भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी व मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कांद्यामध्ये “ब” आणि “क” जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह व इतर खनिजे असतात तसेच औषधी गुणधर्म आहेत. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिनीमधील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.
महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील ३७ टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते.
बाजारात कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्याची बरीच कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कांदा हाताळणी. कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेला कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरणे व त्यातून बाहेर काढणे हे जिकिरीचे काम असतं. नाशिक येथील व आजूबाजूच्या भागातील उत्पादक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून हे लक्षात आले की, ट्रक्टर ट्रोलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये कांदा भरण्यासाठी व त्यातून काढण्यासाठी सद्यस्थितीत एका दिवसामध्ये २० टन कांदा भरण्यासाठी व काढण्यासाठी ३० कुशल मजुरांची गरज लागते. शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे हाताळणी करतील याची खात्री नसते. मुळात भर हंगामात वेळेवर कुशल मजूर मिळणेच दुरापास्त झाले आहे. प्रत्येक कांद्याची हाताळणी जास्त वेळा झाल्यामुळे टरफले निघतात, कांदे सुकून वजन कमी होतो. तसेच आयुष्यमान कमी होते व कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो. त्याचप्रकारे कांदा निवडून त्यातील खराब असलेला कांदा बाहेर काढणेसुद्धा महत्वाचे काम असून त्यासाठी सॉरटिंग टेबल आवश्यक आहे.
या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कापणी पश्च्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने पंदेकृवि कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने एकाच दिवसात २० टन कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरता येतो व त्यातून बाहेर काढता येतो. कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरताना व त्यातून बाहेर काढताना खराब झालेला, कोंब आलेला, जोड कांदा, वेडा-वाकडा कांदा सॉरटिंग टेबलच्या दोन्ही बाजूला असलेल्या मजुरांच्या सहाय्याने वेगळा केला जातो. हे यंत्र २ अश्वशक्ती ३ फेज विद्युत मोटार वर चालते. सदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी योग्य कुशनींग देऊन विशेष काळजी घेतली आहे. या कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्राच्या सहाय्याने फक्त ४ मनुष्यच २० टन कांद्याची भरती कांदाचाळीमधून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमधून कांदा चाळीमध्ये एका दिवसात करू शकतात.
सदर कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्राला सोयीस्कर म्हणून कांदा चाळीमध्ये विशेष सुधारणा केल्या आहेत. या सुधारित कांदा चाळीमध्ये दोन चाळ (४.७०९ मी. (लांबी) × १.५२४ मी. (रुंदी) × ४.२१७ मी. (उंची)) असून मधोमध ४.७०९ मी. (लांबी) × ३.१४३ मी. (रुंदी) असलेली जागा दिली आहे. या जागेत लोडिंग अनलोडिंग यंत्र व छोटा उद्वाहक येईल अश्याप्रकारे व्यवस्था केली आहे. ही कांदा चाळ एम.एस. (सी-चैनल) पासून बनलेली आहे. सावलीसाठी चाळीवर लोखंडी पत्र्याचे शाकारलेले छत आहे. या कांदा चाळीच्या तळाला खालच्या बाजूने ३०० उतार (बाहेरून आतमध्ये) दिलेला आहे. तसेच उताराच्या खालचे टोक जमीनीपासून ०.८०७ मी. उंचीवर आहे आणि वरचे टोक जमीनीपासून १.४६२ मी. उंचीवर आहे. कांदा चाळीला उतार असल्याने कांदा चाळीतून काढायला सोपे जाते. कांदाचाळीच्या प्रत्येक भागाला (तळ तसेच चारही बाजु) चौकोनी सछिद्र असलेली लोखंडी जाळी (वेल्डेड मेश) लावलेली आहे. तसेच कांदाचाळीच्या तळाला सछिद्र लोखंडी जाळीवर चौकोनी असलेले सछिद्र रबराचे आवरण दिलेले आहे. त्यामुळे कांदा चाळीत भरताना वरून पडत असलेला कांद्याला इजा होत नाही व सर्व बाजूने हवा खेळती असल्यास कांदा जास्त काळ टिकून राहतो. या सर्व व्यवस्थेमुळे कांदा पाच ते सहा महिने पर्यंत चांगला राहतो.
वैशिष्ट्ये :
- या यंत्राची क्षमता २० टन प्रति दिवस आहे.
- कांदा ट्रक्टर ट्रोलीमधून कांदा चाळीमध्ये तसेच कांदाचाळीमधून ट्रक्टर ट्रोलीमध्ये भरण्यास उपयुक्त.
- २० टन कांद्याला भरतांना व काढतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. त्याऐवजी या मशीनने फक्त ४ अकुशल मजूर लागतात.
- कांदा भरतांना व काढतांना निघालेला खराब, कोंब आलेला, जोड कांदा, वाकड – वेडा कांदा वेगळे करण्यासाठी सॉरटिंग टेबलची व्यवस्था आहे.
- सदर यंत्र हे चालविण्यास, देखभाल, दुरुस्ती व निगा राखण्यास सोपे आहे.
- चाकांच्या साह्याने ने–आण करण्यास सोपे.
पिडीकेव्ही कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्र छोटा उद्वाहक सोबत
डॉ. प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता,
श्री. सुशील सक्कलकर, सहायक संशोधन अभियंता,
श्री. राजन बिसेन, वरिष्ठ संशोधन सहायक
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
अकोला- ४४४ १०४ (महाराष्ट्र)