नवी दिल्ली : देशाच्या बऱ्याचशा भागात अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. या खोळंबलेल्या मान्सूनमुळे काही भागात तर पावसाची तूट 80 टक्क्यांपर्यंत आहे. अर्थात, असे असले तरी रेंगाळलेला मान्सून तूट भरून काढण्याची आशा भारतीय हवामान विभागासह (IMD) स्कायमेटनेही वर्तविली आहे.
मान्सून कसर भरून काढण्याची हवामान खात्याला आशा
हवामान खात्याने यंदा सलग चौथ्या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. मात्र, जूनच्या पूर्वार्धात त्याच्या संथ प्रगतीमुळे भातासारख्या पिकांच्या पेरणीला विलंब होत आहे. अर्थात, मान्सून जूनच्या उत्तरार्धात वेग वाढवेल आणि कमतरता भरून काढेल, अशी हवामान खात्याला आशा आहे. या अंदाजानुसार, गेल्या 2-4 दिवसात पावसाने सर्वत्र चांगला जोर धरला आहे. देशभरातील पावसाची तूट 11 जून रोजी 43 टक्क्यांवरून 17 जून रोजी 18 टक्क्यांवर आली आहे, असे हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले. काही भाग वगळता आता पूर्व, मध्य आणि ईशान्य भारतात समाधानकारक पाऊस असून वायव्य भारतात 23 जूननंतर पर्जन्यवृष्टी वाढेल, असा अंदाजही “आयएमडी”ने वर्तवला आहे. मान्सूनचा पाऊस कधीही सर्वत्र एकसमान बरसत नाही. काही भागात कमी तर काही भागात अधिक पाऊस पडेल; पण देशभरातील अपेक्षित सरासरी गाठली जाईल, अशी “आयएमडी”ला आशा आहे.
चक्रीवादळाने मान्सून ताळ्यावर येण्याचा “स्कायमेट”चा अंदाज
“स्कायमेट”चे अध्यक्ष जीपी शर्मा यांनीही मान्सूनने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही त्यात काही अडथळे असल्याचे मान्य केले. आतापर्यंत पाऊस समाधानकारक बरसलेला नसला तरी हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि लगतच्या बांगलादेशच्या काही भागांवर चक्रीवादळ निर्माण होऊन गंगेच्या खोऱ्यात वाऱ्याचे स्वरूप बदलेल, असा अंदाज आहे. वायव्य भारतात मान्सूनच्या प्रगतीसाठी हे चक्रीवादळ महत्त्वपूर्ण ठरेल.
महाराष्ट्र, मध्यप्रदेशात चिंतेचे वातावरण
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तसेच शेजारील तेलंगणा, छत्तीसगड आणि झारखंडसह देशाचे मध्य भाग हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास किंवा समाधानकारक न बरसल्यास मध्य भारतात अन्न-धान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून या भागातला शेतकरी सर्वात असुरक्षित असतो. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात प्रदेशागणिक विविध हवामान परिस्थिती आहेत. मान्सूनला उशीर झाल्यास महाराष्ट्रातील खरीप उत्पादनाला मोठा धोका निर्माण होतो. म्हणूनच लांबलेल्या व अपुऱ्या मान्सूनमुळे या क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच मध्य भारत समाधानकारक मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
पंजाब, हरियाणाला फारसा फरक नाही
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मान्सूनवर अवलंबून नाहीत. त्यांच्याकडे त्यांची संसाधने आणि नलिका विहिरी, कालवे इ. सिंचनाचे विस्तृत जाळे आहे. पंजाबमध्ये 98 टक्के पीक क्षेत्र खात्रीशीर सिंचनाखाली आहे. परंतु देशातील सर्वच प्रदेशांत असे चित्र नाही. देशाच्या काही भागात तर पावसाची तूट तब्बल 80 टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे.
तूट भरून निघण्याचा अंदाज
मध्य भारतातील जूनच्या पूर्वार्धाचा निराशाजनक टप्पा आता संपलाय. या भागात जूनच्या उत्तरार्धात पावसाची चांगली कामगिरी अपेक्षित असल्याचा “स्कायमेट”चा अंदाज आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (एआरएआय) मुख्य शास्त्रज्ञ विनोद सहगल यांनीही जूनच्या अखेरीस पावसाची तूट भरून काढली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आता यापुढे मान्सूनच्या प्रगतीचा दृष्टिकोन चांगला असून परिस्थिती इतकी चिंताजनक नाही, असेही त्यांनी सांगितली. आता जुलैमध्ये चांगला पाऊस झाला पाहिजे कारण जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसाची मोठी तूट खरीप पिकासाठी विनाशकारी ठरू शकते, असेही सहगल यांनी स्पष्ट केले. चांगला पाऊस दीर्घकाळ आवश्यक आहे कारण उन्हाळ्यातील सलग उष्णतेच्या लाटेने जमिनीतील ओलावा शोषला आहे, असेही त्यांनी सांगितले.
काही अहवाल, अभ्यासात चिंताजनक भविष्याचे अंदाज
मान्सूनच्या प्रगतीत सुधारणा होण्याचा विश्वास व्यक्त होत असला तरी काही अभ्यास वा अहवाल मात्र मान्सूनचा उत्तरार्ध हा अस्थिर असेल, असे सूचित करतात. त्यानुसार, पुढील दोन महिन्यांत पावसाची तूट कायम राहील. पावसाची तूट जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कायम राहिल्यास, त्याचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होतील.
India’s 70 per cent rainfall registered through mansoon showers and it irrigates almost 60 per cent of its net sown area. Approximately country’s half of the population depends on agriculture directly or indirectly.
Poor monsoon could create danger for India’s agriculture-based economy, say experts.