उत्तर महाराष्ट्रात राहील ढगाळ वातावरण…!
पुणे (प्रतिनिधी)
रब्बी हंगाम हाताशी आलेला असतांना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ करणारा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्याच्या तापमानात सतत बदल होत असून, ढगाळ वातावरण व वाढते ऊन यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. विदर्भात उद्यापासून (दि.०६ मार्च ) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तापमनात चढ-उतार राहणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे तर बुधवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व विदर्भात पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून पाऊस पडणार आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हवेचा उत्तर दक्षिण बाजूला तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणी पश्चीमेकडल्या वाऱ्याचा मिलाफ यामुळे विदर्भात पावसाला पूरक स्थिती तयार झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
मागील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला असून, आज व उद्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.
शेतकऱ्यांनी वरील वातावरणातील बदल पाहता आपली पशुधन व रब्बीतील तयार शेतमाल संरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.