डॉ. गणेश देशमुख
प्रा. संदीप पाटील
प्रा. अशोक चव्हाण
प्रा. सुदर्शन लटके
उन्हाळी मुगाची शेतकर्यांनी पेरणी केली आहे. या पिकासाठी वेळावेळी आंतरमशागत आणि सिंचन करणे गरजेचे आहे. सोबतच पिकाचे कीड आणि रोगापासून संरक्षण देखील आवश्यक आहे. सध्या बर्याच ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. या परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करून मुगाचे भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे.
आंतरमशागत
- पीक सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवणे ही पिकाच्या वाढीसाठी आवश्यक बाब आहे.
- कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
- कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.
- कोळपणी जमिनीत वापसा असताना करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पीक पेरणीपासून पहिले 30 ते 45 दिवस तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या द़ृष्टीने आवश्यक असते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन - मूग आाणि उडीद ही पिके सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर येणारी पिके आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा वेळी पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी झाला असल्यास, जमिनीच्या प्रकारानुसार आणि मगदुराप्रमाणे पाणी देणे अधिक सोयीचे होते.
— रोगांची लक्षणे, नियंत्रण —
भुरी रोग - रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या उत्तरावस्थेत म्हणजे फुले व शेंगा लागते वेळी दिसून येतो. इरिसिपी पॉलीगोनी या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो. या रोगामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात.
- रोगाची तीव्रता जास्त असल्यास संपूर्ण पाने पांढरट दिसतात. कर्बग्रहणाच्या क्रियेत अडथळा येऊन फार कमी प्रमाणात शेंगा लागतात. त्यामुळे शेंगामध्ये दाणे देखील भरले जात नाहीत.
- या रोगामुळे पीक लवकर पक्व होऊन उत्पादनात घट येते, तसेच जास्त प्रमाणात पानगळही होत असते. कमाल तापमान 32 अंश सें. आणि किमान 13 अंश सें. तापमान, 85 टक्के आर्द्रता व कोरडे हवामान या रोगास अतिशय अनुकुल आहे.
नियंत्रण - भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बेन्डेझीम (0.1 टक्के) प्रति लिटर किंवा 2.5 ग्रॅम डायथेन एम 45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता वाढल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
पिवळा विषाणू - हा विषाणूजन्य रोग असून या रोगाचा प्रसार मुख्यत: पांढरी माशी मार्फत होत असतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते.
- सुरुवातीला पानावर पिवळसर हिरवे एकत्रित ठिपके दिसतात. हे ठिपके सुरुवातीला लहान व गोलाकार असतात. रोगाची तीव्रता वाढल्यास ते मोठे आणि आकार विरहित होतात व पाने पांढरी पडतात.
- या रोगाचा प्रादुर्भाव शेंगांवरही दिसून येतो. रोगग्रस्त शेंगा लहान राहतात व पिवळ्या पडून सुरकुतल्या सारख्या दिसतात.
नियंत्रण - या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथम विषाणूजन्य झाडे उपटून त्यांचा नाश करावा.
- रोग पसविणार्या पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी 10 मि.ली. डायमेथोएट 30 टक्के प्रवाही किंवा 2 मि.ली. इमिडॅक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास दुसरी फवारणी 10 ते 12 दिवसाच्या अंतराने करावी.
पाने आकसणे (लिफ क्रिंकल) : - पाने आकसणे (लिफ क्रिंकल) हा विषाणूजन्य रोग आहे. यामुळे कोवळी पाने जास्त प्रमाणात आकसतात. पानाचा पृष्ठभाग आकसणे हे या रोगाचे ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे.
- झाडाची वाढ खुंटून फांद्यांची संख्या देखील कमी होते. अशा फांद्यांना फुले व शेंगा लागत नाहीत. या रोगाचा प्रसार तुडतुडे या किंडीमुळे होतो.
नियंत्रण - रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. नियंत्रणासाठी 10 मि.ली. डायमेथोएट 30 टक्के प्रवाही किंवा 2 मि.ली. इमिडॅक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानावरील ठिपके (सरकोस्पोरा) - या रोगाची लक्षणे म्हणजे सुरुवातीला लहान आकाराचे व जास्त संख्येचे बारीक ठिपके तयार होतात. या ठिपक्याचा मध्यभाग पुसट तपकिरी तर किनार लालसर तपकिरी असते.
- या ठिपक्यांचा प्रादुर्भाव फांद्यांवर व शेंगांवरही आढळून येतो. हवामानातील जास्त आर्द्रतेमुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
- या रोगास पोषक वातावरण मिळाल्यास ठिपके उग्र स्वरुप धारण करतात. पीक फुलोर्यात किंवा शेंगा तयार होण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास पानगळ देखील होत असते.
- याची बुरशी बियामध्ये सुप्त अवस्थेत तसेच झाडाच्या मातीतील भागात जिवंत राहते.
नियंत्रण - रोगप्रतिकारक जातीचा वापर पेरणीसाठी करावा आणि पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. शेतात स्वच्छता ठेवावी.
- नियंत्रणासाठी 1 ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा 2.5 ग्रॅम डायथेन एम 45 प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी.
— किंडीची लक्षणे, नियंत्रण —
मावा - मावा कीडीचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो. आकाराने अंडाकृती असून पानातील आणि फुलांच्या देठातील रस शोषण करतात.
- या किडी शरीरातून एक प्रकारचा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढत असल्याने झाड निस्तेच होऊन वाढ खुंटते.
तुडतुडे - तुडतुडे आकाराने मध्यम पाचरीच्या आकाराचे आणि हिरवे असतात. पानावर तिरपे-तिरपे चालतात आणि रस शोषण करतात.
- यामुळे पाने पिवळी पडून वाळू लागतात व पिकाची वाढ खुंटते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने आकसतात आणि वाळतात.
फुलकिडे - फुलकिडे आकाराने सूक्ष्म असून त्यांची लांबी 1 मि.मी. पेक्षाही कमी असते. हे हिरवट तपकिरी किंवा करड्या रंगाचे आणि आकाराने निमुळते असतात.
- ही कीड पानातील आणि फुलांच्या देठातील रस शोषण करते. त्यामुळे पाने फिक्कट पडून त्यावर पांढरे चट्टे दिसून येतात. अशा उपद्रवामुळे पाने चुरडू लागतात.
पांढरी माशी - पांढर्या माशीचे पंख धुरकट पांढरे असतात. पिकातून चालत असताना त्या उडताना दिसतात. त्या आकाराने गोल आणि रंगाने तपकिरी असतात.
- अपूर्णावस्थेतील माशा बहुधा पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात. यामुळे पाने पिवळी पडतात. या किडीमुळे केवडा रोगाचा प्रसार होतो.
- केवडा रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झाल्यास पाने पिवळी दिसतात व संपूर्ण झाड नष्ट होते.
— नियंत्रण — - मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषण करणार्या किंडीचा प्रादुर्भाव कुळथी, मटकी व चवळी या पिकांवर देखील होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी पुढील किटकनाशकांचा वापर करावा.
- व्हर्टीसिलीयम लेकॅनी 40 ग्रॅम किंवा निंबोळी अर्क 50 मि.ली. किंवा 10 मि.ली. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही किंवा 10 मि.ली. मिथिल डिमॅटोन 20 टक्के किंवा 2.5 ग्रॅम अॅसिटामिप्रीड 20 टक्के पाण्यात विरघळणारी पावडर प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
खोड माशी - खोड माशी खोडावर अंडी घालते. अंड्यातून अंडयातून बाहेर आलेली अळी कोवळ्या खोडात शिरुन आतील गाभा खाते.
- * यामुळे उपद्रवित झाडाच्या खोडाचा वरील भाग वाळून संपूर्ण झाडच मरते.
नियंत्रण - पेरणीच्या वेळी 10 टक्के फोरेट 10 किलो किंवा 3 टक्के कार्बोफयुरॉन 30 किलो प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे किंवा उगवणी झाल्यानंतर ट्रासझोफॉस 40 टक्के प्रवाही 10 मिली किंवा डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पाने खाणारी केसाळ अळी - अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या राखाडी रंगाच्या असून अंगावर केस असतात.
- अळ्या पाने खरबडून खात असल्यानेे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. उपद्रवित झाडे शेतात लांबवर दिसून येतात.
नियंत्रण - सुरुवातीच्या अवस्थेत या अळ्या एकाच ठिकाणी असतात. अशा वेळी प्रादुर्भावित पाने तोडून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
- 25 मि.ली क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही किंवा 20 मि.ली. क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही किंवा 7 मि.ली. इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.
भुंगेरे - भुंगेरे फुलांच्या पाकळ्या आणि परागकण खातात. त्यामुळे उपद्रवित फुलापासून फलधारणा होत नाही आणि शेंगा सुद्धा लागत नाहीत.
- या किडीच्या उपद्रवामुळे पानावर बारीक गोलाकार छिद्र आढळून येतात. याचा उपद्रव प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट महिन्यात दिसून येतो.
नियंत्रण - 10 मि.ली. सायपरमेथ्रिन 10 टक्के प्रवाही किंवा 10 मि.ली. लॅम्डासायलोथ्रीन 5 टक्के प्रवाही प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी - अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या अळीचा रंग धुरकट पांढरा असतो. पूर्ण वाढलेल्या अळीचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो.
- सुरुवातीला अळ्या कोवळ्या पानावर जगतात आणि यानंतर त्या कळ्या, फुले खातात. शेंगा लागल्यावर शेंगामध्ये डोक्याकडील अर्धा भाग आत खुपसून आतील कोवळे दाणे खातात.
नियंत्रण - 30 मि.ली. प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही किंवा 25 मि.ली. मिश्र किडनाशक (ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही + ड्रेल्टामेथ्रीन 1 टक्का प्रवाही) 36 टक्के प्रवाही किंवा 7 मि.ली. इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही किंवा 3 मि.ली. स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही किंवा 4 ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.