🇳🇪भारत म्हणजे मसाल्यांसाठी शोधावा लागलेला देश. जगभरातील एकमेव प्राचीन मसाला बाजारपेठ हीही भारताची वेगळी ओळख आहे. मसालाकिंग दातार दुबई येथे मोठा व्यवसाय करतात. भारतात मसाल्यांचा वापर मुबलक होतो. जगातही भारतीय मसाले लोकप्रिय आहेत. जाणून घ्या मसालेदार कहाणी…
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव भारत आहे आणि त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत. विष्णू पुराणातला हा पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो. याच आपल्या देशाची ओळख ही मसाल्यांची जगातील सर्वात मोठी व जुनी बाजरपेठ अशी देखील आहे. याच मसाल्यांच्या बाजारपेठेमुळे जगभरातील व्यापारी प्राचीन काळापासून आपल्या देशाकडे आकर्षित झाले आहेत.
जगातील सर्वात प्राचीन व सभ्य संस्कृती अशी भारताची ओळख आहे, त्याबरोबरच जगभरातील एकमेव प्राचीन मसाला बाजारपेठ हीदेखील वेगळी ओळख भारत जपून आहे. जगभरातील व्यापाऱ्यांना मसाल्यांसाठी शोधावा लागलेला देश म्हणजे भारत असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. यासाठी आपल्याला थोड जागतिक इतिहासावर नजर टाकावी लागेल.
इतिहासाचे ‘मसाले’दार वळण – कॉन्स्टँटिनोपल पाडाव
रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. (त्यांची राजभाषा ग्रीक होती.) कॉन्स्टँटिनोपल इतिहासातील एक महत्त्वाचं शहर, कारण या शहरातून मोठय़ा प्रमाणात मासला व इतर व्यापार चालत असे. प्राचीनकाळी हे शहर जागतिक व्यापाराचं प्रमुख क्रेंद्र म्हणून ओळखलं जाई.
आज ‘इस्तंबूल’ या नावाने ओळखलं जाणार हे शहर तुर्की या देशाची राजधानीही आहे. अर्धा भाग अशिया खंडात, तर अर्धा भाग हा युरोप या खंडात असलेला हा जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे. इसवी सन 500च्या सुमारास या शहरावर ग्रीकांनी राज्य केलं, तेव्हा या शहराला ‘बायझँटिअम’ नावाने ओळखले जात असे. त्यानंतर या शहरावर रोमनांनी राज्य केलं. रोमन सम्राट ‘कॉन्स्टंटीन’ याच्या नावावरून या शहराला ‘कॉन्स्टँटिनोपल’ हे नावं पडलं. तुर्कानी या शहरावर राज्य केलं तेव्हा या शहराचं नाव बदलून ‘इस्तंबूल’ ठेवण्यात आलं. तुर्क व बायझँटिअम यांच्या 56 दिवसांच्या लढाईनंतर 28 मे 1453 ला कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला.
त्यावेळी युरोप आणि आशिया खंडाचा व्यापार हा खुश्कीच्या मार्गे चालायचा आणि त्याचा मध्यबिंदू होता कॉन्स्टंटिनोपल. तुर्कांनी हा मार्ग बंद केल्यानं भारतातून युरोपात जाणारा माल बंद झाला. युरोपियनांना मसाले, कापड इत्यादी आशियाई वस्तूंची चणचण भासू लागली आणि पर्याय म्हणून समुद्री मार्गांचा शोध सुरू झाला. याच बाजारपेठेच्या गरजेपोटी 20 मे 1498 ला वास्को द गामाने भारतीय भूखंडावर पाऊल ठेवलं. त्यानंतर इंग्रज डच व इतरही व्यापारी आले आणि पुढे सर्व इतिहास घडला पण याच्या मुळाशी भारतातील मसाला व्यापार हा एक प्रमुख हेतू होता. म्हणजेच जगभरातील व्यापाऱ्यांना मसाल्यांसाठी शोधावा लागलेला प्रदेश म्हणजे भारत देश होय.
मसाल्यांचा वापर व शोध
भारताला मसाल्यांचे माहेरघर असे म्हणतात. मसाल्यांचे आधिकाधिक उत्पादन व वापर सर्वात जास्त भारतात होतो. पाषाणयुगातील मानव हा कच्चे मास भाजून खायला शिकला, मास भाजतांना त्याला चवीसाठी मसाले लावायला शिकला आणि नंतर शेती करू लागला. विविध खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रयत्नात हळूहळू विविध मसाल्यांचा वापर सुरु झाला. तेव्हा सुरुवातीला तीळ व धने याचा वापर करू लागला. ख्रिस्तपूर्व 400 मध्ये भारतात विविध सुगंधित मसाले पिकत असल्याचा प्रचार-प्रसार झाला आणि युरोप व पूर्वेकडील देशाचा भारताच्या दिशेने ओढा सुरु झाला.
विविध ग्रंथात देखील व बायबलमध्येही मसाल्याचा उल्लेख आहे इजिप्तच्या पिरॅमिड्स देखील प्राचीन मध व मसाले आढळून आले आहेत. स्ट्रेबो या लेखकाने Geography या आपल्या ग्रंथात अरबांच्या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराविषयी उल्लेख केलेला आहे.
आता चमचमीत, मसालेदार खा बिनधास्त!!
• अल्कोहोल फ्री, GMO फ्री, लो फॅट, लो सोडियम, नॅचरल & हाय इन प्रोटीन! चायनीज, थाई, लेबनीज, इटालियन, मेक्सिकन आणि भारतीय मसाल्याच्या मुबलक व्हरायटी; गुणवत्ता, दर्जा आणि समाधानासाठी यूझर रेटिंग 4 स्टार आणि अधिक असलेले प्रॉडक्टस… पाहण्यासाठी, सवलतीत खरेदी करण्यासाठी 👆 इथे क्लिक करा. ॲग्रोवर्ल्डच्या वाचकांसाठी अमेझॉनची खास डिस्काउंट ऑफर …
मसाले म्हणजे सामान्यतः वनस्पतींची मुळे, साली, पाने, फळे, बिया, फुले इ. भाग वाळवून त्यांचा वापर मसाले म्हणून केला जातो. खाद्यपदार्थ तिखट, सुवासिक व स्वादिष्ट बनविण्यासाठी जे विविध वनस्पतींचे भाग वापरण्यात येतात, त्यांना ‘मसाले’ म्हणतात. मसाले वापरण्यामुळे पदार्थाची चव वाढते व तो त्याचबरोबर काही पदार्थ जास्त काळ टिकविले जातात.
मसाल्यांचा वापर
बहुतकरून मसाले हे उष्ण कटिबंधातील (आशिया) प्रदेशांत आढळतात मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा उपयोग आयुर्वेदातील विविध आसवे, अर्क इ. तयार करण्यासाठी करण्यात येतो. मसाल्याचे पदार्थ एकएकटेही वापरले जातात पण मिश्रणाच्या रूपात वापरले असता त्याच्यापासून चमत्कारिक असा स्वाद पदार्थाला मिळतो. बहुतेक मसाल्याचे पदार्थ मुळातच सुवासिक असतात.
या पदार्थांना असणारा विशिष्ट वास हा त्यात असणाऱ्या बाष्पनशील व अबाष्पनशील तेलांमुळे येतो. रासायनिक दृष्ट्या मसाल्याच्या पदार्थांत कार्बोहायड्रेटे (स्टार्च, सेल्युलोज, शर्करा इ. द्रव्ये) जास्त प्रमाणात असून कमी जास्त प्रमाणात प्रथिने, टॅनिने, रेझिने, रंगद्रव्ये, खनिजे (लोह, गंधक, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, क्लोरीन इ.) आणि बाष्पनशील तेल हे प्रमुख घटक आढळून येतात.
प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग औषधे म्हणून, पवित्र तेले व मलमे तयार करण्यासाठी आणि कामोत्तेजक पदार्थ म्हणून करण्यात येत होता, असे उल्लेख आढळले आहेत. त्यांचा वापर धर्मगुरू पूजेत व जादुटोण्यासाठीही तर विलासप्रिय रोमन सरदार मद्याला स्वाद आणण्यासाठी, स्नानाचे पाणी सुगंधित करण्यासाठी, शरीर लेपनासाठी व धूप म्हणून जाळण्यासाठीही करीत असत.
चीन, सुमेर, ॲसिरिया, ईजिप्त, ग्रीस, रोम इ. संस्कृतींत मसाल्याच्या पदार्थांचा वापर रोगोपचारासाठी करीत असत. प्राचीन ग्रीक लोक बऱ्याच मसाल्याच्या पदार्थांचा वापर खाद्यपदार्थ व पेये स्वादिष्ट करण्यासाठी करीत असत. इतर देशांतून आयात केलेल्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर फक्त श्रीमंत वर्गच करीत असे. विविध यज्ञासाठी व वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी काही प्रमाणात मसाले वापराचा आपल्याकडे इतिहास आहे.
काही ठिकाणी मृतदेह जतन करण्याची परंपरा प्राचीनकाळी अस्तीत्वात होती त्यासाठीही काही प्रमाणात त्या देहाला लावण्यासाठी मसाल्यांचा वापर करण्याचा उल्लेख इजिप्तच्या साहित्यात आढळतो. म्हणजेच प्राचीन संस्कृतीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की जन्म झालेल्या नवजात बालकाला कपाळी लावला जाणारा लेप किंवा सौदर्य टिकविणे, दैनंदिन जीवन ते आयुष्याचा शेवट( मासले लाऊन मृतदेह काही काळासाठी जतन करणे) अशा जीवनाच्या विविध टप्प्यात विविध मसाले हे अजाणतेपणे का होईना मानव जीवनाचे अविभाज्य घटक होते आणि आजही आहेत.
कॉन्स्टंटिनोपल ते कालिकत
तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल मार्ग बंद केल्यानं भारतातून युरोपात जाणारा माल बंद झाला हे आपण मागे पहिले. परंतु नंतर मात्र केरळमधील कालिकत हे शहर केवळ भारतात नव्हे तर जगात मसाल्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्याचे मसाल्याच्या व्यापारात पूर्वी असलेले महत्व अधिकच वाढले. कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव केल्यानंतर पर्शियन आखातातील व्यापारावर अरब आणि तुर्कांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. तर युरोपमध्ये युरोपीय लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. पशूंसाठी वैरणीची कमतरता असल्याने थंडीच्या महिन्यांमध्ये युरोपमध्ये जनावरांच्या कत्तली होत असत आणि त्यांचे मटन अनेक महिने टिकण्यासाठी दालचिनी, लवंग, मिरे यांचा भरपूर वापर केला जात असे.
मसाल्यांसाठी शोधावा लागलेला देश
1453 मध्ये पोपने भारताकडे जाणारा समुद्री मार्ग शोधण्याकरता पोर्तुगीज दर्यावर्दी, खलाशांना विशेष सवलती दिल्या. यातून 1492 मध्ये कोलंबस भारताच्या शोधात निघाला, पण त्याला अमेरिकेची भूमी गवसली. 1498 मध्ये वास्को-द-गामाने दक्षिण आफ्रिकेच्या केप आॅफ गुड होपला वळसा घालून भारताकडे कूच केले. त्याला भारतापर्यंतचा मार्ग अब्दुल मजिद या गुजराती खलाशाने दाखवला आणि त्याने कालिकतच्या जमिनीवर पाय ठेवले.
कालिकत किंवा मलबार किनारपट्टीला त्या काळात महत्त्व आले ते केवळ केरळमध्ये उत्पादन होणाºया मसाल्यांच्या पिकांमुळे नव्हे, तर या किनारपट्टीवर ईस्ट इंडीज (इंडोनेशिया, मलाया) बेटांवरून मसाल्याचे पदार्थ आणले जात होते त्यामुळे. तेथून हे पदार्थ पर्शियन आखाताच्या मार्गाने, लाल समुद्राच्या मार्गाने इजिप्त, अरबस्तानात, रोमचे साम्राज्य, युरोपमध्ये जात होते. या काळात खुष्कीच्या मार्गाने परदेशी व्यापार करणारे अनेक मोठे भारतीय व्यापारी कार्यरत होते.
पोर्तुगीज भारतीय सागरी हद्दीत येण्याअगोदर अनेक शतके भारतीय व्यापा-यांचा पूर्व आफ्रिकेशी व्यापार होत होता. पोर्तुगीजांनी कालिकतमध्ये पाय ठेवल्यानंतर झामोरिन राजाकडे मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारासाठी परवाने मागितले. झामोरिनने परवानगी दिल्यानंतर वास्को-द-गामाने लिस्बनला जाताना मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ नेले. या मसाल्यांची किंमत त्याच्या भारत सफरीच्या खर्चापेक्षा तिप्पट होती.
पोर्तुगीजांनी गोवा वगळता भारताच्या इतर प्रदेशात ढवळाढवळ केली नाही की हे प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मसाल्याच्या पदार्थांवर नियंत्रणासाठी आपले सर्व सागरी सामर्थ्य वापरले. या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारातून लॅटिन अमेरिकेतून भारतामध्ये बटाटा, मका आणि अननस ही तीन महत्त्वाची पिके आली आणि त्यामुळे आपल्या खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल घडला. पोर्तुगीजांचे साम्राज्य नंतर डच आणि इंग्रजांनी संपुष्टात आणले. पण मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीतील भारताचे साम्राज्य आजही अबाधित आहे आणि त्याची राजधानी कालिकत हीच आहे!
भारतीय मसाले लोकप्रिय का आहेत?
जगातील उपलब्ध मसाल्यांच्या तुलनेत भारतीय मसाल्यांना चव, गंध, आणि गुणवत्ता यामुळे जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळे जागतिक बाजार पेठेत भारतीय मसाल्यांना हजारो वर्षांपासून खूप चांगली मागणी आहे. अन्न पदार्थांना स्वाद आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व बाष्परूपाने उडून जाणारी तेले असलेल्या सुगंधी खाद्य वनस्पतींना ‘मसाल्याची पिके’ अशी सर्वसाधारण संज्ञा आहे या वनस्पतींची मुळे, पाने, खोड, फुले, फळे व बी यांपैकी एक अथवा जास्त अवयवांचा उपयोग मसाल्यासाठी करण्यात येतो. वनस्पतीच्या उपयोगात आणल्या जाणाऱ्या भागावर आधारित अशी महत्त्वाच्या मसाल्याच्या पिकांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.
(1) रेझीन : हिंग (2) मूलक्षोडे : जमिनीत आडवेखोड उदा.आले, हळद (3) कंद : कांदा, लसूण (4) खोडाची साल : दालचिनी (5) पाने : ओवा, कढिलिंब, तमाल, कोथिंबीर, पुदिना (6) कळ्या : लवंग (7) फुलातील किंजल्क : स्त्री-केसराचे टोक उदा. केशर (8) फळ व बी : ओवा, खसखस, जायफळ, जिरे, तीळ, धने, पिंपळी, बडीशेप, मिरची, मिरी, मेथी, मोहरी, वेलदोडा, शहाजिरे व शेपू. यांपैकी प्रमुख घटक असलेले आले, पिंपळी, मिरी, मोहरी,वेलदोडा व हळद अशी प्रमुख पिके मूळची भारतातील आहेत.
प्रमुख बाजारपेठ
भारताचा मसाल्याचा व्यापार अमेरिका, चीन, व्हियतनाम, ब्रिटन, अरब अमिराती, इंडोनेशिया, मलेशिया, सौदी अरबस्तान आणि जर्मनी यांच्याशी आहे. भारताएवढे शुद्ध मसाल्याचे पदार्थ अन्य देशात तयार होत नाहीत. शिवाय भारतीय मसाल्यात अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारताची मसाल्याची निर्यात वाढत चालली आहे. या मसाल्याच्या पदार्थात मेथी, धने, हळद, विलायची, लवंग, दालचिनी, मिरची, जिरे, मिरे, हिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गेल्या चार वर्षात जागतिक मंदी आणि आयातदार देशांत लावण्यात आलेले अनेक कडक नियम यामुळे मसाल्याची भारताची निर्यात मंदावेल असे वाटले होते या निर्यातीत 24 टक्के वाढ झाली आहे. भारतीय मसाला उद्योगाला किती उज्वल भविष्य आहे याचे प्रमुख उदाहरण म्हणजे दुबईतील प्रख्यात मसाले उत्पादक डॉ. धनंजय दातार.
मसालाकिंग दातार दुबई
दुबईत एका छोट्या धान्याच्या दुकानापासून सुरुवात करून आज ‘अल अदिल ट्रेडिंग’ ही 38 स्टोअर्सची प्रसिद्ध व्यवसाय साखळी संपूर्ण आखातामध्ये स्थापित करण्याचा मान दातार यांच्याकडे जातो. संयुक्त अरब अमिराती, बाहरीन, सौदी अरेबिया आणि भारत या देशांमध्ये त्यांची सुपरमार्केट साखळी कार्यरत आहे.
दातार यांच्या नावावर कित्येक पुरस्कार आणि सन्मान आहेत. त्यांत फोर्ब्स बेस्ट इंडियन अॅवॉर्ड; द अरेबियन बिझिनेस इंडियन इनोव्हेटर सीइओ अॅवॉर्ड; एंटरप्रिनर मॅगझीन्स बेस्ट इंडियन रिटेलर अॅवॉर्ड; ग्लोबल अॅवॉर्ड फॉर परफेक्शन, क्वॉलिटी अँड परफॉर्मन्स, जीनिव्हा स्वीत्झर्लंड; इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर लीडरशीप अँड क्वॉलिटी– पॅरीस, फ्रांस आणि बेस्ट एंटरप्रायजेस अॅवॉर्ड – ऑक्सफर्ड, युके आदींचा समावेश आहे.
दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ‘अरेबियन बिझनेस’ या नियतकालिकाने चालू वर्षासाठी ‘दि इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या यादीत दातारांचा आठवा क्रमांक लागला आहे. गेल्यावर्षी या यादीत डॉ. दातार सोळाव्या क्रमांकावर होते. केवळ वर्षभरात त्यांनी आखाती प्रदेशातील (जीसीसी रीजन) आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे. दुबई प्रशासनाने डॉ. दातार यांना ‘मसालाकिंग’ हे नाव दिले आहे.
मसाल्यांची विविधता
भारतात विविध जाती-धर्म व पंथाचे नागरिक राहतात. भाषा व प्रांतावर नागरिकांच्या खानपानात देखील विविधता दिसून येते परिणामी याचा परिणाम स्वरूप मसाल्यांच्या वापराबाबतदेखील विविधता तयार झाली आहे. उदा. उत्तर भारतात वापरले जाणारे मसाले वेगळे तर दक्षिण भारतातील तेच मसाले पण वेगळ्या चवीने व पद्धतीने तयार केलेले. विशिष्ट पदार्थांसाठी विशिष्ट मसाले, हे आजचे समीकरण आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घरांघरांप्रमाणे मसाल्यातही वैविध्य आढळते.
1) गोडा मसाला (काळा मसाला) 2) पंजाबी गरम मसाला 3) कांदा लसूण मसाला 4) स्पेशल गरम मसाला 5) मालवणी मसाला 6) कोकणी मसाला 7) कच्चा मसाला 8) चहाचा मसाला 9) दूध मसाला 10) सांबार मसाला 11) पावभाजी मसाला 12) चाट मसाला वरीलप्रमाणे आहे तेच मसाले वेगवेगळ्याप्रकारे वापरून भारतात विविध चवीचे व सुगंधाचे मसाले बनविण्यास भारतीय तरबेज आहेत. म्हणून भारतीय मसाल्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
मसाला क्षेत्रात देशाचा वाटा
भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला वापरणारा तसेच निर्यातदार देश आहे. जगभरातील 109 मसाल्यांच्या उत्पादनापैकी 65 प्रकारचे मसाले हे भारतात उत्पादित होतात. मसाल्यांच्या जागतिक व्यापार साधारणपणे दहा लाख टन पेक्षा जास्त असून, त्याची किंमत 2,750 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. या संपूर्ण व्यापारात भारतच वाटा 48% आहे तर 43% वाटा हा एकूण मूल्यात आहे.
कोरोना आणि मसाले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मसाले निर्यातीत जूनपासून भारतातील मसाल्यांच्या निर्यातीत डॉलरच्या तुलनेत 23 टक्के आणि रुपयाच्या 34 टक्के वाढ झाली आहे. याबाबत बिझीनेस टूडे या इंग्रजी दैनिकाने वृत्त प्रसिद्ध केले असून त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर 2019 मध्ये मसाल्याच्या निर्यातीत वाढ केवळ 4 टक्के आणि 8 टक्क्यांनी होती. 2018-19 मध्ये मुख्यत: व्हिएतनाम, चीन आणि अमेरिकेत निर्यात झाली.
जगभरातील तज्ज्ञांनी रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि कोरोनाव्हायरसपासून दूर होण्यासाठी आपल्या जेवणात मसाले वापराचा सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्यानुसार, जूनपासून 2020 मध्ये भारतातून मसाल्यांची निर्यात डॉलरच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढून 2,721 कोटी झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात ती 2030 कोटी रुपये होती. रुपयांच्या दृष्टीने ही वाढ 34 टक्के आहे, असे व्यापार मंडळाच्या असोसॅमने संघटनेने म्हटले आहे.
भारतीय स्पाईस बोर्डाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2019 मध्ये भारताने 857,400 टन मसाल्यांची निर्यात केली होती, तर 2018 मधील याच कालावधीत 825,340 टन्स एवढी निर्यात झाली होती, त्या तुलनेत केवळ 4 टक्क्यांनी वाढ झाली. मूल्य दृष्टीने, याच कालावधीत भारताने 15,882.20 कोटी रुपयांच्या मसाल्यांची निर्यात केली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीत 14,665.77 कोटी रुपयांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
पारंपारिकपणे, मिरपूड, वेलची, आले, हळद, धणे, जिरे, बडीशेप, मेथी, जायफळ, मसाला तेल आदी मसाले उत्पादने परदेशात निर्यात केली गेली. 2018-19 मध्ये भारतीय मसाल्यांचा सर्वाधिक खरेदीदार व्हिएतनाम (123,673 टन), चीन 93,649 टन) आणि अमेरिका 82,204 टन) होते. बांगलादेश, मलेशिया, युएई, इंडोनेशिया, थायलँड, ब्रिटन आणि इराण ही इतर प्रमुख खरेदीदार राष्ट्र होती.
कोणत्या मसाल्यांना जास्त मागणी
2018-19 मध्ये अमेरिका सुमारे 5,465.19 tonnes टन काळी मिरीचा सर्वात मोठा आयात करणारा देश होता, त्यानंतर इग्लंडने 1,375.34 टन्स आयात भारताकडून केली होती. युएई आणि कुवैतची वेलचीला जास्त मागणी होती तर, चीन आणि व्हिएतनाममध्ये भारतीय मिरचीची मोठी मागणी होती. अद्रकची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, मोरोक्को आणि बांगलादेशात होती, तर हळद मुख्यत: इराण, अमेरिका, बांगलादेश आणि मोरोक्को येथे निर्यात केली जात होती.
भारतीय धन्यांना मलेशियात सर्वाधिक मागणी होती, तर जिरे मुख्यत्वे व्हिएतनाममध्ये निर्यात केला जात असे. बडीशेप बाबतीत व्हिएतनाम तर, मलेशिया आणि अमेरिकेत भारतीय लसूणला मोठी मागणी होती. कढीपत्ता मुख्यतः युएई आणि अमेरिकेत निर्यात केली जात असे. जूनमध्ये मसाल्यांच्या निर्यातीत वाढ ही रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी भारतीय मसाल्यांचे महत्व विषद करते.
राष्ट्रीय मसाला बोर्ड
देशात मसाला उद्योगाला चालना देण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण मसाले उत्पादनासाठी व निर्यातीसाठी राष्ट्रीय मसाला बोर्डची 26 फेब्रुवारी 1987 ला स्थापना करण्यात आली. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पाच कमोडिटी बोर्डपैकी मसाले बोर्ड एक स्वायत्त संस्था आहे.
मसाले उद्यान (स्पाईस पार्क) काय आहे ?
मसाला उद्यान याला आपण औद्योगिक उद्यान म्हणू शकतो जेथे मसाले आणि मसाले उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते आणि त्यांची लागवड केली जाते. या पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तुलनेत प्रक्रिया सुविधा उपलब्ध असतात. याठिकाणी मसाला आयात करणाऱ्या देशाच्या मागणीप्रमाणे त्या देशांच्या गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांसह कृषी व कापणीनंतरच्या प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवण आणि निर्यातीसाठी एकात्मिक नियोजन केले जाते. येथे उद्योगाच्या भरभराटीस आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
मसाला उद्यान या संकल्पनेचे मूळ उद्दीष्ट म्हणजे पिकांच्या हंगामानंतर आणि मसाल्यांच्या उत्पादनांची नंतरची प्रक्रिया हाताळणे तसेच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देणे. यासाठी समान पायाभूत सुविधा उपलब्ध करणे. संपूर्ण मसाला उद्यान मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रक्रिया सुविधा आहेत ज्यात उत्पादनांची साफसफाई, ग्रेडिंग, शॉर्टिंग, ग्राइंडिंग, पॅकिंग, स्टोरेज इ. काम केले जाते. वरील सुविधांव्यतिरिक्त मंडळाकडे रस्ते, पाणीपुरवठा यंत्रणा, वीज निर्मिती घर, अग्निशमन व नियंत्रण यंत्रणा, तुला चौकी, एक्स्ट्रॅक्ट्रिक्युलर ट्रीटमेंट प्लांट, मूलभूत पॅरामीटर्स तपासण्यासाठी उत्कृष्ट प्रयोगशाळा, बँक व पोस्ट ऑफिस काउंटर, गेस्ट हाऊस इ. मूलभूत पायाभूत सुविधा आहेत.
मसाला उद्यान शेतकरी / व्यापारी समुदायासाठी शैक्षणिक सेवा पुरवते. तसेच याद्वारे कृषी व्यवहार, कापणी पाश्च्यात तंत्रज्ञान आणि वैश्विक अन्न सुरक्षा आणि उत्कृष्ट मानक व मुद्दे इत्यादी विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते. मसाला पार्क सध्या स्थानिक पातळीवर असलेल्या लहान शेतकरी व उद्योजकयांच्या उत्पादनांसाठी अधिक चांगल्या किंमतीची खात्री देते. पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या प्राथमिक स्त्रोतांच्या सुविधांचा फायदा घेऊन, शेतकरी त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारू शकतात आणि परिणामी ते थेट निर्यातदारांना आपला माल विकू शकतात.
देशातील मसाला उद्यान
सर्व प्रमुख उत्पादन / विपणन क्षेत्रामध्ये मसाला बोर्ड मसाल्याचे उद्यान उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. देशातील प्रत्येक राज्यात किमान एक मसाला उद्यान स्थापित करण्याचे बोर्डाचे उद्दीष्ट आहे. खालीलप्रमाणे काही मसाला उद्यान आज रोजी तयार आहेत.
क्र.सं. | स्थान | आच्छादित मसाले |
1. | छिंदवाड़ा, मध्य प्रदेश | लसुन आणि मिरची |
2. | पुट्टाडी, केरल | काळी मिरी आणि ईलायची |
3. | जोधपुर, राजस्थान | जीरा आणि धना |
4. | गुना, मध्य प्रदेश | धना |
5. | गुंटूर, आंध्र प्रदेश | मिरची |
6. | सिवगंगा, तमिलनाडु | हळद आणि मिरची |
7. | कोटा, राजस्थान | जीरा आणि धना |
8. | रायबरेली, उत्तर प्रदेश | पुदीना |
या प्रमाणे मसाला बोर्डाने देशाच्या विविध भागात मसाला उद्यान उभारले आहे आणि काहींचे काम प्रगतीपथावर आहे.
मसाला कसा साठवावा?
वर्षभर लागणारा मसाला करून ठेवण्याची किंवा भरून ठेवण्याची पद्धत घरोघरी अवलंबली जाते. मात्र, वर्षभराचा मसाला साठवून ठेवताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा केलेली मेहनत आणि पैसा वाया जाण्याची भीती असते. तेव्हा मसाला भरून ठेवताना पुढील काळजी घ्या.
मसाला भरताना त्याला पाण्याचा हात लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्या. त्यामुळे मसाला ओलसर होऊन त्याला बुरशी येण्याची शक्यता असते.
पाच किंवा दहा किलोच्या डब्यात मसाले भरून ठेवू नका. त्यामुळे मसाला खराब झाला, तर सगळाच टाकून देण्याची वेळ येते. तेव्हा शक्यतो एक-दोन किलोच्या डब्यातच मसाला भरून ठेवावा.
मसाला डब्यात भरून ठेवल्यावर त्याला बाहेरची हवा लागणार नाही, याची दक्षता घ्या. वारा लागला, की मसाल्याचा रंग आणि वास उडतो.
मसाला डब्यात भरल्यावर त्याच्यात एक हिंगाचा मोठा तुकडा टाकावा. हिंगामुळे मसाला खराब होत नाही आणि मसाल्याचा नैसर्गिक वासही कायम राहतो.
मसाल्याचे डबे नेहमी कोरड्या जागी ठेवावेत. ते सतत हाताळू नयेत. पंधरवड्याला किंवा महिनाभर लागणारा मसाला, एका वेगळ्या डब्यात काढून घ्यावा.
डबे ते उन्हाच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या.
त्या डब्यांमध्ये स्टीलचा चमचा घालून ठेऊ नका.
मसाल्याच्या डब्याचं झाकण घट्ट असलं, तरी त्याला पांढरा स्वच्छ कपडा गुंडाळा. ज्यायोगे हवा जायला वाव राहणार नाही.
तुम्हाला या खालील बातम्याही वाचायला नक्कीच आवडेल; सबंधित लिंकवर क्लिक करा … 👇👇