अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर तसेच शेतात उपद्रव वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबाला; तसेच पाळीव जनावरांनाही वन्य प्राण्यांचा त्रास सोसावा लागतो, प्रसंगी प्राणसुद्धा गमवावे लागतात. रानडुक्कर, हरिण, निलगाय, माकड वैगेरे वन्य प्राण्यांकडून पिके, फळझाडांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या हानीमुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते.
राज्यात रानडुक्कर, हरिण (सारंग व कुरंग) , रानगवा, निलगाय, माकड , वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. हिंस्र पशूंनी थेट शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटनाही घडतात. अशा विपरीत परिस्थितीत वन्य प्राण्यापासून होणाऱ्या जीवितहानीसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते.
किती मिळते नुकसानभरपाई?
1. शेतकऱ्यांचे दोन हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्यास पूर्ण रक्कम किंवा किमान पाचशे रुपये.
2. नुकसान हे दोन हजारांहून जास्त आणि दहा हजारांच्या आत असल्यास दोन हजार रुपये अधिक दोन हजारांवरील रकमेच्या नुकसानीच्या 50% रक्कम (कमाल सहा हजार रुपये)
3. नुकसान दहा हजारांपेक्षा जास्त असल्यास सहा हजार रुपये अधिक दहा हजारावर रकमेच्या नुकसानीच्या 50% रक्कम (कमाल 15 हजार रुपये)
4. ऊस पिकाच्या नुकसानीपोटी 400 रुपये प्रति मे. टन इतकी भरपाई मिळू शकते.
वन्यहत्ती, रानगवे यांनी फळबागांची नासाडी, नुकसान केल्यास…
फळझाडे :
1. नारळ प्रति झाड दोन हजार, 2. सुपारी प्रति झाड 1,200
3. कलमी आंबा प्रति झाड 1,600
4. केळी प्रति झाड ४८ रुपये
5. इतर फळझाडे प्रति झाड 200 रुपये
पीक नुकसानीनंतर 72 तासांत तक्रार नोंदविणे आवश्यक
जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर याची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांत करावी.
तक्रारीची होईल खातरजमा
पिकाचे नुकसान झाल्याची शहानिशा संबंधित वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी अशा तीन सदस्यांच्या समितीमार्फत दहा दिवसाच्या आतमध्ये करण्यात येते. ही शहानिशा पिकाचे नुकसान झालेल्या जागेवर जाऊन करण्यात येते. पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे, ही कामे या समितीकडून केली जातात. शेतकऱ्यांनी जर मोबाईलवर छायाचित्रे काढून पुरावे गोळा करून ठेवल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी याची मदत होऊ शकते. काही वेळेला शासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे हे तीन कर्मचारी एकत्र येण्यास विलंब होऊन प्रक्रिया लांबू शकते.
तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे
पीक नुकसानीची तक्रार झाल्यानंतर काही कागदपत्रे सादर करावी लागतात, यामध्ये पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
दोन महिन्यात प्रकरण निकाली काढणे आवश्यक
पीक नुकसानीची शहानिशा झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित सहाय्यक वनसंरक्षक यांनी घटना घडल्याचे तारखेपासून तीस दिवसांत काढणे आवश्यक आहे. तसेच आदेश काढल्यानंतर एक महिन्याचे आत बाधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. भरपाईची रक्कम शेतकऱ्याला उशिरात उशिरा साठ दिवसांत मिळालीच पाहिजे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही नुकसान भरपाई
1. वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे करण्यात येणारी शेती.
2. भारतीय वन किंवा वन्यजीव अधिनियमांतर्गत ज्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे अशा व्यक्तींची शेती.
3. ज्या कुटुंबात 4 पेक्षा जास्त गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्या कुटुंबाची शेती.
4. मागील एक महिन्याच्या कालावधीत वन्यप्राण्यांच्या शिकारीची घटना झालेली गावे.
नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पुढील वेबसाईट लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज दाखल करा
1. पीक नुकसानीकरीता भरपाई
https://cutt.ly/Pik-Nuksan-Bharpai-VanyaJivaPrani-Agroworld
2. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य
https://cutt.ly/Vyakti-Jakhmi-Mrut-Bharpai-VanyaJivaPrani-Halla-Agroworld
3. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई
https://cutt.ly/VanyaPrani-Halla-Pashudhan-Nuksan-Bharpai-Agroworld
———
Maharashtra Agriculture News | Compensation for Crop Damage by Wild Animals |