‘रेडा सोडू नये पाण्यात, असं म्हणतात, ते काही खोटं नाही.’ बाजी वैतागानं म्हणाले.
‘काय झालं?’ गुणाजीनं विचारलं.
‘अरे! त्या तात्याबा, यशवंतला राजांच्याकडं पाठवून आठ दिवस झालं. निरोप नाही; ना त्यांचा पत्ता!’
‘राजांनी ठेवून घेतलं असंल.’ गुणाजी म्हणाला.
‘मग ऱ्हावा की! कोण नको म्हणतंय्. पण निरोप तरी पाठवायचा. आम्ही इथं कावळ्यासारखं तटावरनं वाट बघतोय्.’
सदरेवर बाजी, विठोजी, गुणाजी बोलत होते. दोनप्रहरची वेळ झाली होती. बारगीर सदरेवर येताच साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडं वळल्या. बारगीर म्हणाला,
‘गडाखाली यशवंतराव शिलेदार आनि तात्याबा आल्याती. त्यांनी गडाखाली बलवलंय्.’
‘आम्हाला?’ बाजींनी विचारलं.
‘व्हय, जी!’ बारगीर म्हणाला.
‘पाय मोडल्यात काय तात्याबाचं!’ गुणाजी उद्गारला.
‘राजांच्याकडून आलेत ना? खाली जायला हवं! बघू का, झालंय्, ते.’ म्हणत बाजी उठले. त्यांनी फुलाजींना निरोप पाठवला.
काही वेळातच बाजी, फुलाजी, विठोजी गड उतरू लागले.
तिघं गडाची नागमोडी वाट उतरून खाली आले, तेव्हा तात्याबा, यशवंतराव बाजींची वाट पाहत उभे होते.
तात्याबांच्या समोर जाताच किंचित रोषानं बाजींनी विचारलं,
‘काय आज्ञा आहे?’
‘आज्ञा कसली!’ तात्याबा हसत म्हणाले, ‘बाजी तुमच्या कामगिरीचं राजांनी खूप कौतुक केलं. उसंत मिळाली, की ते गडावर येनार हाईत. पन त्या आधी त्यांनी तुमच्या गडापायी चार टिकल्या पाठवल्यात. त्यांची मानमरातब व्हायला पायजे.’
‘कसल्या टिकल्या?’ बाजींनी विचारलं.
‘माग वळून बघा!’ तात्याबानं सांगितलं.
बाजींनी मागं वळून पाहिलं आणि त्यांची नजर खिळून राहिली.
झाडीतल्या रस्त्यानं बैलगाडे येत होते. एकेका गाड्याला सहा-सात बैलजोड्या लावल्या होत्या. प्रत्येक गाड्यावर तोफ चढवली होती. अशा चार तोफा जासलोड गडासाठी राजांनी पाठविल्या होत्या.
तात्याबा म्हणाला,
‘तोफा आल्या. त्याची गडभरणी कराय नको? म्हणून तुमास गडाखाली बलवलं.’
बाजींनी तोफांचं स्वागत केलं. पण त्यांच्या मनात त्या तोफा गडावर कशा चढवायच्या, याची चिंता उमटली होती. गडाची वाट चिंचोळी, नागमोडी होती.
दुसरे दिवशी सूर्योदयाआधी गडाच्या खाली गर्दी जमली. कौतुकानं सारे त्या तोफांच्याकडं पाहत होते. गोल जंगली लाकडाचे ओंडके जमवले होते. दंडाएवढ्या जाड दोरखंडाची वेटोळी तळावर पडली होती.
गाड्यांवरून तोफा उतरल्या गेल्या. त्यांना दोरखंडांनी जखडलं गेलं. वाटेवर लाकडांचे ओंडके पसरले. त्या ओंडक्यांच्या दिशेनं तोफांची तोंडं केली. शेकडो माणसं दोरखंडाला बिलगली. जत्रेतला रथ ओढावा, तशी माणसं तोफा ओढत होती. लाकडांच्या ओंडक्यांवरून तोफा गड चढू लागल्या. दर पावलाला ‘हर हर महादेवs’च्या गजरात त्या अवजड तोफा तसूतसूनं अंतर कापत होत्या.
दोन दिवस गडावर तोफा चढवल्या जात होत्या. चारी तोफा गडावर चढल्या. बाजींनी मोक्याच्या जागा हेरून तटावरच्या बुरूजांवर तोफा चढवल्या. त्या चार बुरूजांवरच्या तोफांनी गड पुरा सजला होता. चारी बुरूजांखाली बाजींनी पाण्याच्या टाक्या तयार करून घेतल्या.
गड पुरा सजल्याच्या समाधानात सदरेवर बाजी, तात्याबा, गुणाजी, विठोजी बसले होते. बाजी म्हणाले,
‘आता राजे आले, की झालं.’
गुणाजी उद्गारला,
‘अराराss लई घोटाळा झाला.’
‘काय झालं?’ बाजी उद्गारले.
‘सारं मुसळ केरात!’ गुणाजीनं सांगितलं.
‘अरं, पन काय झालं, ते सांगशील तरी का?’ तात्याबा वैतागून म्हणाला.
‘काय सांगू!’ गुणाजी म्हणाला, ‘गडावर तोफा आल्या, नव्हं?’
‘व्हय!’ विठोजीनं उत्तर दिलं.
‘त्यांस्नी बुरूजावर चढवलं. पाण्याच्या टाक्या झाल्या. खरं नव्हं?’
‘व्हय की!’ तात्याबा म्हणाला.
