कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात रविवारी (9 ऑगस्ट) सकाळी 11.00 वाजता महाबळ रोडवरील मायादेवी नगरामधील रोटरी क्लब येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जळगावातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती श्रीमती उज्वलाताई माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या, फळे यांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. सद्य:परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल.
महोत्सवात 20 हून अधिक रानभाज्या
महोत्सवात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, घोळ, अंबाडी, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा आदिंसह इतर विविध 20 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे.
रानभाज्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त : चित्ते
कोरोनाच्या संकटात शहरातील नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवावी याची जाणीव झाली असून या महोत्सवात येणाऱ्या रानभाज्या या नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. कृषी विभागाने आयोजित या महोत्सवात एक सामाजिक जाणिवेच्या दृष्टीने रोटरी सहभागी होत आहे. संपूर्ण निर्जंतुक केलेल्या परिसरात योग्य शारीरिक अंतर ठेवून महोत्सव पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे.
तुषार चित्ते, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्ट
सातपुड्यातील रानभाज्याचा प्रसार, विकास व संशोधन यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ – अनिल भोकरे
रानभाज्यांचे होत असलेले विस्मरण ओळखत कृषी विभागाने शासनाच्या दिशानिर्देशानुसार व क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव आयोजित केला आहे. रानामध्ये उपलब्ध रानभाज्या, फळे यांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. हेच महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना या महोत्सवात होईल तसेच भविष्यात भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल. नैसर्गिकरित्या रानभाज्या पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना हा महोत्सव एक व्यासपीठ आहे. सातपुड्यातील रानभाज्याचा प्रसार, विकास व संशोधन व्हावे या दृष्टिकोनातून काही संशोधक देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे.
अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगांव
Good
Didn’t know these veggies even exist