दीपक खेडेकर, रत्नागिरी
पारंपरिक शेतीसोबत शेतीमालावर प्रक्रिया उद्योगातून कशी आर्थिक सुबत्ता प्राप्त करता येते, हे सातारा जिल्ह्यातील कांचन कुचेकर या महिलेने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांची कडीपत्त्याची शेती इतरांसाठी आदर्शवत ठरली आहे. या शेतीच्या माध्यमातून उत्पादीत होणार्या कडीपत्त्यावर प्रक्रिया करुन त्या पावडर तयार करतात. या पावडरच्या विक्रीतून त्यांची लाखोंची उलाढाल होते. अल्पावधीतच कांचन कुचेकर यांनी प्रक्रिया उद्योगात घेतलेली भरारी, महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 🥭
खालील व्हिडिओ पहा..

जेवणात घरोघरी वापरल्या जाणार्या कढीपत्त्याची शेती केली जाते, याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. कढीपत्त्याच्या पानांना विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या भाज्या, चटण्या व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. सहज उपलब्ध होणार्या व बाजारात अगदी कमी किंमतीत मिळणार्या कढीपत्त्यावरील प्रक्रिया उद्योग यशस्वी करुन दाखवला आहे, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील हनुमंत व कांचन कुचेकर या दाम्पत्यांनी. सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटरवर कुचेकर कुटुंबीयांकडे वडिलोपार्जीत शेती असल्याने ते पारंपरिक पिके घेऊन शेती करायचे. त्यातून त्यांना खर्च वजा जाता, अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी आहे त्या परिस्थितीत शेती करुन जेमतेम उत्पन्न मिळायचे.
अशी सूचली कल्पना
हनुमंत कुचेकर हे एस. टी. महामंडळात नोकरीला असल्यामुळे त्यांचे बाहेरगावी येणे जाणे व्हायचे. अशाच एका प्रवासात त्यांनी 2011-12 मध्ये एका शेतात कडीपत्त्याची बरीच झाडे पाहिली. उत्सुकतेपोटी त्यांनी ज्यांची ही झाडे होती, त्यांना विचारले. त्यावर कुचेकर यांनी मनाशी अशीच काही तरी वेगळी शेती करण्याचे मनोमन ठरवले. घरी आल्यानंतर पत्नी कांचन यांना ही कल्पना सांगताच, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार, कुचेकर दाम्पत्याने निर्धार करून आपल्या वडिलोपार्जित जागेमध्ये 50 गुंठ्यावर कढीपत्त्याची शेती करण्याचे ठरवले. त्यानुसार, त्यांनी इकडून तिकडून माहिती देखील मिळवली. सरासरी 7 हजार कडीपत्त्याची रोपे विकत घेऊन ती सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन केले. या भागात अशा शेतीचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे सुरवातीला कुचेकर दाम्पत्यांना त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूचे शेतकरी अशा सर्वांकडूनच विरोध झाला. मात्र, त्यांच्या मनाचा पक्का निर्धार असल्याने त्यांनी होणार्या विरोधाला न जुमानता ही शेती करायचीच असे ठरवून पुढील नियोजनाला सुरवात केली.

कृषी विभागाचे मार्गदर्शन
कुचेकर दाम्पत्यांनी कडीपत्ता शेती करण्याचे ठरवून आवश्यक ती माहिती मिळवली असली तरी चांगल्या उत्पादनासाठी शास्त्रशुद्ध व तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी जवळच्या बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. या केंद्रातून मिळालेल्या माहितीमुळे त्यांचे मनोबल आणखीनच उंचावले. कडीपत्ता लागवडीसाठी चांगला पाण्याचा निचरा होणार्या जमिनीची आवश्यकता असते. त्यादृष्टीने तशा जमिनीची निवड त्यांनी केली. या जमिनीवर दोन ट्रॉली शेणखत टाकले. पॉवर टिलरच्या सहाय्याने हे खत मिसळले. त्यानंतर जवळच्याच एका रोपवाटिकेतून कडीपत्त्याच्या डीडब्ल्यूडी-2 या जातीची त्यांनी रोपे आणली. या सर्व प्रक्रियेत कांचन कुचेकर यांनी जणू स्वतःला झोकूनच दिले होते. स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवून त्यांनी मजुरांसोबत आणलेली रोपे लावण्यास सुरवात केली.

अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर
कांचनताईंनी सुरवातीला घरगुती मिक्सरचा वापर करुन कढीपत्त्याची पावडर तयार करणे सुरु केले. कृषी विभागाच्या त्या संपर्कात राहिल्याने त्यांना कृषी विभागातर्फे ठिकठिकाणी होणार्या प्रदर्शनांना जाण्याची संधी मिळत गेली. या प्रदर्शनांच्या त्या कढीपत्त्याच्या पावडरचा स्टॉल लावत असल्याने पावडरची चांगली विक्री होऊ लागली. त्यांच्या पावडरला यातून चांगली प्रसिद्धी देखील मिळाली. ग्राहकांची मागणी वाढल्यानंतर घरगुती मिक्सरवर पावडर तयार करणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे त्यांनी या संदर्भातील काही यंत्रांची बाजारातून माहिती घेऊन सोलर ड्रायरसारखी अद्ययावत यंत्रे विकत घेतली. या दरम्यान, हनुमंत कुचेकर हे निवृत्त झाल्याने या व्यवसायात त्यांना त्यांची चांगलीच मदत झाली. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर त्यांची कढीपत्त्याची पावडर एका विक्रेत्याच्या माध्यमातून तीन आखाती देशातही गेली आहे.
लागवडीचे व्यवस्थापन
शेत तयार झाल्यानंतर साधारणतः अडीच फूट अंतरावर त्यांनी या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर जवळपास 15 दिवसांनी सर्व रोपांना जीवामृत देऊन पाणी देण्यास सुरवात केली. त्यानंतर आश्यकतेनुसार निंबोळी पेंड, करंजी पेंड सरीत मिसळून देणे सुरु केले. याशिवाय गरजेनुसार दर 15 दिवसांनी पाणी दिले गेले. संपूर्ण कडीपत्त्याच्या शेतीत कोणत्याही रासायनिक खतांचा वापर त्यांनी केला नाही. रोपांची सुरवातीपासूनच योग्य ती काळजी घेतल्याने रोपांची चांगली वाढ होऊ लागली. लागवडीनंतर सुमारे 9 महिन्यानंतर कडीपत्त्याची पहिल्यांदा छाटणी त्यांनी केली.

विक्री प्रक्रियेतील अनुभव
कढीपत्त्याचे उत्पादन सुरु झाल्यानंतर बाजारात मात्र भावाबाबत चढउतार होत होती. अशातच त्यांना काही व्यापार्यांचे वाईट अनुभव आले. काहींनी तर चक्क फसवणूकच केली.
पुणे, वाशी, मुंबई येथे वेळोवेळी छाटणीनंतर कडीपत्ता पाठवूनही पाहिजे तसा आर्थिक फायदा होत नव्हता. काही वेळा तर कवडीमोल दराने कडीपत्त्याची विक्री त्यांना करावी लागली. कधी विक्री झालीच तर बर्याचदा मध्यस्थी असलेल्या दलालाकडून अपूर्ण पैसे मिळायचे. कधी कधी तर पैसे मिळतील की नाही, याची देखील शाश्वती नसायची. मात्र, येणार्या या अडचणींवर मात करीत विशेषतः कांचनताईंनी यातूनही काही चांगले घडेल, या आशेने कडीपत्त्याची छाटणी करुन त्याची विक्री सुरुच ठेवली. या दरम्यान, मराठवाड्यातील पाटील नामक एका व्यापार्याशी त्यांनी केलेला कढीपत्ता विक्रीचा व्यवहार यशस्वी झाला.
मूळचे कोल्हापूरचे असलेल्या श्री. पाटील यांनी कुचेकर यांचा कढीपत्ता सुमारे दोन वर्षे खरेदी केला. या व्यवहारातून त्यांना काहीसा चांगला आर्थिक लाभ झाला. मात्र, आपण एका व्यापार्यावर अवलंबून न राहता, बाजारात इतरही खरेदीदार शोधले पाहिजे यादृष्टीने त्यांनी नियोजन सुरु केले. हनुमंत कुचेकर हे एस. टी. महामंडळात नोकरीला असल्याने नोकरी सांभाळून त्यांना पाहिजे तसा वेळ शेतीसाठी देता येत नव्हता. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेचे कामकाजही कांचनताईच पाहू लागल्या. यातूनच त्यांना प्रक्रिया उद्योगाची माहिती झाली.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
आंतर मशागत व औषध फवारणी
कडीपत्यांची रोपे एकदा लावल्यानंतर त्यापासून तब्बल 12 वर्षे उत्पादन मिळते. कढीपत्ता ही जंगली वनस्पती असल्याने त्याला शेळ्या, मेंढ्या खात नाहीत. कढीपत्त्यांच्या झाडांना शेतात 99 टक्के कीड लागत नाही. तरीही कीडीची लागण झाली तर त्यांच्या नियंत्रणासाठी झाडांवर दशपर्णी व निंबोळी अर्काची फवारणी केली तर लगेचच फरक पडतो, त्यादृष्टीने कांचनताईंनी सर्व झाडांची योग्य ती काळजी घेतली आहे. शेतात उन्हाळ्यात 15 दिवसांनी आणि हिवाळ्यात 20 दिवसांनी आवश्यकतेनुसार पाणी त्या देतात. पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी त्यांनी कॅनलच्या माध्यमातून पाण्याची सोय केलेली आहे. दर तीन महिन्यातून त्या कढीपत्त्याच्या रोपाच्या मूळाशी शेणखत, जीवामृत व गांडूळ खत देतात. याशिवाय ठरावीक कालावधीनंतर पॉवर टिलरच्या साहाय्याने आंतरमशागत करण्यावर देखील त्या भर देतात. या व्यवस्थापनामुळे त्यांची सर्व झाडे सुस्थितीत असून त्यापासून चांगले उत्पादन त्यांना मिळत आहे.
प्रक्रिया उद्योगाच प्रशिक्षण
कढीपत्त्यांची बाजारात विक्री होत असली तरी कढीपत्त्यांच्या पावडरला देखील चांगली मागणी असल्याचे कांचनताईंच्या लक्षात आले होते. त्यादृष्टीने त्यांनी यासंदर्भातील आणखीन माहिती घेण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना फळ व अन्न प्रक्रियेसंदर्भात प्रशिक्षण मिळते, याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनाी सातारा येथील कृषी विद्यापीठाशी संपर्क साधला. कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्रक्रिया उद्योगाचा श्रीगणेशा केला. या प्रशिक्षणानंतर कढीपत्त्याचे उत्पादन घेण्यासोबतच त्याची पावडर करुन विक्री करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांना पणन तज्ज्ञ सायली महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.

शेतात पारंपरिक पिके घेण्यापेक्षा काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने आम्ही कढीपत्त्याच्या लागवडीचा प्रयोग केला. सुरवातीपासूनच योग्य व्यवस्थापन केल्यामुळे चांगले उत्पादन मिळाले. बाजारात काही वेळा मालाची विक्री करताना काहीसे नैराश्यही आले. मात्र, येणार्या अडचणींवर मात करुन आम्ही त्यात यशस्वी झालो. कढीपत्त्याच्या पावडरला चांगली मागणी असल्याने या व्यवसायात आम्ही बर्यापैकी यश मिळवले आहे.
– रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा
संपर्क ः 9422033357, 9423862223
कढीपत्त्याचे औषधी उपयोग
कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी व गुणकारी असतात, ती पाचक असल्याने भूक वाढते व घेतलेला आहार पचण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर या भाज्यापेक्षा अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते. मूळव्याधीच्या आजारात रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यायल्यास रक्त पडण्याचे थांबते. अपचन, अरुची, अग्निमांद्य (भूक कमी होणे) ही लक्षणे जाणवत असतील तर कढीपत्त्याची 2-3 पाने चावून खावीत. यामुळे बेचव तोंडाला रुची निर्माण होऊन भूक लागल्याची जाणीव निर्माण होते. पोटात मुरडा येत असेल तर तो कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब लघवी होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घड्या बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते. शरीरावर विषारी कीटकाच्या दंशाने सूज आलेली असेल तर कढीपत्त्याची पाने वाटून त्यावर त्याचा लेप द्यावा. यामुळे सूज उतरते. दात व जीभ अस्वच्छ राहिल्यामुळे तोंडास दुर्गंधी येत असेल तर कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे जिभेवरील साचलेला पांढरा थर दूर होतो, दात स्वच्छ होतात व त्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तसेच रक्तस्राव कमी होत असेल, चेहर्यावर काळे वांग, मुरमे पुटकुळ्या येत असतील, केस गळणे, केसांत कोंडा होणे या तक्रारी असतील तर नियमितपणे कढीपत्त्याच्या पानांचा काढा 2-2 चमचे सकाळ-संध्याकाळ घ्यावा.











We want to Do or want to provide something to Farmers so please suggest us something or take up us with you or your Team for doing something for Farmers bcoz we are also one Farmer
Thank you !