‘अरं! पन राजांनी तोफा धाडल्या. त्या गडावर चढल्या. त्या बुरूजावर ठेवल्या. सारं झालं. पन त्या तोपंत घालनार काय? याचा इचार झाला? शिवाजीराजं आता दारूगोळा पाठवंल. त्यो कुटं ठेवणार?’
‘आँ!’ विठोजीनं टाळा वासला.
‘आँ काय! गडावर देवीचं देऊळ सजलं. पागा सजली. सदर सजली. किल्लेदाराचा वाडा बी सजला. पन दारूगोळा कुठं ठेवणार? त्यापायी दारूकोठार नगो?’
गुणाजींचा सवाल ऐकून सारे विचारात पडले.
बाजींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली.
विठोजी आपले कल्ले खांजळत म्हणाला,
‘ही आक्कल तुला आधी पायजे व्हती. काय बिघडत न्हाई. गडावर चुना हाय. मायंदाळ दगड हाईत. चार दिसांत कुठल्याबी माचीवर कोठार-घर तयार हुईल. त्याची जिम्मेदारी माझी.’
दुसरे दिवशी बाजींनी गडाच्या एका माचीच्या टोकावर दारू-कोठाराची जागा दाखवली.
बांधकाम सुरू झालं आणि आठ दिवसांच्या आत माचीवर दारू-कोठार उभं राहिलं.
गुणाजीचा तर्क बरोबर होता. कोठार पुरं झालं आणि राजगडहून दारू-कोठाराची रसद गडावर आली.
पहाट झाली होती. सारा गड रानपाखरांच्या आवाजानं गजबजून उठला होता. पागेतल्या घोड्यांची खिंकाळणी ऐकू येत होती. वाड्यातल्या सरत्या सोप्यात पेटलेल्या चुलीपुढं बसून सखूची आई भाकऱ्या थापत होती. जवळ बसलेल्या सखूला ती म्हणाली,
‘पोरी, ह्यांस्नी काय पायजे का, बघ.’
सखू दुसऱ्या सोप्यात आली. तिनं पाहिलं, तो यशवंताचं हंतरूण मोकळं होतं. ती तशीच पुढच्या सोप्यात गेली आणि तिचं पाऊल खिळलं. क्षणभर ते दृश्य पाहून ती अलगद पावलांनी बाहेरच्या सोप्यात आली.
बाहेरच्या सोप्यात धुमीतला इंगळ घेऊन गुणाजी चिलीम ओढत होता. कट्ट्यावर यशवंता बसला होता. बाप-लेकांचं बोलणं चालू होतं. गुणाजी यशवंतला सांगत होता.
‘आज शिवाजी राजं गडावर येनार हाईत, म्हनं.’
‘म्हनं कसलं, ते येनारच!’ यशवंता म्हणाला, ‘बाजींनी साऱ्यांस्नी ताकीद दिलीया.’
‘येऊ देत.’ म्हणत गुणाजीनं एक झुरका घेतला आणि त्या झुरक्याबरोबर गुणाजीला ठसका लागला. तो ठसकत असता सखूनं विचारलं,
‘पानी आनू?’
दोघांच्या नजरा सखूकडं लागल्या. डोळ्यांतलं पाणी निपटत गुणाजी म्हणाला,
‘नगो, पोरी!’
‘जरा आत येतासा?’
‘का?’
‘आबा काय कराय लागलाय्, ते बगा.’ सखू हसत म्हणाली.
गुणाजी, यशवंता उठले. ते आतल्या सोप्यात गेले आणि दाराशीच त्यांची पावलं थांबली.
गुडघाभर धोतर नेसलेला उघडा विठोजी हातात ढाल-तलवार घेऊन सोप्यात नाचत होता. ‘जय भवानी ss’ म्हणत तलवारीचे हात स्वतःभोवती खेळवत होता.
ते विठोजीचं रूप बघून गुणाजी-यशवंताच्या चेहऱ्यांवर हासू उमटलं. गुणाजीनं हाक दिली,
‘इठोजी!’
‘या! म्होरं या! भितो काय?’ विठोजी गर्जला.
त्या आवेशपूर्ण आव्हानानं गुणाजी भिंतीचा आधार घेत जरा मागं सरकला.
सखूनं आवाज टाकला,
‘आबाss’
त्या हाकेनं विठोजी भानावर आला.
विठोजी घामानं डबडबला होता. सखू, गुणाजी, यशवंताकडं पाहत त्यानं आपली तलवार खाली आणली.
गुणाजी दाराचा आधार घेऊन उभा होता. तो म्हणाला,
‘काय, येड लागलंय् काय तुला?’
विठोजी पुरा भानावर आला होता. तो शरमला. म्हणाला,
‘तसं न्हाई! येरवाळीच जाग आली. लोहारानं जुनी तलवार पानी पाजून उजळून दिली व्हती. आज राजं गडावर येनार. वाटलं, चार हात करून बघावंत आनि मगच तलवार म्यान करावी.’
‘चांगलं केलंस! तरी बरं आमचं रगत देऊन तलवार म्यान केली न्हाईस.’ गुणाजी म्हणाला. सखूकडं पाहत त्यानं सांगितलं, ‘त्याची म्यान दे तेला.’
सखूनं खुंटीवरची म्यान पुढं केली. विठोजीनं तलवार म्यान केली. धापा टाकत विठोजी आपलं घामेजलेलं अंग पुसत असता गुणाजी आणि यशवंता बाहेरच्या सोप्यात आले. सोप्यात येताच दाबून ठेवलेलं हसणं उफाळलं.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया