पुणे ः पिकांच्या पोषक वाढीसाठी खतांची भूमिका मोलाची ठरते. या खतांचाच एक प्रकार असलेले ‘जिप्सम’ म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे जमिनीची सुपिकता वाढवणारे एक चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्समचा चांगला उपयोग होतो. शेत जमिनीत जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी टाकावा. त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास चांगली मदत होते.
जिप्समचे असे आहेत फायदे
जिप्समचा वापर जमिनीत केल्यानंतर जमीन भुसभुशीत होते. शिवाय जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सममुळे सुटे होतात. त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. यासोबतच बियाणांची उगवण चांगली होते. पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सममुळे कमी होतात. जमिनीची धूप कमी होते. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही. जमिनीतल्या कॅल्शियम मॅगनेशियमचे प्रमाण सुधारते. अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सममुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
फळपिकांची गुणवत्ता सुधारते
भुईमुग, कलिंगड, टमाटे, बटाटे यासारख्या पिकांची गुणवत्ता केवळ जिप्सममुळे सुधारत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिप्सम उपयोगी ठरते. पिकांनाही गंधक त्यामुळेच मिळतो, जो पिकांना आवश्यक असतो. जिप्सममुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात. जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही. जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते. जिप्सममुळे पीक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात. अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर करणे होय. त्यामुळे शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनीत जिप्समचा वापर केला पाहिजे, असे कृषी तज्ज्ञ सांगतात.