जिल्ह्याच्या ठिकाणापासून गाव जवळ असेल तर बहुतांश तरुणाचा कल हा खाजगी नोकरी करण्याकडे असतो. जळगाव जिह्यातील जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या दापोरी येथील पवन पुंडलिक पाटील यांनी नोक रीचा विचार न करता गावातच राहून स्वतःचा दुधाचा ब्रॅण्ड विकसित करून तरुण शेतकऱ्यासमोर एक आदर्श उभा केला आहे. सकाळी ३.३० वाजता कामाची सुरुवात करणाऱ्या पवन यांनी स्वकष्टाने हा पद्मालय ब्रॅण्ड विकसित केला आहे. त्यांनी या व्यवसायातून दिवसाला ३०००/- रु निव्वळ नफा मिळवत पंचक्रोशीत स्वतःच्या पद्मालय ब्रॅण्डचा नावलौकिक मिळविला आहे.
जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या दापोरी ता. एरंडोल सारख्या जेमतेम १००० लोकसंख्येच्या गावात ४० वर्षीय पवन पुंडलिक पाटील यांचा पद्मालय डेअरी फार्म आहे. त्यांच्याकडे संयुक्त कुटुंबाची स्वअर्जीत १०० एकरावर शेती आहे. घरात एकत्र २५ जणांचे कुटुंब असून त्यांचे वडील व काका सर्व शेती सांभाळतात, तर ७० जनावरांचा गोठा हा पूर्णपणे पवन सांभाळतात. त्यांनी ७० मोठे जनावर व ३५ लहान कालवड यांच्या देखरेखीसाठी ३ सहकारी सोबत घेतले असून त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मुक्त संचार गोठ्याचे कामकाज सुरु आहे. नित्यनेमाने सकाळी ३.३० वाजता उठून त्यांचे काम सुरु होते. सर्व स्वच्छता झाल्यानंतर ४.०० वाजता मशीनद्वारे दुध काढले जाते. नंतर ६ वाजेपर्यंत दुध मशीनद्वारे पिशवीबंद करून जळगाव येथे विक्रीसाठी पाठविले जाते. त्याठिकाणी त्यांनी वेगळी विक्री व्यवस्था तयार केली आहे. त्यांनी स्थानिक तरुणांना कमिशनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला असून त्यांच्या मार्फत विक्रीची व्यवस्था केली आहे.
जातिवंत पशुधनाची निर्मिती
पशुखाद्य, वैरण व जनावरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने आधीच पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात दुधाचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी मिळत असल्याने दुध व्यवसाय आणखीनच संकटात सापडला आहे. अशा परिस्थिती सहकारी दुध संघ किंवा खाजगी डेअरीवर दुध घालण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून पवन पाटील यांनी सुवर्णमध्य साधला आहे. ४ गायींपासून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या पवन पाटील यांनी सुरुवातीचे काही पशुधन वगळता नंतर आपल्याच गोठ्यात जातिवंत पशुधनाची निर्मिती करून या व्यवसायात लागणाऱ्या सर्वात मोठ्या खर्चाला आळा घातला आहे. आज त्यांच्याकडे १ उच्च प्रतीचा वळू व १ उच्च प्रतीचा रेडा आहे. शेतालगतच त्यांचा फार्म व घर असल्याने दिवसभराचे कामकाज करणे सोयीचे होते. त्यांच्या मध्ये श्वान, कडकनाथ कोंबडी, कबुतर आणि एका जातिवंत घोड्याचाही समावेश असून ते फार्मची शोभा अजूनच वाढवितात.
निर्भेळ दुधाचे उत्पादननासाठी यांत्रिकीकरण
पद्मालय डेअरी वर उत्पादन होणारे दुध प्रामुख्याने जळगाव शहरात वितरीत होते. विविध उपनगरात विखुरलेल्या ग्राहकांपर्यंत पोचविले जाणारे दुध ताजे, सकस व निर्भेळ असावे यासाठी पवन पाटील नेहमी जागरूक असतात. त्यासाठी त्यांनी गावातच होमोजीनेशन व पाश्चरायजेशन प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवून घेतली आहे. गायी व म्हशीच्या धारा काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. परिणामी दुधाची हाताळणी कमी होऊन दुधाची शुद्धता व गुणवत्ता राखली जाते. त्यामुळे ग्राहकांपर्यंत दुध उशिरा पोहचले तरी दुध नासत नाही. या सर्व यांत्रिकीकरण करण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने १० लाख रु खर्च केला आहे. दुध व्यवसायातील बारकावे जाणून घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी कृषी विभागाच्या माध्यमातून जर्मनी, नेदरलँड्स, आॅस्ट्रेलिया व स्कॉटलंड या देशाचा अभ्यासदौरा केला आहे. डेअरी फार्मला जोडून असलेली गोबरगॅस ही संकल्पना त्यांनी गोबरगॅस येथे पाहूनच आपल्या फार्मला तयार केली आहे. त्यामुळे फार्मला लागुनच असलेल्या शेतीला देखील उर्वरित स्लरीचा उपयोग होतो. २०१२ पासून पद्मालय हा ब्रांड सुरु केला असून आजवर ६०% खर्च व ४०% नफा हे दुध व्यवसायाचे गुणोत्तर कायम राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
प्रक्रियेवर विशेष भर
पवन यांनी ४ गायींपासून व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या गोठ्यात जातिवंत गायी व जाफराबादी म्हशींची संख्या ७० पेक्षा जास्त आहे. दोन्ही वेळेचे मिळून २०० ते २२५ लिटर्स दुध संकलन होते. जवळपास १३५ ग्राहकांची गरज भागवून शिल्लक राहिलेल्या दुधापासून दही, ताक व तूप बनविण्यावर त्यांचा भर आहे., जळगाव शहरात त्यांच्या तुपाची ६८० रु दराने विक्री केली जाते. दही, ताक व लस्सी यांची उन्हाळ्यात विशेष मागणी असते. परिसरातील मोठ्या गावांमध्ये बहुतांश किरकोळ विक्रेते पद्मालय ब्राॅ डची उत्पादने विक्रीसाठी ठेवतात. आकर्षक अशा पॅकिंगवर उत्पादन दिनांक, फूड सेप्टी व इतर बाबींची नोंद केलेली असते. त्यामुळे ग्राहक गुणवत्तेच्या बाबतीत निश्चित होतात.
चारा व्यवस्थापन
दुध व्यवसायासाठी सर्वात महत्वाचा घटक पशुधन व चारा या दोन्हीसाठी पवन पाटील यांचे उत्कृष्ट असे नियोजन आहे त्यांनी गुणवत्तापूर्ण पशुधन आपल्याच गोठ्यात तयार केल्याने पशुधनावरील त्यांचा खर्च वाचला आहे. तर संपूर्ण पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या नियोजन त्यांच्या फार्म लगतच असणाऱ्या त्यांच्या शेतात चारा लागवड केला असून त्यामुळे त्यांना बारमाही हिरवी वैरण उपलब्ध असते. त्याचबरोबर शेतातील इतर भागात, कापूस, मक्का यासारखी नगदी पिके असल्याने मक्काचाही चारा उपलब्ध होतो. फार्ममधील सर्व सांडपाणी व गोबर गॅसची स्लरी देखील याच शेतात सोडल्याने जमिनीचा पोत देखील सुधारला आहे.
नोकरीप्रमाणे शेतीला पूर्ण वेळ देणे गरजेचे.
आजचे युवा शेतकरी हे सतत शेती परवड नाही अशी ओरड करतात. काही अंशी ती खरी असली तरीही स्वतः शेतात राबले आणि शेतीला प्रत्येकाने एक जोडधंदा केला तर शेती नक्कीच परवडणारा व्यवसाय आहे यान शंका नाही. फक्त नोकरी प्रमाणे वेळच्या वेळी शेतीला पूर्ण वेळ देणे गरजेचे आहे. .
संपर्क
पवन पाटील
दापोरी ता.एरंडोल जि.जळगाव
८३२९४८६३९८