या वंशाचा दिवा या दोन्ही मुलीच आहेत.
– लिंबाजी शेळके
(वंदनाचे वडील)
वडिलांमुळेच धाडस…
माझ्या वडिलांमुळेच माझ्यात हे धाडस आले. ज्या पद्धतीने आई-वडील आपल्या मुलांचा हट्ट पुरवतात त्याच पद्धतीने माझे आई-वडील आम्हा दोन्ही बहिणींचा हट्ट पुरवतात. मी माझ्या मैत्रिणींना देखील सांगते की, तुम्ही ट्रॅक्टर, मोटारसायकल शिका. त्यातूनच धाडस निर्माण होते. मुलींनी कोणत्याच क्षेत्रात अडून न राहता पुढे गेले पाहिजे. यातूनच खर्या अर्थाने मुलींची ओळख जगाला होते.
– वंदना शेळके,
युवा शेतकरी,
रा. शेळकेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर