पुणे : राज्यात काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. अवकाळी पावसाचा निश्चितच रब्बी हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. या दरम्यान शेतात उभ्या असलेल्या पिकांवर कुठल्याही प्रकारची फवारणी करणे योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अळींचा प्रादुर्भाव रोखावा
मोहरी पिकाची लागवड केली असेल तर त्यावर चापा नावाच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव झाला तर कोरड्या वातावरणात प्रती लिटर पाण्यात ०.२५ मिलिमीटर इमिडाक्लोप्रिड मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक प्रामुख्याने घेतले जाते. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूची त्रिकोणी पक्षी थांबे लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे देखील गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
करपा रोगाचे नियंत्रण महत्त्वाचे
सध्याच्या वातावरणात बटाटा आणि टोमॅटो पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. या पिकांवर करपा रोग आला तर जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे टोमॅटो आणि बटाटा पिकावरील करपा रोगावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या पिकांवर करपा रोगाची लक्षणे दिसू लागली तर कार्बेन्डाझिम प्रति लिटर एक ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ दोन ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास डायथेन एम-४५ फवारणी करणे योग्य आहे. वटाण्याची लागवड केली असेल तर वाटाण्याच्या पिकावर दोन टक्के युरिया सोल्यूशन फवारणी करणे हिताचे ठरणार आहे.
भाजीपाला लागवडीसाठी पोषक
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे त्यानंतर भाजीपाला लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे भोपळा, कोबी, फुलकोबी यासारख्या भाजीपाल्याची लागवड केल्यास त्याला पोषक वातावरण राहील. याशिवाय या हंगामामध्ये कोथिंबीर, पालक आणि मेथी यांची पेरणी केली तरी ती फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी परिस्थिती पाहून भाजीपाल्याची लागवड करणे हिताचे ठरेल असेही कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे.