माळकिन्ही ता. महागव, जि.यवतमाळ येथील माधवराव कानडे यांनी गाजर पीकांत गेल्या वीस वर्षांपासून सातत्य राखले आहे. या पीकात तितकीशी स्पर्धा नाही. परिणामी चांगले दर मिळतात असा त्यांचा अनुभव, त्यामुळेच मी हे पीक घेतो, असे माधवराव सांगतात. गाजर पिकातील सातत्यामुळे त्यांच्या घरी आर्थिक समृद्धी लाभली आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची ही प्रयोगशीलता अनुकरणीय अशीच आहे.
माळकिन्ही गावची लोकसंख्या जेमतेम तीन हजारावर आहे. गावातील सर्वांच्या उपजिवीकेचे साधन शेती हेच आहे. या गावात पारंपारीक पिकांऐवजी गावशिवारात आठही दिवस भरणारे बाजार त्यासोबतच आर्णीची दैनंदीन मंडी असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे या भागात बहूतांश शेतकरी भाजीपाला पीके घेतात. यातून रोज पैशाची आवक होत असल्याने शेतकऱ्यांना दैनंदीन गरजांसाठी इतरांकडे धाव घ्यावी लागत नाही. माधवराव कानडे हे गेल्या वीस वर्षांपासून गाजर हे कंदवर्गीय पिक घेतात. दोन ते तीन एकरावर याची लागवड राहते. वीस वर्षांआधी माळकिन्ही शिवारातील अनेक शेतकरी हे पीक घेत होते. काही गुंठ्यांवर प्रायोगीक तत्वावर याची लागवड व्हायची. त्याच्या अनुकरणातूनच माधवराव या पीकाकडे वळले. टप्याटप्याने त्यांनी गाजराखालील क्षेत्र तीन एकरापर्यंत नेले. यावर्षी दोन एकरावर त्यांची गाजर लागवड आहे. गावातील इतर शेतकरी देखील गाजराची लागवड करतात. परंतू त्यांचे क्षेत्र एकराऐवजी काही गुंठेच असते.
असे आहे व्यवस्थापन
जिऱ्याप्रमाणे गाजराचे बियाणे असते. एकरी आठ किलोप्रमाणे बियाणे लागते. गेल्यावर्षी 600 रुपये किलो असलेले हे बियाणे यावर्षी 800 रुपये किलोने खरेदी करावे लागले. नैसर्गिक आपत्तीमुळे गाजराच्या बिजोत्पादनाला फटका बसला. त्यामुळे दरात तेजी आल्याचे कृषी व्यवसायीकांचे म्हणणे आहे. आंतरमशागत केल्यानंतर बियाणे फेकून दिले जाते. त्यानंतर डवऱ्याला दोरी बांधत सरी पाडून घेतली जाते. या माध्यमातून तयार वरंब्यावर बी बरोबर पेरल्या जाते. लागवडीपूर्वी दाणेदार खताचा एकरी तीन पोत्यांचा डोज दिला जातो. यामुळे जमीन भुसभुसीत होण्यास मदत मिळते. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फवारणी व खताची गरज या पीकाला भासत नसल्याचे माधवराव सांगतात. 15 नोव्हेंबरनंतर लागवड केल्यास उष्णतामानात वाढ होत असल्याने या पीकाच्या खालील बाजूस गाजरकंद धारणा होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. वरच्या बाजूस केवळ गोंडे येतात. परिणामी 15 नोव्हेंबरनंतर याची लागवड करुच नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.
काढणीवर होतो सर्वाधीक खर्च
या पीकात काढणीकामी मजूरीवर सर्वाधीक खर्च होतो. दहा हजार रुपयांचा एकरी त्यावर खर्च होतो. बैल नागराच्या मदतीने गाजर जमिनीबाहेर काढले जातात. त्यामागील मजूराव्दारे त्याची वेचणी करुन त्याचा ढिग लावला जातो. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर मजूरांमार्फत सायंकाळी वरचा हिरवा भाग कापून गाजर धुतल्या जातात. नंतर पोत्यात भरुन मार्केटला पाठविले जातात. दर दिवशी 10 ते 15 पोते गाजराची काढणी होते. बाजाराचा अंदाज घेत किती माल पाठवायचा याचे नियोजन केले जाते. क्विंटलला सरासरी 1000 ते 1200 रुपयांचा दर मिळतो. गेल्यावर्षी 1500 रुपये क्विंटलचा दर मिळाला. जानेवारीतील संक्रातीच्या सणाला मागणी वाढून दरात तेजी येते. उर्वरित काळात देखील एक हजार रुपये क्विंटलपेक्षा कमीचा दर मिळत नाही. त्यामुळे हे पीक फायदेशीर ठरते. बाजारात किरकोळ विक्रीऐवजी व्यापाऱ्यांना माल देण्यावर भर राहतो.
गाजरासोबतच इतर पिकांवरही भर
हळद दोन एकर, केळी दिड एकर, कापूस तीन एकर, सोयाबीन दोन एकर याप्रमाणे त्यांनी शेतीमध्ये पीकपध्दती जपली आहे. 2019-20 मध्ये एक एकरावर सिताफळाची लागवड करण्यात आली आहे. वाळलेल्या हळदीची एकरी वीस क्विंटलची उत्पादकता होते. त्याची विक्री हिंगोली बाजारपेठेत केल्या जाते. गेल्या पाच वर्षांपासून हे पीक घेतले जाते. याचा एकरी खर्च 25 हजार रुपये होतो. एका वर्षी साडेसात हजार रुपये क्विंटलचा दर असलेल्या हळदीची यावर्षी 5100 रुपये क्विंटलनेच विक्री करावी लागली. असे दरातील मोठे चढउतार या पीकात होतात. दोन वर्षांपासून केळी लागवड केली. कोरोनाआधी 16 टन केळी 1200 रुपये क्विंटलने विकली. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने 400 रुपये क्विंटलचाच दर मिळाला. केळीच्या व्यवस्थापनावर रोपांसह एकरी एक लाखाचा खर्च होतो. कापसाची एकरी उत्पादकता गेल्यावर्षी 15 क्विंटल होती. गतवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीकच उध्वस्त झाले. एकरी एक क्विंटलची उत्पादकता देखील नाही, अशी स्थिती आहे. कापसाचा एकरी खर्च वीस हजार रुपये होतो. सोयाबीनवर एकरी खर्च 15 हजार रुपये तर उत्पादकता 11 क्विंटलची होती.
मुलगा करतोय पीएचडी
माधवराव कानडे यांना नंदकिशोर, निलेश, अविनाश अशी तीन मुले. यातील दोघांवर शेतीची जबाबदारी आहे. पत्नी धुप्रदाबाई या देखील शेतीतच राबतात. मुलगा नंदकिशोर याने कृषी शिक्षण पूर्ण केले. एम.एस.सी. (कृषी) दापोली विद्यापीठातून झाल्यानंतर बंगलोर येथील एका संस्थेतून पी.एच.डी. करीत आहे. त्याकरिता त्याला भारतीय कृषी संशोधन परिषदेची शिष्यवृत्ती मिळते.
शेतामध्येच निवारा
सुरुवातीची काही वर्ष माधवराव व त्यांचे कुटूंबिय गावात राहत होते. त्यानंतर शेतीकडे 24 तास लक्ष्य असावे या उद्देशाने त्यांनी सात वर्षांपूर्वी शेतातच घर बांधले आहे. आता संपूर्ण परिवार शेतात असल्याने शेतीकडे विशेष लक्ष दिले जाते असे ते आवर्जून सांगतात.
गाजराचा ताळेबंद (एकरी)
बियाणे – 800 रुपये किलो.
दाणेदार खत तीन पोते ः एक हजार रुपये (350 रुपये प्रती बॅग)
मजूरी लागवड ते काढणी ः 10 हजार रुपये
उत्पादन ः 150 क्विंटल
गाजर लागवड कालावधी ः सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत योग्य.
परिपक्वता कालावधी ः साडेतीन महिने
माधवराव कानडे
मो. 8262016375