स्टोरी आऊटलाईन…
- कृषी शिक्षणाचा केला शेतीत उपयोग
- नोकरी,व्यवसाय ते शेती असा यशस्वी प्रवास
- द्राक्ष व डाळींब मुख्य पिके
- साडेसोळा एकर शेती जमीन कसतात
- बेदाणा निर्मितीमुळे लाखोंचे उत्पन्न
- बाजारचा कल पाहून पिकपद्धती बदलविली.
वडिलोपार्जित शेती आणि शेतीशी निगडीत उच्च शिक्षणामुळे शेती कशी फायद्याची ठरू शकते हे कर्जत तालुक्यातील नागलवाडी (अमहदनगर) येथील बाळासाहेब यांनी सिद्ध करून दाखविले आहे. इतरांची शेती कराराने करून त्यातून द्राक्षोत्पादन,बेदाणा निर्मिती, डाळिंब उत्पादन, शेळीपालनाचा अभिनव प्रयोग शिंगटे यांनी केला असून याद्वारे सुमारे 25 लाखांचे उत्पन्न मिळवत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी हे प्रयोग मार्गदर्शक ठरत आहेत.
नोकरी करता करता करू लागले शेती:
बाळासाहेब हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सातोली येथे सौ. लता अशोक दुधे यांची साडेसत्तावीस एकर शेती कराराने करतात. शिंगटे यांचे शिक्षण बीएस. सी. अॅग्री झालेले आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी एका पेस्टीसाईट कंपनीत नोकरी केली. 8 वर्ष कंपनीची नोकरी करता करता त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शेती कसायला प्रारंभ केला. गावाकडच्या कोरडवाहू शेतीपेक्षा ह्या बागायती शेतीने लळा लावला व त्यातून प्रगती साधली. 2004-05 साली कंपनीचे काम करतांना सोलापूर शहरालगत असलेल्या तिघा शेतकर्यांची साडेसोळा एकर जमीन कराराने करण्यास घेतली. वर्षाला एकरी 10 हजार रुपये मूळ मालकांना द्यावयाचे ठरले. 5 एकरावर द्राक्ष लागवड केली. 5 वर्षात 30 लाखाचे उत्पन्न मिळाले. शिंगटे यांनी मोठ्या कष्टाने सुधारणा केलेली शेती मुल मालकाने परत घेतली. दरम्यानच्या काळात नॅशनल हॉर्टीक्लचर बोर्डचे शेतकर्यांचे प्रोजेक्ट तयार करून देण्याचे काम सरू झाल्याने उत्पनाचा नवा स्रोत तयार झाला होता. यानिमित्ताने ग्रो कन्सल्टन्सी सुरु झाली झाली.
करार शेतीतून केली कमाल
2009 मध्ये सौ.लता अशोक दुधे यांची जमीन कसण्यासाठी घेतली. विशेष म्हणजे दुधे आणि शिंगटे यांच्यात कोणताही करार झाला नाही. दोघे फक्त शब्दांनी बांधले गेले. या काळात शेतीच्या वाढलेल्या व्यापामुळे कंपनीची नोकरी सोडली. दुधे यांच्या सातोली शिवारातील शेतात विहीर होती. पाणी अपुरे पडू लागले म्हणून 2-3 किमी अंतरावरून सिना-भीमा नदीच्या बोगद्यापासून पाणी आणून विहिरीत टाकले. तरीही पाणी कमी पडू लागले. त्यावेळी 250 फुट खोलकुपनलिका घेतली. विहीर 50 फुट खोल व 20 फुट व्यासाची होती. या विहरीत उजनी धरणाच्या बँकवाटरमधून 6 इंची पाईप लाईनने साडेसात कि.मी.वरून पाणी आणून विहिरीत साठवण केली.
बेदाणा निर्मिती
सुरुवातीस 10 एकर क्षेत्रावर सिडलेस थाम्पसन जातीच्या द्राक्षांची लागवड केली. पहिला हंगाम 2 वर्षानी घेतला. हा हंगाम फारसा फायद्याचा ठरला नाही. त्याचवेळी द्राक्षापासून बेदाणा निर्मितीचा निर्णय झाला. एकरी 12 टन उत्पादित होणार्या द्राक्षापासून उत्कृष्ट प्रतीचा 3 टन बेदाणा तयार होऊ लागला. हंगामानुसार व प्रतीनुसार 250 ते 300 रुपये प्रतीकिलो दर मिळू लागला. त्यातून वर्षाकाठी 30 लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. 15 लाख रुपये वगळता तर 15 लाख रुपये हाती येऊ लागले.
बेदाणा निर्मितीस प्राधान्य देता देता इतर पिकांकडे ते लक्ष देऊ लागले.5 एकर क्षेत्रावर भगवा डाळींब लागवड केली. बाजाराचा अंदाज घेऊनच बहार घेतला. त्यामुळे सरासरी 60 ते 90 रुपये असा पर्यंतचा दर मिळाला. उत्पादन 15 टन प्रती एकरी मिळाले. खर्च वजा जाता 8 ते 10 लाख रु उत्पन्न मिळाले. डाळींबाची गुणवत्ता राखल्यामुळे मुंबई,सोलापूर बाजारात विश्वास निर्माण झाला. परिणामी 2013 -14 मध्ये पुन्हा अकरा एकर क्षेत्रावर डाळींब लागवड करण्यात आली. अशाप्रकारे द्राक्ष व डाळिंबाचे क्षेत्र झाले. सचोटीचा व्यवहार असल्याने शेतीचे मालक दुधे व शिंगटे यांच्यात चांगला ताळमेळ आहे.
पशुपालन व शेळीपालन
सध्या दुधे यांच्या जमिनीत राहण्यासाठी तीन रूमचा बंगला वजनावरांसाठी अत्याधुनिक पद्धतीचा गोठा बांधला आहे. पशुपालन सुरु केल्याने शेतीला शेणखत मिळू लागल्याने जमिनीचा कर्ब कायम ठेवला गेला. दर तीन वर्षांनी माती परीक्षण केले जाते. आता अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरु करून दोन वर्षात 5 हजार शेळ्यांचे संगोपन करणार असल्याचे शिंगटे यांनी सांगितले. शेतीचा हा व्याप सांभाळण्यासाठी 1 सालगडी आहे. शेतावर कायमस्वरूपी 9 महिला रोजंदारीने कामाला आहेत. शिवाय वेळोवेळी रोजंदारीने जवळच्या गावातून मजूर आणले जातात.
ज्या शेतकर्याकडे पाणी आहे, त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या जमिनीतून उत्पादन काढावे. मोठी अपेक्षा न ठेवता शेतीत लक्ष घातले तर शेतीसारखे शास्वत उत्पन्न व राहणीमान दुसरे कशातही नाही. मात्र सिंचनाची सोय असेल तरच शेतीत आनंद आहे. सिंचनाची सोय असणार्यांनीच शेती व्यवसाय म्हणून करावा,त्यामुळे नैराश्य येत नाही. शेती परवडतेच, सकारात्मक विचारसरणी व शेतात पाणी आवश्यक तर आहेच. त्याबरोबरच शेतकर्यांनी बाजार व्यवस्थापन, विक्रीकौशल्य शिकले पाहिजे. पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन सर्वौत्कृष्ट व्यवसाय आहे. शेतीत धोके तर आहेतच पण कोणत्या व्यवसायात धोके नाहीत? शेतकरी तर नेहमीच संकटांवर मात करीत आला आहे. 5 हजार रुपये पगाराची नोकरी करण्यापेक्षा शेती करणे केंव्हाही सन्मानाचे आहे.
बाळासाहेब शिंगटे,
मो.न.9422458701