इस्राईल दौर्यात एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तेथील महिलांचा सर्वच बाबतीतील सक्रिय सहभाग. शेती, उद्योग, व्यवसाय, हॉटेलमध्ये व्यवस्थापन आदी भूमिका अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्याचे काम तेथील महिला सहजपणे करतात. आम्ही जॉर्डनमधून इस्राईलमध्ये प्रवेश करतानाच याची चुणूक दिसली. पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करतात. यामुळेच इस्त्राईल सर्वच आघाड्यांवर पुढे असल्याची जाणीव मला झाली.
इस्त्राईलमध्ये प्रवेश केल्यावर तेथील तपासणी नाक्यावर आमच्या सामानाची तपासणी झाली. त्यानंतर आमची व्यक्तिगत पातळीवर चौकशी-तपासणी होणार होती. मी चौकशी कार्यालयातील एका खिडकीतून आत डोकावून पाहिले. कार्यालयात सर्वत्र महिला अधिकारी व कर्मचारी दिसत होत्या. काय विचारतील? त्यांची भाषा आपल्याला कळेल का? असे प्रश्न मला पडत होते. एवढ्यात आमच्यातील दोघांना चौकशी करणार्या महिला अधिकार्यांनी रेड सिग्नल देत थांबवून घेतले. आता त्या दोघांची वरिष्ठ अधिकार्यांकडून चौकशी होणार होती. त्या दोघांची चौकशी झाल्यानंतर माझा नंबर आला. त्या कनिष्ठ महिला अधिकार्यांनी कोठून आलात? कोठे जायचे आहे? इस्त्राईलमध्ये किती दिवस राहणार? कोणाला भेटणार आहात का? कशासाठी आलात? असे प्रश्न त्यांच्या इंग्रजी शैलीत विचारले. मी आपल्या इंग्रजी शैलीत प्रश्नांना उत्तरे दिली. 5 ते 6 प्रश्न विचारल्यानंतर ती हसली आणि वेलकम इन इस्त्राईल असे म्हणत तिने ग्रीन सिग्नल दिला. तेव्हा कुठे मला हायसे वाटले. या तपासणी नाक्यावर सुरक्षारक्षक देखील युवती होत्या. काळ्याशार गणवेशात हातात स्वयंचलित बंदूक घेतलेल्या, करारी चेहर्यावर जराही स्मित हास्य नसलेल्या महिला सैनिक पाहून धडकीच भरायची वेळ आली.
सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प
तेल अवीवपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शान गावाजवळ शफदान या सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या प्रकल्पाला आम्ही भेट दिली. या प्रकल्पाजवळ आमची बस पोहचली. गाईडने उतरताना प्रकल्पाबाबत सांगताच काहींनी बघण्यास नाराजी व्यक्त केली. आम्ही मात्र उत्सुकतेने प्रकल्प पाहण्यासाठी गेलो. या प्रकल्पाची माहिती आम्हाला ज्युली नावाच्या एका महिलेने दिली. येणार्या पर्यटकांना या योजनेची माहिती देण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. ती या कार्यालयातील एकटी कर्मचारी होती. अधिकारीही तीच आणि शिपाईही तीच. इस्राईलमधील औद्योगिक, घरगुती, दवाखाने यांचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यावर येथे प्रक्रिया केली जाते. दररोज तीन लाख 80 हजार घनमीटर पाण्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. शुद्धीकरण प्रक्रिया 24 तास सुरू असते. इस्राईलमधील 25 शहरे आणि 87 प्रकल्पांचे सांडपाणी येथे वाहून आणले जाते. हे सांडपाणी त्या त्या शहरांनी पाईपलाईनने तिथपर्यंत आणले आहे.
प्रक्रियायुक्त पाण्याचा शेतीसाठी वापर
प्रक्रिया करून हे पाणी शेतीसाठी वापरतात. इस्राईलच्या शेतीला लागणार्या एकूण पाण्याच्या 15 टक्के पाण्याची गरज यातून भागविली जाते. विशेष म्हणजे हे सांडपाणी विकत घेतले जाते आणि शुद्ध करून शेतीला विकत दिले जाते. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येतो. भारतात आज पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या प्रकल्पाची आवश्यकता निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच शेतकर्यांनी सुमारे दोन तास हा प्रकल्प पाहिला. येतांना जे शेतकरी नाराज होते परततांना ते समाधानी दिसत होते. या प्रकल्पात येणार्या सांडपाण्यातून माती, प्लॅस्टिक, लोखंड आदी धातू वेगळे करण्यात येतात. यातून रोज 30 टन माती वेगळी करण्यात येते. महिन्याला चारशे टन खते तयार होतात. या प्रकल्पासाठी वॉटर कॉर्पोरेशन ऑफ इस्राईल मदत करत असल्याची माहिती मिळाली. इस्राईलच्या अन्य शहरातील सांडपाणीही येथे आणून त्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.
(क्रमशः)
मो.नं. 965771305
(लेखक हे रावेर, जि. जळगाव
येथील दै. सकाळचे बातमीदार आहेत)