जळगाव – यंदाच्या वर्षी देशात सर्व भागात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामध्ये कापूस या पिकाचे सर्वांधिक नुकसान झाले. परिणामी, कापसाच्या उत्पादनातही 15 ते 20 टक्के घटीचा अंदाज आहे. बाजारात जास्त प्रमाणात कापूस उपलब्ध होत नसल्याने तसेच मागणीत मात्र वाढ कायम असल्याने कापसाचे दर तेजीत आहेत.
कापूस दरवाढीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारणे –
* अमेरिकेकडे यंदा कापसाचा शिल्लक साठा कमी असल्याने आंतरराष्ट्रीय कॉटन एक्स्चेंजर वर कापसाचे दर वाढलेले आहेत.
* जगातील महत्वाच्या कापूस उत्पादक देशात उत्पादनाची स्थिती मजबूत नसल्यानेही दर वाढले.
* चांगली मार्जिन असल्याने कापसाला सुतगिरण्यांकडून देशांतर्गत निर्यातीसाठी चांगली मागणी व सुत गिरण्या देखील खूप प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात कापूस लागत आहे.
* अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे त्याची मागणी वाढली.
* सूत आणि कापडाला चांगली मागणी असल्यामुळे कापसाची मागणी वाढलीे.
* बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया मध्ये कापसाला मागणी वाढत असल्याने कापूस निर्याती मध्ये वाढ झाली आहे.
* कापसाची वाढती मागणी पाहून या वर्षी कापसाची निर्यात ७५ लाख गाठींवर जाईल अशी शक्यता आहे.
निर्यात वाढल्यास दरही वाढतील
मागील वर्षी देशातून ७९ लाख गाठी कापसाची निर्यात झाली होती. तर यावर्षी ७५ लाख गाठी कापूस निर्यात होण्याची शक्यता आहे. आणि जर यंदाच्या हंगामात ५० लाख गाठी निर्यात झाली तर देशांतर्गत कापसाचा तुटवडा होऊ शकतो. परिणामी दरवाढीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी आशादायी हंगाम
कापसाचे दर जरी वाढत असले तरी ८ हजाराच्या खाली कापूस विकण्यास शेतकरी इच्छुक नाही. कारण यावेळी बाजार जरी वाढत असले तरी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सरासरी ८ हजराच्या खाली दर आल्यावर शेतकरी कापूस बाजारपेठेला देणे बंद करतात. परिणामी दर पुन्हा आधीच्या पातळीवर जात आहेत. इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे दर चांगले असल्याने हंगाम शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे.