आनन शिंपी, चाळीसगाव
समाजातील विविध क्षेत्रांत महिलांनी मोठी भरारी घेतली आहे. त्यात शेती क्षेत्रही आता मागे राहिलेले नाही. शेती करण्यासंदर्भात महिलांच्या नेतृत्वगुणाबाबत शंका उपस्थित होत असल्या तरी समाजात अशाही काही महिला आहेत, की ज्यांनी पूर्वापार चालत आलेला हा समज खोटा ठरवत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कष्टाला योग्य नियोजनाची जोड देत शेतीतही वाखाणण्याजोगी प्रगती साधली आहे. लोंढे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील कोकीळाबाई देविदास पाटील यांनी शेतीत केलेली प्रगती महिलांसह सर्व शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत त्यांनी शेडनेटच्या माध्यमातून ढोबळी मिरचीचे एका एकरात तब्बल 14 लाखांहून अधिक उत्पन्न घेतले आहे.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…🥭
खालील व्हिडिओ पहा..
चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचखेडे गावाकडे जाणार्या रस्त्यावर लोंढे शिवारात रस्त्यालगच्या शेतातील शेडनेट लक्ष वेधून घेते. या शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली असून ही लागवड करणार्या लोंढे गावातील कोकीळाबाई पाटील यांचा शेतीचा प्रवास महिलांसह संबंध शेतकर्यांना दिशा देणारा ठरला आहे. कोकीळाबाई यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने शेतीशी त्यांचा लहानपणापासूनच संबंध आहे. त्यांनी लोंढे गावातच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. 1991 मध्ये जानवे- अमळनेर येथील देविदास पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. देविदास पाटील यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे देविदास पाटील हे लग्नानंतर काही दिवसांनी मामांकडे म्हसवे गावी आले. या काळात ते दुसर्याची शेती करुन गुजराण करायचे. कोकीळाबाई देखील शेतीकाम करायच्या. पती- पत्नी, दोन मुली व मुलगा असे त्यांचे कुटुंब. कालांतराने मुले मोठी होत असल्याने काहीशी आर्थिक चणचण भासायची. मात्र, अशाही परिस्थितीत कोकीळाबाईंनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. त्या स्वतः दहावी शिकलेल्या असल्याने आपण परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही तरी आपली मुले शिकली पाहिजे, असे त्यांना सुरवातीपासूनच वाटायचे. त्यामुळे पतीसोबत शेती कामे करुन त्यांनी दोन्ही मुली व मुलाला चांगले शिक्षण दिले. त्यांच्या दोन्ही पदवीधर मुलींचे विवाह झाले असून मुलगा एम. बी. बी. एस.चे शिक्षण घेत आहे.
भावाची मोलाची साथ
कोकीळाबाई पाटील यांना सुरवातीपासूनच त्यांचे ग्रामसेवक असलेले भाऊ संजीव निकम यांची मोलाची साथ होती. आपल्या बहीण आणि मेहुण्यांना श्री. निकम यांनी लोंढे शिवारात चार एकर शेती घेऊन दिली. स्वतःची शेती झाल्याने कोकीळाबाईंनी जणू स्वतःला झोकूनच दिले. त्यासाठी त्यांना पतीची चांगली साथ मिळाली. सुरवातीला त्यांनी भुईमुंग, ज्वारी, कपाशी यासारखी पारंपरिक पिके घेतली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना कोकीळाबाईंनी शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. स्वतः कष्ट करण्याची त्यांची तयारी असल्याने त्या बर्यापैकी उत्पन्न घेऊ लागल्या. त्यामुळे संसाराला दोन पैशांची मदत झाली. या शेतीतून त्यांना वर्षाकाठी एक लाखांचा नफा होत होता. स्वतःची शेती असतानाही उत्पन्न मात्र अपेक्षेपेक्षा कमी येत होते. त्यामुळे आपल्या शेतीत काही तरी नवीन करावे, असे कोकीळाबाईंना सुरवातीपासूनच वाटायचे.
कृषी विभागाची साथ
लोंढे परिसरातील कृषी मित्र सोनू निकम हे कोकीळाबाईंचे शेतातील कष्ट सुरवातीपासूनच पाहत आले होते. त्यामुळे त्यांनी कृषी सहाय्यक अधिकार बोरसे व समुह सहाय्यक प्रशांत साळुंखे यांना कोकीळाबाईंविषयी सांगितले. त्यानुसार, कृषी विभागाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत त्यांना लाभ देण्याचे त्यांनी ठरवले. पारंपरिक शेती करण्यापेक्षा संरक्षित शेतीतून होणारा लाभ लक्षात घेऊन कोकीळाबाईंचे चिरंजीव प्रशांत पाटील यांच्याशी सुरवातीला अशी शेती करण्यासंदर्भात प्राथमिक पातळीवर चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, घरी आई- वडिलांना अशा शेतीबाबत सांगितले. आतापर्यंत पारंपरिक शेती करत आलेल्या कोकाळीबाईंचा अशा शेतीवर विश्वासच बसत नव्हता. मात्र, कृषी विभागाचे लोक तसेच मुलाने सांगितल्यामुळे त्या तयार झाल्या. मात्र, संरक्षित करण्याची कोकीळाबाईंनी तयारी दर्शवली असली तरी त्या मनापासून मात्र त्यासाठी तयार नव्हत्या. म्हणून त्यांनी अशा शेतीची इतरांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर कृषी विभागाच्या सहकार्याने त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत आपल्या शेतातील एक एकरावर शेडनेट उभारण्याचा निर्णय घेतला.
ढोबळी मिरचीची लागवड
शेडनेटसाठी त्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्याला अपेक्षेप्रमाणे मंजुरी मिळाली. त्यानुसार, कोकीळाबाईंनी जूनमध्ये एक एकरावर 100 बाय 40 मीटर आकाराचे साधारणतः चार मीटर उंचीचे शेडनेट उभारले गेले. त्यासाठी 15 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. शेडनेटमध्ये शेती करण्याचा कुठलाही पूर्वअनुभव नसताना कोकीळाबाईंनी स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या रोपांची माहिती त्यांनी घेण्यास सुरवात केली. उगाव येथील ओम गायत्री नर्सरीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः उगावला जाऊन मिरचीची रोपे विकत आणली. या रोपांच्या लागवडीनंतर त्यांची कशी काळजी घ्यायची, याविषयी नर्सरीचे योग्य मार्गदर्शन त्यांना मिळाले. या मार्गदर्शनातून कोकीळाबाईंची हिंमत वाढली व त्यांनी आपले सर्व लक्ष शेडनेटमधील ढोबळी मिरचीवरच केंद्रीत केले.
विक्रीचे व्यवस्थापन
कोकीळाबाईंनी मिरचीची लागवड केली आहे, ही माहिती त्यांनी त्यांचे सुरत येथील आतेभाऊला अगोदरच दिलेली होती. सुरतला भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ असल्याने या मिरच्या कुठेही न विकता त्या सुरतच्या बाजारात पाठवाव्यात, असा आग्रह त्यांच्या आतेभावाने धरला होता. त्यानुसार, त्याने सुरतच्या संबंधित व्यापार्यांनाही पूर्व कल्पना दिलेली होती. त्यामुळे कोकीळाबाईंना उत्पादीत झालेली मिरची विकण्यासाठी फारसे कष्ट पडले नाहीत.
लागवडीचे नियोजन
ऑगस्टमध्ये लक्षमीपूजनाच्या मुहुर्तावर कोकीळाबाईंनी रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार, सुरवातीला शेत जमिनीची आडवी व उभी नांगरणी केली. त्यानंतर दीड बाय 26 मीटर अंतरावर बेडचा बेस तयार केला. पाच फूट अंतरावरील 26 बेडवर त्यांनी 11 हजार रोपांची लागवड केली. लागवड करण्यापूर्वी संपूर्ण शेत जमिनीवर घरचे शेणखत टाकले होते. बेडवर मल्चिंग पेपर टाकून ज्या दिवशी प्रत्यक्ष रोपांची लागवड केली, त्याच दिवशी ड्रिचिंग केले. त्यासाठी सुमारे दोनशे लिटर पाण्यात ट्रायकोडर्मा व सुडोमोनस प्रत्येकी एक- एक किलो वापरुन हाताने स्प्रे पंपाद्वारे फवारणी केली. रोपांच्या लागवडीनंतर प्रत्येकी पाच दिवसांनी अशी फवारणी सुरु ठेवली. या दरम्यान, कोकाळीबाई ओम गायत्री नर्सरीतील तज्ज्ञांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती किटकनाशके व बुरशीनाशके वापरली. फवारणीसाठी शेतातच त्यांनी सॅन्ड फिल्टर, व्हेन्चुरी व डिक्स फिल्टर बसवले.
