मुंबई (प्रतिनिधी) – निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून पुढे सरकत असून गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. पुढील २४ तासात मान्सून अधिक सक्रीय होईल आणि तो महाराष्ट्राकडे वाटचाल करेल. परिणामी, मान्सून १० जूनपासून महाराष्ट्रात सक्रीय होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तविले आहे.
हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने मान्सूनमध्ये प्रगती होईल व तो ओरिसाच्या दिशेने सरकेल. परिणामी, मध्य व दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढेल. कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, दक्षिण – पश्चिम आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल.
मान्सून गोव्यातून महाराष्ट्रात..
गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील २४ तासात मान्सून सक्रीय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल, असा अंदाज आहे. हा मान्सून १० जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने सक्रीय होईल. कोकण, मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे.