१८ जूनपासून कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय.
प्रतिनिधी( जळगांव) : नेहमी जूनच्या मध्यापर्यंत राज्यात दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे या वेळी जूनच्या सुरुवातीलाच राज्यात सक्रीय होत मान्सूनने राज्यातील बराचसा भाग व्यापला आहे. निसर्ग चक्रीवादळ आणि लवकर आलेला मान्सून यामुळे जून महिन्यातील पावसाची सरासरी वाढली असून जवळपास ४० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
राज्यात मान्सून सक्रीय होऊन त्याचा पुढचा प्रवास आहे उत्तर भारताकडे सुरु झाला आहे. उत्तर भारताकडील प्रवास व लवकर आलेल्या मान्सूनमुळे सर्वदूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु असून काही भागात पावसाने खंड दिला आहे अशी स्थिती तयार झाल्याचे चित्र दिसते , परंतु हा पावसातील खंड नसून बंगालच्या उपसागारावरील मान्सूनची शाखा उत्तरेकडे देखील सक्रिय झाल्यामुळे राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरु आहे. १८ ते २२ जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाच जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
निसर्ग चक्रीवादळाने पावसाच्या सरसरीत व पेरणीत वाढ
निसर्ग चक्रीवादळ आणि लवकर आलेला मान्सून यामुळे जून महिन्यात जवळपास ४० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात धरण क्षेत्रात पाण्यात वाढ होते परंतु यावेळी लवकर आलेला मान्सून व चक्रीवादळ यामुळे बहुतांश प्रकल्पात पाणी साठा वाढला आहे. या पोषक स्थितीमुळे वातावरणातील तापमानात देखील कमालीची घट झाली आहे. जून २०१९ मध्ये ३९ अंश सेल्सिअस असलेले तापमान या वर्षी ३५ पर्यंत आले आहे.
या स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे ?
मान्सूनने खंड दिलेला नसून वाटचाल संथ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी कारण मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर आल्याने पेरणीला फार मोठा उशीर होणार नाही. मागील वर्षाच्या तुलनेत वातावरणातील तापमानात देखील कमालीची घट झाली त्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावर फार जास्त परिणाम होणार नाही पण ज्यांची पेरणी बाकी आहे त्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी.
१८ जूनपासून कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय
संथ असलेला मान्सून पुन्हा जोर पकडत असून १८ जून पासून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी येतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.