पाण्याचे व्यवस्थापन
कोकीळाबाईंच्या शेतात विहिर असली तरी तिला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे जवळच्या कृष्णापुरी धरणातून तब्बल सहाशे पाईप वापरुन त्यांनी 2012 मध्येच आपल्या विहिरीत पाणी आणले. ढोबळी मिरचीच्या रोपांची लागवड मल्चिंग पेपरवर केलेली असल्याने त्यांना पाणी तुलनेने कमी लागणार होते. त्यामुळे एकीकडे आवठड्यातून दोन वेळा ड्रिचिंग सुरु असताना रोपांना दररोज केवळ 25 मिनीटेच पाणी दिले. शेडनेटमध्ये पाण्याचे बाष्पीभवनही कमी होत असल्याचे कोकीळाबाईंनी माहिती घेताना लक्षात घेतले होते. त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन त्यांनी पाणी देण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. विशेष म्हणजे, एक मिनीट देखील जास्त पाणी त्या पिकांना देत नव्हत्या. लागवडीपासून ते रोपे वाफसा परिस्थितीत आल्यानंतर त्यांनी पाणी देण्याचे योग्य नियोजन केले होते. साधारणतः पंधरा दिवसांनी रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर त्यांनी मजुरांसोबत स्वतः दोर्यांची बांधणी केली.
पहिला तोडा एक टनाचा
मिरचीच्या रोपांची सुरवातीपासूनच योग्य निगा राखल्यामुळे रोपांना चांगल्या मिरच्या लागल्या. 16 नोव्हेंबरला त्यांनी पहिली तोड करण्याचे नियोजन केले. मिरच्या तोडण्यासाठी त्यांच्याकडे मजूर असले तरी त्यांच्यासोबत कोकीळाबाई व त्यांचे पती स्वतः मिरच्या तोडायचे. पहिला तोडा त्यांना जवळपास एक टनाचा झाला. त्यावेळी बाजारात त्यांच्या मिरचीला 70 रुपयांचा प्रती किलो भाव मिळाला. या तोडीनंतर आठव्या दिवशी दुसरी तोड करुन दीड टन मिरच्या हाती लागल्या. तर तिसरी तोड तब्बल अडीच टनाची झाली. त्यानंतर अशा आठ ने नऊ वेळा मिरचीची काढणी त्यांनी केली.
10 लाखांचा निव्वळ नफा
कोकीळाबाईंच्या शेतातून आजअखेर 13 लाखांच्या मिरच्या बाजारात विकल्या गेल्या आहेत. अजून माल निघणे सुरुच असल्याने आणखीन साधारणतः तीन लाखांचा माल निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. मिरचीची लागवड करण्यापासून ते प्रत्यक्ष उत्पादन हाती येईपर्यंत त्यांचा चार लाखांचा खर्च झाला आहे. साधारणपणे 14 लाखांच्या मिरच्या त्यांनी विकल्या असून त्यातून चार लाखांचा खर्च वजा जाता, निव्वळ दहा लाखांचा नफा त्यांना झाला आहे.
भाजीपाल्याचीही लागवड
कोकीळाबाई पाटील यांनी शेडनेटमध्ये मिरचीचे घेतलेले सर्वाधिक उत्पन्न परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यांची ही शेती पाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या शेडनेटला भेटी देत असतात. या शेतीसोबतच त्यांनी उरलेल्या शेतातील दीड एकरावर 1357 व विरांग 1215 जातीचे टमाटे तर पाऊण एकरावर एच. एफ. 1315 या जातीच्या कारल्याची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, टमाटे व कारल्याचे पीक त्यांनी लिंबूमध्ये आंतरपीक म्हणून घेतले आहे. याशिवाय दररोज घरी लागणारा भाजीपाला म्हणून मुळा, मेथी, कांदा, शेपूपालक यासारख्या भाजीपाल्याचीही लागवड केली आहे.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
खर्चाची केली नोंदवही
कोकीळाबाईंना सुरवातीपासून हिशेब ठेवण्याची आवड आहे. त्यामुळे शेतात जो काही खर्च होतो, तो त्या एका डायरीत लिहून ठेवतात. एक रुपया जरी त्यांनी शेतात खर्च केला असला त्याचीही नोंद त्यांनी डायरीत केलेली आहे. शेतकर्यांनी शेतीचा हिशेब ठेवला तर नेमका किती खर्च झाला व आपल्याला उत्पन्न किती मिळाले, याची अचूक माहिती मिळते असे कोकीळाबाई सांगतात. त्यामुळे मजुरांची मजुरी, वाहतूक, किटकनाशके, विजेचे बिल यासह इतर जो काही खर्च शेतीवर होतो, अशा सर्व खर्चाची नोंद त्या न विसरता आपल्या डायरीत करतात. आपल्या या डायरीमुळेच शेती आपल्याला परवडते की नाही हे लक्षात येत असल्याने प्रत्येक शेतकर्याने अशी स्वतःची डायरी ठेवावी, असे त्या आवर्जुन सांगतात.