गांडूळ खत हा स्वस्त आणि नेहमी शेतीसाठी फायदेशीर असणारा खताचा पर्याय आहे. खालीलप्रमाणे गांडूळ खत निर्मिर्ती केल्यास नक्कीच गांडूळ खत हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने समृद्ध करणारा पर्याय आहे.
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्याच्या जवळपास मोठे वृक्ष/झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे. छप्पर बांधणीची पद्धत ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता 8 फूट उंच, 10 फूट रुंद व 30 ते 40 फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमीजास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कुड घालावा.
गांडूळ पालनाची पद्धत
छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्याच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळींवर प्रथम उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडुळांना जाड कचऱ्यात आश्रय मिळेल. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा: तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून कामी येईल. बीजरूप म्हणून या थरावर साधारणत: 3 x 40 फुटांसाठी 10 हजार गांडुळे समान पसरावीत. त्यावर गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. त्यानंतर शेण व लहान तुकडे केलेल्या काडीकचऱ्याचा 1 फूट जाडीचा थर त्यावर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचऱ्याचा थर द्यावा. ओल्या पोत्याने/गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.
बेड-थरांची माहिती
(1) जमीन
(2) सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थ 2″-3″ जाडीचा थर (नारळाच्या
शेंड्या, पाचट, धसकट, इत्यादी.)
(3) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2″-3″ जाडीचा थर.
(4) गांडुळे
(5) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2″ 3″जाडीचा थर
(6) शेण, पालापाचोळा, वगैरे 12″ जाडीचा थर
(7) गोणपाट
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत
गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाशी जातील व गांडुळे व गांडूळ खत वेगळे करता येतील. शक्यतो गांडूळखत वेगळे करताना कुदळी,टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. जेणेकरून गांडुळांना इजा पोहोचणार नाही.
गांडुळांच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी
(क) एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त 2,000 गांडुळे असावीत.
(ख) बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रूपासून गांडुळांचे संरक्षण करावे.
(ग) संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार
नाही याची काळजी घ्यावी.
(घ) गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा 40 ते 45 टक्के ठेवावा.
(च) गांडुळे हाताळताना किंवा गांडूळखत वेगळे करताना त्यांना इजा होणार
नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडुळे वेगळी करावीत,
जेणेकरून इतर गांडुळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.