कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागातील शेतकर्यांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. खरिपाची पिके हातातून गेली आहेत. पीक विमा सर्वांनीच काढला आहे, अशी परिस्थिती नाही. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र, ती म्हणजे ङ्गभुकेल्या शेतकर्याला गाजर दाखवणेफ असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत ज्या शेतकर्याने शेतीला पूरक म्हणून एखादा उद्योग सुरु केला असेल तर तो मानसिकदृष्ट्या खचलेला नाही हे राज्यातील काही शेतकर्याच्या उदाहरणांहून दिसून येते. असेच एक उदाहरण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी गावातील एका शेतकर्याचे आहे. गीर गाईंच्या दूध, तूप, गांडूळ खत व गोमूत्र यापासून दरमहा लाखो रुपयांची कमाई करून परिस्थितीवर मात करून या शेतकर्याने इतरांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
बीड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 650 ते 700 मिलीमीटर असताना यावर्षी आतापर्यंत 1 हजार 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. केज तालुक्यात 1 हजार 680 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि अजून दिवाळीपर्यंत पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. म्हणजे या तालुक्यात सरासरीच्या तिप्पट पाऊस पडला असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तालुक्यातील सर्व मोठी धरणे तलाव, बंधारे, विहिरी, बोअरवेल सर्व ङ्गओव्हरफ्लोफ झाली आहेत. काही ग्रामीण भागातील बोअरमधून पाणी आपोआप बाहेर येत आहे. या भागातील मुख्य पिके सोयाबीन, कापूस, तुर यातून अजूनही पाणी वाहत आहे. डोंगरातील बाजरी हे मुख्य पीक सुद्धा हातातून गेले आहे. 70 ते 80 टक्के शेतकर्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. विशेषतः मांजरा नदीकाठच्या व तिच्या उपनद्यांकाठच्या शेतकर्यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील 6 शेतकर्यांनी गेल्या 15 दिवसात आत्महत्या केल्या आहेत. असे एकीकडे चित्र असताना दुसरीकडे शेतीला जोड धंदे करणारा शेतकरी मात्र जगल्याचे दिसून येते. जे काही शेतकरी दूध विक्री, शेळी पालन, कुक्कुटपालन, खवा उद्योग, रेशीम उद्योगात आहेत, ते या तीव्र संकटातही खंबीरपणे उभे आहेत. अर्थात या सर्वांनाही नुकसानीचा फटका बसलाच आहे. मात्र, अशाही परिस्थितीत ते खंबीरपणे उभे आहेत. अशाच एका जिद्दी शेतकर्याचे नाव आहे, भागवत दिगंबर ठोंबरे. वय वर्षे 48 असलेल्या भागवत ठोंबरेंनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांना भाऊ असून त्यांच्या 16 एकर जमिनीपैकी आठ एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली आहे.
एकत्र असताना त्यांनी दोन एकरवर केशर आंब्याची लागवड केली होती. कालांतराने केशर नर्सरी सुरु केली. त्याच्या विक्रीतून पुढे दोन एकर जमीन विकत घेतली. पाण्यासाठी हंमागी पाणी असलेली 40 फूट खोलीची विहिर होती. त्यामुळे 30 बाय 30 मीटरचे शेततळे त्यांनी केले होते. पारंपरिक पिकांमध्ये मुग, उडीद, तूर, ज्वारी, हरभरा ही पिके ते घ्यायचे. शेततळ्यामुळे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे अजून दिड एकरवर त्यांनी आंबा लागवड केली. ज्यात केशरसोबतच मलगोबा, आम्रपाली, हूर या जातीचे आंबे लागवड केले. शेततळ्यात रोहू सिल्व्हर, कार्प, कटला या जातीचे मत्स्य पालन केले. ठोंबरे कुटुंबीय शाकाहारी असल्याने त्यांना मत्स्य शेतीचा तसा अनुभव नव्हता. त्यामुळे दोन ते तीन किलोचे मासे होईपर्यंत त्यांनी त्यांची विक्री केली नव्हती. हा अनुभव घेत असतानाच त्यांना ङ्गउद्यानपंडीतफ हा पुरस्कार मिळाला.
