भुईमूग हे महत्त्वाचे गळीतधान्य पीक असून एकूण तेलबियांच्या क्षेत्रापैकी 45 टक्के क्षेत्रावर या पीकाची लागवड केली जाते. एकूण तेलबिया उत्पादनात 55 टक्के वाटा या पीकाचा येतो. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत या पीकाची लागवड मुख्यत्वे केली जाते. उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. यामुळे उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ मिळते.
भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
- भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असावी. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
- काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते.
- उपट्या प्रकारच्या जातीसाठी 100 किलो, मोठ्या दाण्याच्या जातींसाठी 125 किलो आणि निमपसऱ्या व पसऱ्या जातींसाठी 80 ते 85 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते.
- प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
- बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
सपाट वाफा पद्धत
- भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर करावयाची झाल्यास 30 सें.मी. अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वापश्यावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. तर दोन रोपातील अंतर 10 सें.मी. ठेवावे व पाणी द्यावे. नंतर 7 ते 8 दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
- टोकण पद्धतीने अंतरावर केल्यास बियाण्याची 25 टक्के बचत होते. बी वाचते.
- पेरणीच्या वेळासुद्धा बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रति हेक्टरी 3.33 लाख रोप मिळतात. पेरणी पाच सें.मी. खोलवर करावी.
रुंद वाफा पद्धतीने लागवड
- गादी वाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात वाढ होते.
- जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलिता ठेवता येते. पिकाची कार्यक्षमता वाढते.
- पिकास पाण्याचा ताण बसत नाही. जास्त पाणी झाल्यास सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
- तुषार सिंचन पद्धतीने पाणी देता येते.
- या पद्धतीत पाटाने पाणी देता येते यासाठी वेगळी रान बांधणी करावी लागत नाही.
- संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत. योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
गादीवाफे तयार करण्याची पद्धत
- पूर्व मशागत केलेल्या जमिनीत ट्रॉपिकल्चर या यंत्राने गादी वाफे (रुंद सरीवाफे) तयार करावेत. अशा वाफ्याची जमिनी लगत रुंदी 150 सें.मी. तर वरची रुंदी 120 सें.मी. ठेवावी. वाफ्याची जमिनीपासून उंची 10 ते 15 सें.मी. ठेवावी. किंवा 1.50 मीटर अंतरावर 30 सें.मी.च्या नांगराने सऱ्या पाडाव्यात. या पद्धतीत 1.20 मीटर रुंदीचे आणि 15 सें.मी. उंचीचे वाफे तयार होतील अशा प्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवावी.
- हलक्या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोचत नाही. अशा वेळेस 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून गादी वाफे तयार करावेत.
- अशा वाफ्यावर 30x 10 सें.मी.अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे.
भुईमुगासाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्र
- जमिनीचे तापमान 2 ते 5 सें.मी. वाढते त्यामुळे उगवण व सुरवातीची वाढ जोमाने होते.
- पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
- तण नियंत्रण होण्यास कमी होतो.
- रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
- थंडीच्या कालावधीतही लवकर पेरणी करणे शक्य होते.
खत नियोजन
- प्रति हेक्टरी पूर्व मशागत करताना शेवटच्या कुळवणी अगोदर जमिनीत 7.5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगले मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खतांमधून जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते.
- शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीक वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
रासायनिक खते
- पेरणीवेळी 25 किलो नत्र (युरिया खतातून), 50 किलो स्फुरद (एसएसपी खतातून) प्रति हेक्टरी द्यावे.
- भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये लागतात. त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये द्यावी लागतात म्हणून स्फुरद देताना तो एसएसपी या खतातून घ्यावा.
- सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी पेरणीवेळी हेक्टरी 200 किलो जिप्सम जमिनीतून घ्यावे. त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त 20 किलो व बोरॉन 5 किलो प्रति हेक्टरी द्यावे. राहिलेले 200 किलो जिप्सम आऱ्या सुटताना घ्यावे. जेणे करून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते.
सुधारित जाती
जातीचे नाव —- पक्वतेचा कालावधी (दिवस) —- प्रकार —- सरासरी उत्पादन (क्विं/हे. —- दाण्याचे शेंगाशी प्रमाण (टक्के) —-शिफारसीत जिल्हे
एस.बी- 11 —- 115-120 —- उपटी —- 15-20 —- 75-76 —- संपूर्ण महाराष्ट्र
टीपीजी-24 —- 110-115 —- उपटी —- 30-35 —- 72-74 —- संपूर्ण महाराष्ट्र
फुले उनप (जे.एल.-286) —- 115-120 —- उपटी —- 20-24 —- 68-70 —- पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे.
टीपीजी-41 —- 125-130 —- उपटी —- 25-28 —- 66-68 —- पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे.
जे.एल.501 —- 1190115 —- उपटी —- 30-32 —- 68-70 —- संपूर्ण महाराष्ट्रासाठी
आरएचआरजी 6083 (फुले उन्नती) —- 120-125 —- उपटी —- 30-25 —- 68-70 —- संपूर्ण महाराष्ट्रासाठी
आरएचआरजी 6021 —- 120-125 —- निमपसऱ्या —- 30-35 —- 68-70 —- पश्चिम महाराष्ट्रासाठी
माहित स्रोत:- तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव
संपर्क – 0257 – 2250888.