प्रतिनिधी/पुणे
राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता, तर अनेक ठिकाणी पावसाभावी दुबार पेरणीच्या संकटाना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 2-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या अंदाजाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून हा पाऊस खरिपाच्या पिकांना जीवदान ठरणार आहे.
कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाअभावी दुबार पेरणी असे परस्परविरोधी चित्र मागच्या महिन्यात होते. परंतु मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. परंतु आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. तसेच, कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता.
खान्देश आणि पश्चिम विदर्भ पावसाच्याच प्रतीक्षेत
सुरुवातीपासूनच खान्देश आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आधीच कमी पाऊस झाल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, त्यातच पावसाने खंड दिल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडला होता. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 2-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.