गीरचा प्रवास
रासायनिक शेतीत ठोंबरे यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे माऊली शेतकरी मंडळाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनेतून उत्तराखंडमध्ये 15 दिवसांचे त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतले. तेथून परत आल्यानंतर स्वतःच्या शेतीत सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरु केले. त्यासाठी गुजरातला जाऊन 4 गीर जातीच्या गायी आणल्या आणि येथून सुरु झाला गीरचा प्रवास. गांडूळ खत तयार करण्यासह मूत्र व निमार्कचा वापर ते करीतच होते. दीड एकरवर त्यांनी डाळिंबाची बाग उभी करून उत्पादन सुरु केले होते. सोबतच नर्सरी सुरु करुन त्यात आंबा व डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध केले होते. अंबाजोगाई, लातूरसह पुणे मार्केटही त्यांनी काबीज केले. पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयात आठवड्यातील एक दिवस ठरवून कार्यालय सुटण्यापूर्वी टेम्पो आणून एक डझन पॅकिंगमध्ये केवळ एकाच तासात ते संपूर्ण आंबा व डाळिंबाची विक्री करायचे. यातूनच त्यांच्याकडे गीर गायी वाढत जाऊन त्यांची संख्या चारवरुन 20 झाली. पैकी 10 ते 12 गायींचे दूध सुमारे 80 ते 100 लिटर मिळायचे. त्याची विक्री धारूर, अंबाजोगाई, केज येथून सुरु होऊन लातूरपर्यंत पोचली.
दूध विक्रीचा दर
80 रुपये लिटर होता. बर्याचदा दूध शिल्लकही राहत नसायचे. मग त्यातून तूप तयार करणे सुरु झाले. 2010 ते 2012 या काळात गाईच्या तुपाचा दर साधारणपणे 300 रुपयो किलो असताना ठोंबरे यांच्या तुपाचा दर मात्र 800 रुपये किलो होता. तो देखील डव्हान्स बुकिंगमध्ये. या दरम्यान, त्यांनी मुलाला कृषी डिप्लोमाचे शिक्षण देऊन तयार केल्यानंतर तो हाताशी आला. 2015 पासून सेंद्रीय पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात, ही धारणा सर्वत्र झाली. त्यामुळे कोणी रामदेवबाबांचे तर कोणी दीक्षित पॅटर्नचे चाहते झाले. कृषी विभागाने सुद्धा सेंद्रीय शेती पद्धतीला बळ दिले. त्यात बीड जिल्ह्यात सर्वप्रथम भागवत ठोंबरे यांना सेंद्रीय प्रशिक्षण केंद्र मिळाले. त्याबाबतचे त्यांनी प्रशिक्षण घेऊन केंद्र सुरु केले. तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांतजी
दांगट यांच्याहस्ते या केंद्राचे उदघाटन झाले.
तुपाचे उत्पादन केले सुरु
इकडे शेतात गांडूळ निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु होऊन त्याची विक्री सुरु झाली. तर दुभत्या गीर गायींची संख्या वाढून 18 झाली. ज्यातून 120 लिटर दूध त्यांना उपलब्ध होऊ लागले. त्याच्या विक्रीसाठी त्यांनी एकाला कमिशनवर ठेवले. तरीही रोज 20 ते 30 लिटर दूध शिल्लक राहायचे. त्यापासून पारंपरिक पद्धतीने म्हणजे दूध तापवून, विरजण लावून दही करणे, नंतर लोणी काढून ते उष्णतेवर कढवून घेऊन शुद्ध तूप करण्यावर भर दिला. या प्रक्रियेतून तयार होणार्या तुपाचे आयुर्वेदात महत्त्व असल्याने ठोंबरे यांच्या या तुपाला मागणी वाढली. त्याच्या विक्रीचा दर 1 हजार 200 रुपये किलो झाला. त्याच्या खरीदीसाठी ग्राहकांना आठ आठ दिवस आधी बुकिंग करावे लागते. या गायींसाठी पोषक चारा मिळावा, म्हणून त्यांनी विविध जातींच्या ग्रेसची दोन एकरवर लागवड केली आहे. घरच्या ज्वारीचा कडबा पुरत नसल्याने तो विकत घेतात तर तर खाद्य लातूरच्या बाजारातून ते खरेदी करतात. सोबत ठोंबरे यांनी शेड नेट तयार करून त्यात ढोबळी मिरची, टोमॅटो व इतर भाजीपाल्याचे उत्पादन सुरु केले आहे. या सर्व कामांसाठी त्यांना कामगारांची गरज भासत असल्याने दूध काढणे व विक्री करण्यासाठी दोघे तर दोन सालकरी गडी शेती कामांसाठी त्यांच्याकडे आहेत. याशिवाय त्यांचा मुलगा, पत्नी व आई हे देखील त्यांना शेतात मदत करतात. विशेषतः दूध तापवणे, वीरजण घालून दही करणे, लोणी काढून तूप करणे व तुपाचे पॅकिंग करणे ही कामे घरातील सर्व जण करतात. हा सर्व पसारा उभा करण्यासाठी त्यांनी बँकांसह नातेवाईकांकडून असे दोन्ही मिळून सुमारे 50 लाखांचे कर्ज घेतले आहे. डाळिंब, नर्सरीतील विविध रोपे, भाजीपाला, दूध व तुपाच्या विक्रीतून वर्षाला साधारणपणे 25 लाखांची उलाढाल होते. याशिवाय केशर आंबा व गांडूळ खताच्या विक्रीतूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते. यातील बराच खर्च गायींसाठी चारा, इतर खाद्य, स्वच्छता यावर खर्च होतो. शिवाय शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापनासाठी होणारा खर्च वेगळा. यातून कसे तरी खर्चाची हातमिळवणी होत असल्याने भागवत ठोंबरे हे सतत क्रियाशील असतात. मात्र, यावर्षी अतिवृष्ठीमुळे खूपच नुकसान झाल्याचे ते सांगतात.
नुकसानीचा फटका
जूनमध्ये तसा वेळेवर पावसाळा सुरु झाला. 15 ते 20 जून दरम्यान दोन एकर सोयाबीन, दोन एकर मका (आंब्याच्या क्षेत्रात), तूर, मुरघास, मुग, उडीद अशी त्यांनी लागवड केली. जुलैत डाळिंबाची छाटणी करून कलमासाठी, कलम बांधणी झाली होती. नर्सरीमध्ये एक, दोन, तीन वर्षाची कलमे विक्रीसाठी तयार असल्याने त्यांची विक्रीही सुरु होती. यशिवाय सीताफळ जांभूळ, पेरू, नारळ याचीही रोपे तयार होती. दररोज 50 लिटर दूध तर आठवड्यात 10 किलो गाईचे तुप तसेच गांडूळ खत व गोमूत्र विक्री सुरु होती. सोयाबीनला चांगल्या शेंगा लागून तयार होत आले होते. मूग, उडीद काढून त्यांची थप्पी लावली होती. तर तूर फुलांनी भरली होती आणि नेमका 15 सप्टेंबरपासून सातत्याने पाऊस सुरु झाला. पुढचे 15 दिवस सातत्याने आलटून पालटून पाऊस येत राहिला. सर्व पिके पाण्यात होती, शेतातून सतत पाणी वाहत होते. पिके पिवळी पडून सडत चालली होती. हे कमी होते की काय म्हणून 2 व 3 ऑक्टोबरच्या रात्री मोठे वादळ आले व त्यात शेडनेट उडून गेले. उडीद, मुगाची लावलेली थप्पी उडून गेली. डाळिंबाच्या बागेतील सर्व पाने झडून गेली तर फांद्याही
मोडून पडल्या. आंब्याची 5 ते 6 झाडे मुळासकट उन्मळून पडली. अतिवृष्ठी व वादळामुळे किती नुकसान झाले हे संपूर्ण रात्र व दुसर्या दिवशी दिवसभर पाहता आले नाही इतके पाणी शेतातून वाहत होते. नंतर नुकसान पहिले तर गेल्या दोन पिढ्यांमध्ये एवढे नुकसान कधीच झालेले नव्हते, इतके प्रचंड नुकसान झाले. भागवत ठोंबरे व त्यांचे कुटुंबीय हतबल व हताश झाले. अक्षरशः दोन दिवस कोणीच जेवले देखील नाही. मात्र, 12 गायी व सुमारे 38 कालवडींना उपाशी ठेऊन चालणार नव्हते. त्यांना चारा द्यायला कडबाही उडून गेला होता. कसेबसे इकडून तिकडून, काही मागून तर काही बेभावाने विकत आणून गायींना खाद्य देणे सुरु ठेवले. रोजचे दूध काढून विकणे व तूप कढवणे सुरु होते. या काळात 20 किलो तूप हैद्राबादला व 15 किलो तूप पुणे येथे पाठवायचे होते. ही मागणी यापूर्वीच नोंदणी झालेली होती. दररोज होणार्या 50 लिटर दूधाच्या विक्रीतून ठोंबरे कुटुंबीयांना या संकटातून सावरायला मदत झाली. गीर गाईचे तूप असल्याने व त्याचे आयुर्वेदात महत्त्व असल्याने या तुपाला चांगली मागणे असते. सुमारे एक ते दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दूध विक्रीत घट झाली असली तरी तूप विक्री मात्र वाढली आहे. या काळात 5 ते 6 गीर गायींची विक्री करून ठोंबरे यांनी बँकेचे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला. पुणे, हैदराबाद, औरंगाबाद व लातूर येथून तुपाला मागणी वाढत असल्याने शेती करणे सोपे जात आहे. तर गांडूळ खताच्या विक्रीमुळे भागवत ठोंबरे व त्यांचे कुटुंबीय तग धरून आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी केवळ 4 गीर गायींवर सुरु केलेला दुग्ध व्यवसाय 18 गायी व 38 कालवडी (भविष्यातील गायी) अशा 50 जनावरांवर आला आहे. या गायींसाठी 12 बाय 40 फुटांचे तीन गोठे बांधलेले आहेत. गोमुत्र एकत्रित करण्यासाठी 10 बाय 10 फूटाचे तीन हौद, तर शेण एकत्र करून गांडूळ खत तयार करण्यासाठी 4 शेड उभ्या केल्या आहेत. गीर गायींचे दूध 75 ते 80 रुपये लिटर, गोमुत्र 20 रुपये लिटर, गांडूळ खताची गोणी 500 रुपये तर सुरवातीला 600 रुपये किलो दराने विक्री सुरु केलेले तूप एक वर्षांपासून 2 हजार 500रुपये किलो दराने विक्री होत आहे. तुपासाठी किमान दहा दिवस डव्हास बुकिंग करावी लागते. त्यामुळे कोणी ऐनवेळी तुप मागितले तर ते कोणालाच मिळत नाही. यावर्षी नुकसानीचा फटका बसल्याने फक्त दूध, तूप व गांडूळ खत विक्री यावरच संपूर्ण शेतीसह कुटुंब व 4 सालकरी यांचा खर्च ठोंबरे यांना काढावा लागणार आहे. या नुकसानीचे सावट असतानाच 18 ऑक्टोबर पुन्हा पाऊस झाला. परिणामी, अजूनही शेतातील पाण्याचा निचरा झालेला नाही. शासनाने