प्रतिनिधी/पुणे
राज्यात उशिराने थंडीचे आगमन झाले, त्यामुळे रब्बीच्या पिकांना नैसर्गिकरीत्या पोषक वातावरण निर्मिती होत असतांना आता अवकाळी पावसाने त्यात खोडा घालण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसंपासुन मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदललेले असून सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (दि. ६ व ७ जानेवारी २०२१) या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा याठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जरी पावसाची शक्यता नसली, तरी वातावरणातील बदलामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रब्बीची पिके जोमात असतांना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच भर घातली आहे.
यामुळे अवकाळी पाऊस
अरबी समुद्राच्या वायव्य भाग ते उत्तर पंजाब यादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रिय स्थिती असल्याने उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हाच वातावरणातील बदल राज्यातील पावसाला पोषक ठरत आहे.