घोषित केलेली नुकसान भरपाईची मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्या इतकीही नाही, असे भागवत ठोंबरे सांगतात. गेल्या दोन वर्षापासून 75 लाखांवर उलाढाल झालेला शेतीची व्यवसाय कोलमोडला असला तरी केवळ गोमातेमुळे यंदा 40 ते 50 लाखांवर हा व्यवसाय आलेला आहे. अजून 5 ते 6 कालवडी यावर्षी दुभत्या होतील, असा विश्वास ठोंबरेंना वाटतो. परिस्थिती लक्षात घेऊन बँकेने कठोर कार्यवाही न करता, थोडी सवलत द्यावी, अशी अपेक्षाही भागवत ठोंबरे यांनी व्यक्त केली. नातेवाईक व इतर खाजगी हातउसने घेतलेले पैसे जमेल तसे देता येतात. मात्र, बँक मागे लागली तर आर्थिक बरोबर मानसिक त्रास देखील होतो. त्याचा परिणाम आपल्या इतर व्यवहारांवर होतो. कोरोना एकदम कमी झाल्यानंतर 1 कोटीपेक्षा जास्त व्यवहाराचे उद्दिष्ट मनात ठेवले होते. मात्र, अतिवृष्ठीमुळे सर्व गणितच कोलमडल्याचे भागवत ठोंबरे यांनी सांगितले.
जोडधंदा गरजेचा
अतिरिक्त पावसामुळे डाळिंबाचे नुकसान झालेच आहे. थंडी वाढल्यानंतर आंब्यांच्या उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. काही झाडांना तर मोहोर लागेल की नाही हे सांगता येणार नाही. लागला तरी त्याची गळ होईल. परिणामी, फळे कमी लागतील.अशातच रब्बीचेही काही खरे नाही. त्यात ठोंबरे यांना गुरांसाठी कडबा मिळावा म्हणून ज्वारी, मका व इतर चारा पिके घेणार आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्यांमध्ये शेतीत सेंद्रीय खते वापरण्याची मानसिकता तयार झाल्याने त्यांच्याकडील गांडूळ खताला चांगली मागणी राहील. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे 10 टन गांडूळ खत तयार असून त्यात दरमहा भर पडत आहे. म्हणूनच ते गीर गायींना गोमाता मानतात व त्यांची मनोभावे सेवा करतात. आपल्या गायी, वासरांची त्यांनी नावे न ठेवता 1, 2, 3, 4, 5 असे नंबर दिले आहेत. धारा काढताना नंबर पुकारला जातो. तेव्हा त्याच नंबरची गाय व वासरू येते, हे प्रसंग खरोखरच पाहण्यासारखा असतो. अशावेळी गर्दी होत असली तरी गोंधळ मात्र अजिबात होत नाही. दोन्ही वेळेला दूध काढले की लगेच भैरवनाथ सेंद्रीय उत्पादक या ब्रँड नावाच्या पिशवीत अर्धा व एक लिटर मध्ये पॅकिंग केले जाते. दूध वीस- वीस लिटरच्या कॅनमध्ये टाकून चुल्हाणावर तापवण्यासाठी पाठवले जाते. एकूणच ठोंबरे यांच्या या कृतीयुक्त कामातून ज्यांनी शेतीला जोडधंद्याची जोड दिली आहे, तेच शेतकरी टिकून राहतील असे दिसते. इतर निसर्गाला दोष देत शासकीय मदतीची वाट पाहत असतात. ती मिळाल्यानंतर रब्बीचा पेरा करू अशा विचारात काही आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, भागवत ठोंबरे यांनी शेतीसोबतच काही ना काही तरी पूरक असा जोड धंदा करावा असा मोलाचा सल्ला शेतकर्यांना दिला आहे.
शेती करताना संपूर्ण अभ्यास करून व पूरक धंद्याची जोड देऊन शेती केली पाहिजे. तरच शेतकरी जगेल. अन्यथा दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांवर पडणारी रोगराईचा त्याला सामना करावा लागेल.
– भागवत ठोंबरे, उंदरी (ता. केज, जि. बीड)